आठवणीतले आनंद दिघे...

27 Jul 2024 20:57:01
dharmveer 2 movie
 
 
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर 1 : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर आता आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा चित्रपटाचा पुढचा भाग ‘धर्मवीर 2 : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथालेखन प्रवीण तरडे यांचे असून, निर्मिती मंगेश देसाई यांनी केली आहे. तसेच, या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली आहे. समाजकारण, राजकारणाबरोबरच कलाविश्वातील अनेक कलाकारांशीही आनंद दिघे यांचे ऋणानुबंध जुळले होते. त्यानिमित्ताने आनंद दिघे यांच्यासंबंधीच्या आठवणींना काही कलाकारांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिलेला उजाळा...
 
 
दिघे साहेबांमुळे घरात गिरणी सुरु आणि शिक्षण पूर्ण झालं!
 
आनंद दिघे यांच्या मदतीमुळे माझ्या घरात गिरणी सुरु झाली आणि माझं शिक्षण झालं. त्यानंतर मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करु लागलो. 1994 साली ‘शिवचैतन्य’ हे ठाण्यात मी जिथे राहत होतो, तेथील मोठं गणेश मंडळ होतं. तिथे लाईव्ह देखाव्यात मी निवेदन करत असे. एकदा रात्री उशिरा दीडच्या दरम्यान आनंद दिघे मंडळात आले आणि मला निवेदनासाठी घरुन बोलावून आणलं. मी गेलो आणि निवेदन करु लागलो. मला त्यांनी नावं विचारलं. त्यानंतर दिघेंनी मला रामदास स्वामींबद्दल काय माहिती आहे, असे बरेच प्रश्न विचारले आणि त्या सगळ्यांची उत्तरं मी दिल्यानंतर ते प्रभावित झाले आणि त्यांनी मला ‘मठात ये’ असं सांगितलं. गणेशोत्सवात जेव्हा निवेदन करायचो, तेव्हा ‘सर्वोत्कृष्ट निवेदक’ असा पुरस्कार नव्हता. पण, त्यांनी तो मला दिला होता. शिवाय, गुणदर्शन सोहळ्याच्या संपूर्ण सजावटीची देखरेख ते स्वत: करत आणि दोन वेगवेगळ्या भगव्या रंगाचे पताके जरी लावले तरी त्यावरुन ते चिडत असत की, तुम्हाला नेमका भगवा रंग कोणता हे कसं कळत नाही? किंवा लहान मुलं जेव्हा लेझीमची तालीम करायचे, तेव्हा ते स्वत: लेझीम हातात घेऊन त्यांना कोणता पाय कसा टाकायचा? कशी लय रिदम पकडायची? हे दाखवायचे.
- विजू माने, दिग्दर्शक


विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावणारे दिघे साहेब

मी ‘थरार’ या मालिकेत त्यावेळी काम करत होतो. त्यात केवळ दोनच भागांमध्ये मी भूमिका साकारली होती आणि नेमका तोच भाग आनंद दिघे यांनी पाहिला होता. त्यामुळे जेव्हा कधी ते मला भेटायचे, तेव्हा ते मला ‘थरार’ म्हणायचे. आनंद दिघे स्वत: मुलांच्या शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशात जातीने दखल घ्यायचे, हे ऐकलं होतं. पण, एकदा मी ते स्वत: पाहिलंदेखील. माझ्या पुतण्याला ठाणा कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता आणि त्याच कामासाठी मी कॉलेजच्या कार्यालयात उभा होतो. मी पाहिलं की दिघे हातात फाईल्सचा भला मोठा गठ्ठा घेऊन येत होते. माझ्याजवळ ते आले आणि त्यांनी मला विचारलं ‘काय काम?’ मी सांगितलं. त्यावर ते म्हणाले की, “तू आधी आत जा. कारण, मी गेलो तर वेळ जाई आणि खरंच दिघे बाहेर उभे होते. त्यामुळे माझं काम फार कमी वेळात झालं आणि त्या बाकीच्या विद्यार्थ्यांचंही काम तातडीने त्यांनी केलं.
 - उदय सबनीस, ज्येष्ठ अभिनेते

 
‘...ही विटंबना नाही, विडंबना!’
 
माझं ‘यदाकदाचित’ नाटक काही वर्षांपूर्वी वादाच्या भोवर्‍यात सापडलं होतं. शेवटी निर्मात्यांच्या सल्ल्यानुसार आनंद दिघेंच्या भेटीला गेलो. त्यांना सांगितलं की, या नाटकाला विरोध होत आहे. तुम्ही एकदा नाटक पाहा, काही आक्षेपार्ह वाटलं तर आम्ही प्रयोग बंद करु. ठरल्याप्रमाणे रात्री 12च्या दरम्यान गडकरी रंगायतनला प्रयोग सुरू झाला. आनंद दिघे, त्यांचे काही मित्र सहकारी आणि विरोधक अशा सगळ्यांनी मिळून नाटक पाहिलं आणि त्यानंतर दिघे म्हणाले, “ही विटंबना नाही, विडंबना आहे. त्यामुळे प्रयोग सुरु ठेवा, पण काही जागी बदल विरोधकांना अपेक्षित आहेत, ते करा.”
- संतोष पवार, लेखक-दिग्दर्शक-अभिनेते


पहिल्याच भेटीत आदर निर्माण झाला
 
आनंद दिघेंना भेटण्याची पहिली संधी फार अनपेक्षितपणे मिळाली. ठाण्यात देवी उत्सवात बक्षीस वितरण सोहळ्याला अभिनेते मनोज वाजपेयी येणार होते; पण ऐनवेळी त्यांचं येणं रद्द झाल्यामुळे मला बोलावण्यात आलं आणि मी गेलो. कार्यक्रम उत्तम झाला आणि त्यानंतर आनंद दिघे यांना भेटण्याची संधी मिळाली. मुळात मी अचानक ऐनवेळी कार्यक्रमाला आल्यामुळे त्यांना विशेष आनंद झाला होता. माझ्याशी अर्धा पाऊण तास गप्पा मारत होते. त्यावेळी मी पाहिलं की तिथे त्यांनी पटपट बर्‍याच लोकांच्या अडचणी तिथेच मिटवल्या. त्यांच्या कामाचा वेग पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दल पहिल्याच भेटीत आदर निर्माण झाला आणि त्यानंतर पुढच्यावर्षी देवीच्या सोहळ्यासाठी त्यांनी मला विशेष आमंत्रण दिलं आणि पुन्हा गप्पा रंगल्या.
 - मिलिंद गवळी, अभिनेते

 
Powered By Sangraha 9.0