कमला हॅरिस - भारतीय वंशाची पार्श्वभूमी ते राजकीय जडणघडण (पूर्वार्ध)

    27-Jul-2024
Total Views |
kamala harris usa candidate


कमला हॅरिस... भारतीयांसाठी तसे जगासाठीही अमेरिकेतील या महिला राजकारण्याचे नाव अगदी सुपरिचित. 2021 पासून अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळणार्‍या कमला, जो बायडन यांच्या माघारीमुळे डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरल्या आहेत. त्यांच्यासमोर रिपब्लिक पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांचे तगडे आव्हान असेल. त्यानिमित्ताने कमला हॅरिस यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांचे ‘अल्फा कप्पा अल्फा’ संघटनेशी असलेले मोत्यांचे नाते उलगडणारे हा लेख. उद्याच्या उत्तरार्धात हॅरिस यांच्या राजकीय भूमिकांविषयी...

कमला हॅरिस यांच्या मातोश्री भारतीय वंशाच्या कॅन्सरतज्ज्ञ श्यामला गोपालन (जन्म 7 डिसेंबर, 1938-मृत्यू 11 फेब्रुवारी, 2009) यांचे जमैकन पती डोनाल्ड हॅरिस अर्थशास्त्राचे माजी प्राध्यापक असून आज 85 वर्षांचे आहेत. दाक्षिणात्य शास्त्रीय संगीतनिपुण श्यामला, वयाच्या 19व्या वर्षी, तशा योगायोगानेच अमेरिकेत आल्या होत्या. नागरी हक्क चळवळीच्या निमित्ताने डोनाल्ड हॅरिस आणि श्यामला यांचा परिचय, पुढे प्रेमात आणि नंतर 1964 मध्ये विवाहात परिवर्तित झाला. पण, दोन मुली लहान असतानाच श्यामला 1971 मध्ये घटस्फोट घेऊन वेगळ्या झाल्या. यावेळी मुलींचा ताबा कुणाकडे असावा आणि कौटुंबिक ग्रंथालयातील कोणतं पुस्तक कुणाला मिळावं, या दोन प्रमुख मुद्द्यांमुळे या दोघांत निर्माण झालेली कटुता पुढेही कायम राहिली. दि. 11 फेब्रुवारी 2009 ला श्यामलांचे निधन झाले. अमेरिकेच्या विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष आणि आता डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेल्या कमला (देवी) हॅरिस आणि कायदेपंडित, राजकीय विश्लेषक मायालक्ष्मी या हॅरिस दाम्पत्याच्या दोन कन्या होत.

डगलस क्रेग एमहॉफ हे श्वेतवर्णी ज्यू कमला हॅरिस यांचे पती आहेत. कायदेपंडित, समता आणि न्यायोचित व्यवहाराचे खंदे पुरस्कर्ते, अशी त्यांची ख्याती. त्यांनी दि. 22 ऑगस्ट 2014 रोजी कमला यांच्याशी विवाह केला आहे. ते आज ‘उपराष्ट्राध्यक्षांचे पती’ या नात्याने अमेरिकेचे क्रमांक दोनचे गृहस्थ (सेकंड जंटलमन) आहेत.


कौटुंबिक पार्श्वभूमी

कमला यांना आपल्या बहुगुणी आईबद्दल खूप अभिमान आहे. “आईने अंगी बिंबवलेल्या उच्च मूल्यांमुळेच आम्ही दोघी मुली आजवरची प्रगती करू शकलो आहोत. आमच्यातील स्वाभिमान, खमकेपणा, भारतीय वारशाचा अभिमान या वैशिष्ट्यांचे श्रेय आईने केलेल्या संस्कारांना आहे. घर आणि नोकरी सांभाळत आईने आम्हा दोघींना वाढविले आहे. आपण ज्या कुटुंबात जन्मतो आणि ज्या कुटुंबात विवाह करून प्रवेश करतो, त्यांना आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान असले पाहिजे, असे संस्कार आईने आम्हा मुलींवर घडविले आहेत,” असे कमला आपल्या आईविषयी भावना व्यक्त करताना म्हणतात. आशय आणि अभिव्यक्तीचा उत्कृष्ट नमुना असलेले हे भाषण, स्वराभिनय, स्पष्ट शब्दोच्चार आणि कुणालाही सहज कळेल व समजेल, अशा सरलतेने युक्त असून सध्या व्हॅाट्सअ‍ॅपवर जगभर उपलब्ध आहे. या भाषणातील प्रेरकता, त्यातील ओतप्रोत आत्मविश्वास आणि आश्वासकता श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात.


परंपरेतून स्वत:ला मोकळे केले...

अमेरिकेत महिला उमेदवार सामान्यत: लाल, पांढरी किंवा निळी वस्त्रे परिधान करूनच प्रचार करतात. पण, कमला हॅरिस यांनी बर्गंडी रंगाचा वेश परिधान करून आणि मोत्यांचा अद्ययावत व ठसठशीत नेकलेस ठळकपणे दिसेल असा घालून, उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी स्वीकारतानाचे आपले पहिले भाषण प्रथा आणि परंपरा मोडीत काढीत केले.

कमला हॅरिस यांची राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी आणि त्यानिमित्त केलेले भाषण ही एक ऐतिहासिक घटना ठरली आहे. यानिमित्ताने अमेरिकन राजनीती कूस बदलते आहे, याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. भाषणात त्यांनी आपण ‘स्थलांतरिताची संतती’ असल्याचेही सांगितले होते, आपला कृष्णवर्णीय वारसा बेधडकपणे कथन केला आणि भाषणाच्या शेवटी, मोठमोठ्या कृष्णवर्णी, मिश्रवर्णी आणि श्वेतवर्णी कार्यकर्त्यांनी आपल्या अंत:करणात प्रज्वलित केलेली समतेची ज्योत आपण कशी अधिकाधिक तेजाने तेवत ठेवली आहे, याचा अभिमानपूर्वक उल्लेख केला. त्यांचा बर्गंडी रंगाचा डबल ब्रेस्टेड ब्लेझर आणि ट्राउझर आणि मोत्यांचा नेकलेस हे सर्व एक आणखीही एक वेगळीच कहाणी सांगत होते. तसा त्यांचा पोशाख अशा प्रसंगांचे वेळी घालायच्या परंपरागत पोशाखापेक्षा रंग सोडला तर वेगळा नव्हता. पँटसूट आणि नेकलेस घालूनच महिला उमेदवार उमेदवारी मिळाल्यानंतर व्यासपीठावर येत असत. पण, मग वेगळे काय होते? वेगळा होता तो फक्त रंग! बर्गंडी रंग!!

स्त्रीस्वातंत्र्यासाठी झटलेल्या स्त्रिया पांढर्‍या पोशाखात मोर्चे काढून मतदानाचा हक्क मिळावा म्हणून आंदोलन करीत. 2016 साली पक्षाने देऊ केलेली राष्ट्राध्यक्षपदासाठीची उमेदवारी स्वीकारतानाचे भाषण देताना हिलरी क्लिटंन यांनीही पांढराच पँटसूट परिधान केला होता. पूर्वसुरींशी आपली असलेली प्रतिबद्धता व्यक्त करण्याचा त्यांचा तो एक मार्ग असे. पण, कमला हॅरिस यांनी असे केले नाही. त्यांनी बर्गंडी रंग निवडून स्वत:ला या परंपरेपासून वेगळे केले होते.

कमला हॅरिस यांनी आपल्या प्रभावी भाषणात स्त्रीस्वातंत्र्यासाठी झटलेल्या सर्व स्त्रियांना आदरांजली वाहिली. अनेक कृष्णवर्णी स्त्रियांचा या चळवळीत कसा क्रियाशील सहभाग असे, ते त्यांनी आवर्जून सांगितले. “मताधिकार मिळून इतकी वर्षे झाली असूनसुद्धा अजूनही आम्हा सर्ववर्णीय स्त्रियांना हक्कांसाठी कसा लढा द्यावा लागतो आहे,” असे सांगत त्यांनी मेरी चर्च टेरेल, मेरी मॅक्लिओड बेथून, फॅनी लो हॅमर आणि डायने नॅश आदींचा गौरवपूर्ण उल्लेख केला.


समता, स्वातंत्र्य, न्याय, लोकशाही आणि समान संधी

आजही अनेक महिला समता, स्वातंत्र्य आणि न्याय यांच्या अपेक्षेतच आहेत. लोकशाही व समान संधी यांच्या अपेक्षेत तर आपण सर्वच आहोत. सर्व मानव समान आहेत, हा संस्कार अजून रुजायचाच आहे. कोरोनापेक्षाही भयंकर असलेल्या वांशिक भेदरूपी व्हायरसवरची लस कधी तयार होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

 
ट्वेंटी पर्ल्स - मोजून फक्त 20 मोती

कमला हॅरिस यांच्या गळ्यातल्या शुभ्र मोत्यांच्या भारी नेकलेसला एक वेगळाच आणि खास अर्थही होता. यानिमित्ताने त्यांना ‘अल्फा कप्पा अल्फा’ (एकेए) या संघटनेशी असलेली आपली निष्ठा व्यक्त करायची होती. अमेरिकेत मोत्यांच्या दागिन्यांची विशेष महती आहे. हिरेजडित दागदागिने घालणे श्रीमंतीचे प्रदर्शन मानले जाते. उंची पण चारचौघीत घालून वावरायचा दागिना म्हणजे शुभ्र मोत्यांचा नेकलेस! यानिमित्ताने प्रतिबद्धता व्यक्त करता येते, हौसही साधली जाते आणि शिवाय यात श्रीमंतीचा तोराही नाही. विद्यापीठातील 20 महिलांच्या ज्या गटाने या संघटनेची, ‘अल्फा कप्पा अल्फा’ची (एकेए) स्थापना केली, त्यांना ‘ट्वेंटी पर्ल्स’ म्हणून संबोधले जाते. या घटनेच्या स्मरणार्थ आणि त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी या मंडळाच्या महिला मोजून 20 मोत्यांची माळ घालतात.

उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीचा स्वीकार करताना आपण कोण आणि कशासाठी आहोत, हे जगजाहीर करण्यासाठी कमला हॅरिस यांनी गळ्यात हा 20 शुभ्र मोत्यांचा नेकलेस परिधान केला होता. हिरव्याकंच व चमकदार पानालाही शुभ्र व अस्सल मोत्याच्या बरोबरीचे स्थान ‘अल्फा कप्पा अल्फा’ संघटनेत आहे. हिरवाकंच रंगाला सळसळत्या तारुण्याचे तर शुभ्र मोत्याला शुद्धता व हुशारीचे प्रतीक मानले जाते, आतापर्यंत प्राण्यांना मात्र स्थान नव्हते. पण, आता उंच उडी मारून उद्दिष्ट गाठण्याच्या क्षमतेचे प्रतीक म्हणून ही मंडळी ताडकन उडी मारणारी बेडकेही आस्थेने बाळगू लागली आहेत.


जसे ‘नमस्ते’ तसेच ‘स्की-वी’

20 पैकी 16 मोती संस्थापकांच्या सन्मानासाठी तर उरलेले चार मोती, विद्यमान विद्वान सदस्यांचे प्रतिनिधित्व करणारे असतात. ‘अल्फा कप्पा अल्फा’ संघटनेचे उद्दिष्ट श्रेष्ठ दर्जाची विद्वत्ता व नीतिमत्ता, एकता, मैत्री व भगिनीभाव यांची निर्मिती करणे, हे आहे. याशिवाय, युवतींसमोरच्या समस्यांचे निराकरण व्हावे, त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळावी, यासाठीही ही संघटना प्रयत्न करते. एकमेकांचे स्वागत करताना आपण जसे ‘नमस्ते’ असे म्हणतो, तसे या सदस्या ‘स्की-वी’ असे म्हणून एकमेकींबद्दल स्नेह व आदर व्यक्त करतात. ‘सुसंस्कृतपणा आणि गुणवत्ता’, हे या संस्थेचे बोधवाक्य आहे. एक प्राचीन ग्रीक अक्षर हे या संस्थेचे बोधचिन्ह. ही प्रतीके, ही चिन्हे व या प्रथा यांना प्राचीन ग्रीक संस्कृतीत आधार सापडतो, असे अनेक मानतात. या संघटनेची सदस्या चारचौघीत उठून दिसणारी, सभागृहात ताठ मानेने प्रवेश करणारी असते. ती एकतर दरारायुक्त नजर असलेली किंवा चेहर्‍यावर समाधानाचे भाव असलेली तरी असते. तिची चालही राजेशाहीच असणार! या सर्वातून तिची पुरुषांबरोबरची बरोबरी आणि तद्नुषंगिक वैशिष्ट्ये उठून दिसतात/दिसली पाहिजेत. कमला हॅरिस भाषण करण्यासाठी आपल्या स्थानावरून उठून व्यासपीठावर येताना पाहताना या सर्व बाबी प्रेक्षकांच्या नजरेतून सुटल्या नसणार. अमेरिकन राजकीय क्षितिजावर निर्णायक स्त्रीशक्तीचा उदय होत असल्याची खात्री पटविणारे कमला हॅरिस यांचे भाषण, जनतेच्या स्मरणात कायमचे घर करून बसले असणार, यात तिळमात्र शंका नाही! पण... (क्रमश:)


वसंत काणे
9422804430