'या' दुर्मीळ समुद्री पक्ष्याच्या दक्षिण मुंबईत घिरट्या; पक्षीनिरीक्षकांसाठी पर्वणी

    27-Jul-2024
Total Views |
lesser frigetbird

                                                                                                                                (छायाचित्र - अक्षय चरेगावकर)


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
पावसाचा जोर वाढल्यापासून मुंबई महानगरामध्ये दुर्मीळ समुद्री पक्ष्यांचे दर्शन घडू लागले आहेत. सध्या दक्षिण मुंबईच्या आकाशात लेसर फ्रिगेटबर्ड (lesser frigatebird ) नावाचा दुर्मीळ समुद्री पक्षी घिरट्या घालताना दिसत आहे. त्यामुळे या पक्ष्याला पाहून त्याचे छायाचित्र टिपण्यासाठी अनेक पक्षीनिरीक्षकांची पाऊले दक्षिण मुंबईच्या दिशेने वळत आहेत. (lesser frigatebird)
 
 
समुद्री पक्षी हे सहसा मुख्य भूमीवर येत नाहीत. ते खोल समुद्रामध्ये अधिवास करतात. तिथल्या बेटांवरच या पक्ष्यांची वीणवसाहत असते. मात्र, पावसाळी हंगामात जोरदार वाऱ्यामुळे हे समुद्री पक्षी मुख्य भूमीवर फेकले जातात. यातील काही पक्षी जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेले पाहायला मिळतात, तर काही पक्षी हे आकाशात वाऱ्यावर घिरट्या घालताना नजरेस पडतात. यांमधीलच एका दुर्मीळ समुद्री पक्ष्याने सध्या मुंबईतील पक्षीनिरीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लेसर फ्रिगेटबर्ड नावाचा समुद्री पक्षी कुलाबा, गेट आॅफ इंडिया येथील आकाशात घिरट्या घालताना दिसत आहेत. या पक्ष्याचे छायाचित्र टिपण्यासाठी पक्षीनिरीक्षक दक्षिण मुंबईत गर्दी करत आहेत.
 
 
मुंबई किंवा महाराष्ट्रात लेसर फ्रिगेटबर्ड दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१८ मध्ये मालवणात, २०२१ साली परभणीत आणि २०२२ साली मुंबईतील पवई तलावाच्या परिसरात हा पक्षी दिसला होता. लेसर फ्रिगेटबर्ड हा पक्षी ७५ सेमीचा म्हणजेच जवळपास २ फूट लांबीचा असला तरी, तो फ्रिगेटबर्ड प्रजातीमधील आकाराने सर्वात लहान पक्षी आहे. हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागरात हा पक्षी आढळतो. मालदीव, ख्रिसमस बेटांवर या पक्ष्याच्या वीणवसाहती आढळतात. प्रजनन हंगामाच्या व्यतिरिक्त हा पक्षी सुमारे १० हजार किलोमीटरपर्यंत प्रवास करत असल्याच्या नोंदी आहेत. दक्षिण मुंबईत दिसणारे लेसर फ्रिगेटबर्ड पक्षी हे प्रौढ नसून ते अल्पवयीन आहेत.