सेवाव्रती संदीप वैद्य

28 Jul 2024 21:02:07
sandeep vaidya


डोंबिवली शहरातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी बांधिलकी जपणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीतील संदीप वैद्य यांविषयी.

संदीप यांचा जन्म दि.23 एप्रिल 1968 ला ठाणे येथे झाला. संदीप यांच्या जन्मानंतर आई वडिल ठाण्यात राहिला आले. त्यानंतर लगेचच ते डोंबिवलीत वास्तवायास आले. त्यामुळे त्यांचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण टिळकनगर विद्यामंदिर शाळा, डोंबिवली येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण डोंबिवलीच्या के व्ही पेंढारकर कॉलेजमधून घेतले. इयत्ता बारावीत असताना आईला कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि प्रथम वर्ष वाणिज्यमध्ये शिकत असताना आईचे निधन झाले. तृतीय वर्ष वाणिज्यला शिकत असताना 1988 साली फेब्रुवारी महिन्यात आईच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी लागली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करतानाच त्यांनी बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. नंतर पुणे विद्यापीठातून एम. कॉम. चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून एल.एलबी. चे शिक्षण पूर्ण केले.

मधल्या काळात त्यांनी महापालिकेशी निगडित एल. एस. जी. डी. ची परिक्षा उत्तीर्ण केली. पुढे 2013 साली (सीएफपी) म्हणजेच सर्टिफाईड फायनान्शियल प्लानर ही परिक्षा उत्तीर्ण केली आणि ऑगस्ट 2016 साली मुंबई महापालिकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. 19 फेब्रुवारी 1988 ते 05 ऑगस्ट 2016 या रदिली. संदीप यांनी 1990 मध्ये गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पण ते सरकारी नोकरीत असल्याने हे काम करण्यात त्यांना काही बंधने येत होती. त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांच्या नावावर गुंतवणूक सल्लागार म्हणून काम सुरू केले. पुढे तो व्यवसाय पत्नीच्या नावावर सोहम फायनाशिल सव्हिर्सेस या नावाने सुरू करण्यात आला. आणि मुंबई महापालिकेतून स्वेच्छानिवृत्ती घ्यायच्या पाच वर्ष अगोदर त्यांनी स्वतःचे कार्यालय सुरु केले. ते आता पुर्णवेळ गुंतवणूक सल्लागार म्हणून व्यवसाय करत आहे.

दहावीची परीक्षा झाल्यानंतर 1983 च्या गणेशोत्सवात वर्गणी गोळा करायला आलेल्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव मंडळात सामील होण्यासाठी संदीप यांना आग्रह केला म्हणून ते मंडळात सामील झाले. पहिल्याच वर्षी एक चांगला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आणि तो सर्वांना खूपच आवडला. तिथूनच त्यांच्या डोंबिवलीतल्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढे संस्थेचा कार्यवाह, कोषाध्यक्ष आणि उत्सव समिती प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. 1993 साली मंडळ कायमस्वरुपी नोंदणीकृत करण्यासाठी, मंडळाचे स्वत:चे कार्यालय घेण्यात त्यांनी पुढाकार घेतला .

मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांपासून मोठी सजावट, गणेशोत्सवातील वेगवेगळी प्रदर्शने, वसंत व्याख्यानमाला, वसंतोत्सवातील विविध कार्यक्रम तसेच वर्षभरात घेण्यात येणारे विविध कार्यक्रम जसे शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिर आणि सराव परीक्षा, चित्रकला स्पर्धा, किल्ले बांधणी स्पर्धा, अर्थसंकल्पा वरील व्याख्यान हे उपक्रम सुरू करण्यात ही त्यांचा मोठा सहभाग असायचा. मंडळ कायमस्वरूपी नोंदणीकृत झाल्यावर 9 ते 10 वर्ष मंडळाचे अध्यक्षपद भूषविले. यावर्षी मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षात सहा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अमृतोत्सवातून संकलीत केलेल्या निधी संकलनातून जम्मू काश्मीर खोर्‍यातील दोन शाळांमध्ये वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारण्याच्या प्रकल्पात महत्वपूर्ण योगदान दिले. सध्या मंडळाचा कार्यकारी मंडळ सदस्य पदावर ते कार्यरत आहेत.

रोटरी क्लब डोंबिवली वेस्टचा मागिल 19 वर्षापासून सदस्य आहे. तेथेही सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये जबाबदारी आणि मागिल दहा वर्षांपासून प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी पाहत आहेत.भारत विकास परीषद डोंबिवली शाखेचे गेली 12 वर्ष सदस्य आहेत. स्वरतीर्थ सुधीर फडके गौरव समितीत मागिल दहा वर्षांपासून कमिटी मेंबर आणि सध्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. अभिवादन नागरी सत्कार समिती ट्रस्टचा मागिल 12 वर्षापासून कमिटीचा सदस्य म्हणून ते काम पाहत आहे. कल्याण गायन समाजाच्या देवगंधर्व महोत्सवाचा 2017 आणि 2018 या दोन वर्षीच्या महोत्सवाचे उपाध्यक्ष पद भूषविले होते.

5 जून 2017 रोजी वडिलांच्या ( मधुसूदन वैद्य ) 83 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आईच्या ( मालती वैद्य) स्मृतिप्रीत्यर्थ मधुमालती एन्टरप्रायझेस या संस्थेची स्थापना या मार्फत आजपर्यंत चाळीस पेक्षा जास्त शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन किंवा सहप्रायोजकत्व किंवा अन्य प्रकारे मदत करण्याचे काम ते करत आहेत.

टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा तीन वर्ष कार्यकारी मंडळ सदस्यपद भूषविले आहे. वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मदत करण्याची आवड. तसेच संस्थांना चांगले सांस्कृतिक कार्यक्रम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवड त्यांना आहे. डोंबिवलीतील वेगवेगळ्या संस्थांच्या उपक्रमांना वर्तमानपत्रातून प्रसिध्दी मिळवून देण्यासाठी मदत करण्याच्या छंद देखील त्यांना आहे.

मंडळात काम करताना एखाद्या मँनेजमेंट स्कुलमध्ये जे शिक्षण मिळाले असे मला वाटते त्यामुळेच माझ्या व्यवसायात मी सफल झालो. व्यवसाय, सामाजिक , सांस्कृतिक आणि कौटुंबिक क्षेत्रात काम करु शकलो आणि या सगळ्याचा बँलन्स सांभाळू शकलो असे संदीप सांगतात.

संदीप यांना 12 मे 2023 रोजी भोसेकर परिवारातर्फे सामाजिक कार्यासाठी सद्गुरू चंद्रकांत अनंत भोसेकर सेवाव्रत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अशा या सच्चा कार्यकर्त्यांला पुढील वाटचालीसाठी दैनिक ’मुंबई तरूण भारत’ कडून हार्दिक शुभेच्छा.



Powered By Sangraha 9.0