कलेला ‘मिडास टच’ देणारा अवलिया

    26-Jul-2024   
Total Views |
mansa
 
चित्रकार, व्यावसायिक आणि संग्राहक अशा अनेक माध्यमांतून कलेची आवड जोपासणार्‍या नाशिकच्या ‘मिडास टच एजन्सी’चे संस्थापक श्रीकांत मधुकर नागरे यांच्याविषयी...
 
श्रीकांत मधुकर नागरे यांचा जन्म अहिल्यानगर शहरात १९६८ साली झाला. वडिलांचे नाशिकच्या सराफ बाजारात दुकान, तर आई प्रभावती या गृहिणी. श्रीकांत यांचे प्राथमिक शिक्षण राजेबहाद्दूर प्राथमिक विद्यामंदिरात पूर्ण झाले. वर्गात कायम मेरिटमध्ये असलेल्या श्रीकांत यांना कलेची आवड होती. वडिलांना शिल्पकलेची आवड असल्याने श्रीकांत यांनाही कलेविषयी प्रेम निर्माण झाले. वर्गात दगडी पाट्यांवर ते चित्रे काढत असत. उत्कृष्ट चित्र काढल्यानंतर ती पाटी फलकावर लावली जायची. रस्त्यावर, दुकानावर कोणीही चित्रकार चित्रे काढत असल्यास किंवा गाड्यांवर नेमप्लेट लावत असल्यास, तर तासन्तास श्रीकांत ते पाहात बसायचे. अगदी शाळा बुडाली तरीही. अभ्यास बुडाल्यानंतर मग घरूनही चांगलाच ओरडा बसायचा. पुढे पेठे हायस्कूलमधून त्यांनी इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
 
यादरम्यान, विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने फळ्यावर श्रीकांत चित्रे रेखाटू लागले. क्रिकेटचीही त्यांना विशेष आवड होती. शाळेतच त्यांनी ‘एलिमेंट्री’ आणि ‘इंटरमिजिएट’ परीक्षा उत्तीर्ण केल्या. समाजाचा चित्रकलेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्याने त्यावेळी दहावीनंतर कलेत करिअर करण्यास घरून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी भुसावळ येथे इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. तिथे चित्रकलेत, आकृत्या काढण्यात ते सर्वात पुढे होते. दोन वर्षे तिथे राहिल्यानंतर त्यांनी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. फक्त एक वर्ष बाकी असताना ते नाशिकला परतले. आजारपणासह अनंत अडचणींमुळे त्यांनी हा निर्णय घेतला. पुन्हा घरी आल्यानंतर एका प्रसिद्ध आर्किटेक्ट फर्ममध्ये त्यांनी दीड वर्ष काम केले. बांधकाम क्षेत्रातील चित्रेही त्यांना जमू लागली. काहीतरी पदवी लागेलच म्हणून चित्रकला चांगली असल्याने त्यांनी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात फाईन आर्ट्ससाठी प्रवेश घेतला. पहिल्या वर्षापासूनच ते पार्टटाईम काम करून महाविद्यालयात जात असत. डिझाईन, स्प्रे वर्क, इल्युस्ट्रेशन, डार्करूममध्ये काय चालते हेही त्यांनी शिकून घेतले.
 
शेवटच्या वर्षी त्यांनी ‘फोटोग्राफी’ विषय घेतला. फर्ग्युसन महाविद्यालयामधून त्यासाठी त्यांनी एका वर्षाचा अभ्यासक्रमही शिकला. लोकांना काय लागते आणि जे शिकतो त्याचा किती उपयोग होतो, हे जाणून घेतल्यानंतर त्यांनी संगणकाचे शिक्षण घेतले. एजन्सीमध्ये हाताने चालणारे काम हळूहळू संगणकावर होऊ लागले. निकाल येईपर्यंत त्यांनी चार महिने बंगळुरुमध्ये काम केले. निकालानंतर पुण्यातील शिक्षण आटोपून ते नाशिकला परतले. त्यांचा थीसिस महाराष्ट्रातून पहिला आणि फोटोग्राफी प्रोजेक्ट दुसरा आला. फोटोग्राफी प्रोजेक्टसाठी त्यांनी ‘टकले बंधू ज्वेलर्स’कडून दागिने घेतले होते. हा प्रोजेक्ट त्यांनी ‘टकले बंधू ज्वेलर्स’चे राजाभाऊ टकले यांना दाखविल्यानंतर त्यांना जाहिराती बनविण्याचे काम मिळाले. यानंतर त्यांनी पुन्हा बंगळुरुला जाण्याचा निर्णय मागे घेतला. श्रीकांत यांना वेगवेगळी कामे मिळत गेली आणि हळूहळू नावही होत गेले. ‘मिडास टच’ नावाने १९९३ साली त्यांनी एजन्सी सुरू केली.
 
ज्याला हात लावेल ते सोने, तो जो जादुई स्पर्श आहे, तो कामातही यावा, या हेतूने त्यांनी एजन्सीचे नाव ‘मिडास टच’ असे ठेवले. लोगो बनविणे, जाहिरात, माहितीपत्रक बनविणे, ब्रॅण्डिंग अशी अनेक कामे एजन्सीच्या माध्यमातून केली जातात. अशी कामे करण्यासाठी त्यावेळी नाशिकबाहेर जावे लागत किंवा काही मोजके लोक ही कामे करत होते. मात्र, श्रीकांत यांनी ही पोकळी भरून काढली. सीमेन्स, बॉश, ताज हॉटेल अशा अनेक नामांकित ४० कंपन्यांची कामे त्यांनी केली. ७० हून अधिकजणांना त्यांनी प्रशिक्षित केले. जर्मनी, सिंगापूर, नेदरलॅण्ड, अमेरिका अशा जवळपास ३० देशांमधील अनेक कंपन्यांचे लोगो, डिझायनिंग, पॅकेजिंग अशी कामेही ‘मिडास टच’तर्फे केली जातात. वासुदेव कामत, प्रकाश घाडगे, प्रफुल्ल सावंत, राजेश सावंत, अशोक धिवरे, बबन जाधव यांचे श्रीकांत यांना मार्गदर्शन मिळते.
ब्रशशी संपर्क तुटायला नको म्हणून दर रविवारी ‘नाशिक मिसळ क्लब’च्या छताखाली जवळपास ४० चित्रकलाकार साधारण चार ते पाच तास चित्रे काढण्यास देतात. मुघलकालीन, शिवकालीन अशी जवळपास ७० नाणी त्यांच्या संग्रही असून त्यांना उर्दू लिहिता आणि वाचता येते. ब्राह्मी लिपीही ते शिकत आहे. ७० हून अधिक हस्तलिखित पोथ्या संग्रही आहेत. १५० हून अधिक बांधकाम व्यावसायिक कंपन्यांची कामे ते करतात. कॉलेज रोड परिसरात ते स्वतः सातमजली इमारत बांधत असून त्यात एक मजला चित्रकारांना चित्रकलेसाठी राखीव ठेवला जाणार आहे. आर्ट लायब्ररीदेखील उभारण्याचा त्यांचा मानस आहे. “सध्याचे युग एआयचे आहे, त्यामुळे आपली स्वतःची वेगळी शैली निर्माण करता आली पाहिजे. काम हीच आपली ओळख आहे,” असे श्रीकांत सांगतात. चित्रकार, संग्राहक, व्यावसायिक अशा अनेक माध्यमांतून कलेला आपलीशी करणार्‍या श्रीकांत नागरे यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा...



 

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.