मुंबई : संजय राऊत हे पावसाळ्यातील गमबूट आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याची हिंमत करु नये, अशी टीका भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. यावर आता राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार ही लोकभावना आहे, असे संजय राऊत म्हणाले होते. यावर नितेश राणे म्हणाले की, "मातोश्रीची भावना ही लोकभावना असू शकत नाही." तसेच संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेलाही राणेंनी प्रत्युत्तर दिले. "पावसाळ्यात घालण्यात येणाऱ्या गमबुटांनी आमच्या देवेंद्रजींवर टीका करण्याची हिंमत करु नये. तुमच्यासारख्या लोकांनी अशा विद्वान माणसांबद्दल बोलणं शोभत नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आधी पत्रकारांसमोर बेछूट आरोप पत्रकारांसमोर करायचे आणि मग कोर्टात केस गेल्यावर माफी मागायची ही संजय राऊतांची आता सवय झाली आहे. एवढे मोठे आरोप करताना एकाचाही पुरावा द्यायचा नाही आणि अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केल्यानंतर माफी मागायची हीच त्यांची वृत्ती आहे," असेही ते म्हणाले. तसेच ऑक्टोबरमध्ये आम्ही महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची उरली सुरली घाण संपवणार असून आम्ही पेस्ट कंट्रोलची मोहिम राबवणार आहोत, असेही नितेश राणेंनी यावेळी सांगितले.