कारगिल युद्ध : काही अप्रसिद्ध घटना

    26-Jul-2024
Total Views |
Kargil War
आता नौदलाला पुन्हा पाकच्या कराची बंदराची कोंडी करून पाकचा सगळाच व्यापार, लष्करी-नागरी पुरवठा बंद पाडायचे आदेश मिळाले. ‘ऑपरेशन तलवार’ सुरू झाले. भारतीय युद्धनौका वेगाने कराचीकडे सुटल्या. विशिष्ट अंतरावरून सुमारे ३० भारतीय नौकांनी कराची बंदराकडे जाणारे सर्व समुद्री मार्ग पक्के रोखून धरले.

प्रिय वाचक, आपण जर ‘विश्वसंचार’ सदराचे नियमित वाचक असाल, तर आपल्याला आठवतच असेल की, फेब्रुवारी महिन्यातच आपण जुलै महिन्यात येऊ घातलेल्या कारगिल युद्ध विजयाच्या २५व्या स्मरणदिनाचा आढावा घेतला होता. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची अमृतसर-लाहोर सद्भावना बस यात्रा, लाहोर सामंजस्य करार, त्याचवेळी पाकिस्तानी सैनिकांनी लद्दाखमधील कारगिल क्षेत्रात घुसखोरी करणे, मग मे १९९९ सालापासून युद्धाला सुरुवात होऊन दि. २६ जुलै १९९९ रोजी भारताने युद्ध जिंकल्याचे जाहीर करणे इत्यादी घटनाक्रमाचा आढावा आपण त्यावेळी घेतला होता. आता या आठवड्याभरात देशात सर्वत्र २५वा कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव, लेफ्टनंट मनोजकुमार पांडे, कॅप्टन विक्रम बात्रा, रायफलमॅन संजयकुमार इत्यादी अतुल पराक्रमी वीरांच्या रणकौशल्याबद्दल वक्ते भरभरून बोलत आहेत. लष्कराने आखलेल्या ‘ऑपरेशन विजय’, वायुदलाने आखलेल्या ‘ऑपरेशन सफेद सागर’ इत्यादी मोहिमांबद्दल तज्ज्ञ माहिती देत आहेत. राजकारणी लोकांच्या आत्यंतिक भ्रष्टाचारामुळे ‘बोफोर्स’ तोफा फार बदनाम झाल्या होत्या. पण, लष्कराला त्यांची खरोखरच आवश्यकता होती, हे कारगिलच्या रणांगणावर सिद्ध झाले. आमच्या आयात व्यवहारात राजकारणी लोकांनी अमाप पैसा खाल्ला, हा काही आमचा दोष नव्हे. शत्रूवर अचूक गोलंदाजी करून सैन्याचा हुरडा भाजून काढणे, हे आमचे काम आहे. ते आम्ही चोख बजावले, असेच जणू त्या दणदणत्या तोफांनी ओरडून सांगितले.
 
लष्कर म्हणजे भूदल आणि वायुदल अशाप्रकारे थेट ‘अ‍ॅक्शन’मध्ये उतरलेले असताना भारताचे नौदल काय करत होते? अनेकांना कदाचित हा प्रश्नच हास्यास्पद वाटेल. हिमालयात लद्दाख परिसरात १८ हजार फूट उंचीवर युद्ध चालू असताना, तिथे नौदलाचे काय काम, असे आपल्याला वाटू शकते. त्यासाठीच कोणताही विषय वाचत असताना जवळ अ‍ॅटलास ठेवायचा आणि वृत्तांतामधली ठिकाणे या नकाशांमध्ये बघण्याची सवय करून घ्यायची. तर पाकिस्तान जरी हिमालयात युद्ध लढत असला, तरी त्याला शस्त्रास्त्रे, दारूगोळा, अन्नधान्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेल किंवा पेट्रोल यांचा पुरवठा कुठून होतो? पाकिस्तानच नव्हे, तर जगातल्या कोणत्याही देशाचा वरील सर्व गोष्टींचा पुरवठा हा मुख्यतः समुद्रमार्गेच होतो. ज्या देशांना समुद्री किनारपट्टीच नाही, त्यांचे काय? असे देश जवळच्या समुद्रकिनारावाल्या देशांशी शक्यतो मैत्री राखतात आणि यांच्या बंदरांमधून जहाजे आणि रेल्वेमार्गे आपला व्यापार, आयात-निर्यात चालवतात. कारण विमानभाडे हे कुठेही महागच पडते.तर पाकिस्तानचा हा सगळा व्यापार किंवा पुरवठा चालू ठेवणारे मुख्य बंदर म्हणजे कराची. आता घटनाक्रम कसा घडत गेला पाहा- दि. ३ मे १९९९ रोजी कारगिल भागातल्या मेंढपाळांकडून भारतीय लष्कराला पाकिस्तानी घुसखोरीची पहिली खबर मिळाली.
 

भूदलाची सूत्रे हलू लागली. दि. २६ मे १९९९ रोजी भारतीय हवाई दलाने घुसखोरांवर पहिल्यांदा बॉम्बफेक केली. उर्मट पाकिस्तान्यांनी दि. २७ मे रोजी ‘अन्झा’ नामक क्षेपणास्त्रे डागून वायुदलाची ‘मिग-२१’ आणि ‘मिग-२७’ अशी दोन विमाने पाडली. युद्ध भडकत जाण्याची लक्षणे दिसू लागली. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी नौदलाची सोंगटी पुढे सरकवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. जून १९९९च्या सुरुवातीलाच भारतीय नौदलाच्या ‘वेस्टर्न कमांड’चा ताफा कराचीकडे कूच करण्यासाठी सिद्ध झाला. मुंबईपासून गुजरातमधल्या सर्व बंदरांची उत्तम मजबूती करण्यात आली. ‘मुंबई-हाय’ या तेलउत्पादन क्षेत्राचाही कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. शिवाय, नौदलाच्या ‘ईस्टर्न कमांड’मधल्या निवडक जहाजांना आदेश गेले- ‘पश्चिमी काफिल्याच्या कुमकेसाठी पूर्व समुद्रातून तातडीने पश्चिम समुद्रातल्या कोची बंदरात या.’ खेरीज नौदलातील विमानदल, तटरक्षक दल, समुद्र आणि जमीन दोन्ही ठिकाणी लढण्याची क्षमता असणारी पथके (अ‍ॅम्फिबियस फोर्म) या सर्वांनाच कारवाईसाठी सज्ज करण्यात आले. या कारवाईचे सांकेतिक नाव होते, ‘ऑपरेशन तलवार.’
 
भारत देश स्वतंत्र झाल्या झाल्या ऑक्टोबर १९४७ मध्ये पाकिस्तानने भारतावर पहिले आक्रमण केले होते. हे युद्ध काश्मीर घाटी आणि लद्दाखमध्ये लढले गेले. यामुळे नौदलाचा संबंधच आला नाही. मग ऑक्टोबर १९९२ मध्ये चीनने ‘नेफा’ भागात (आताच्या अरुणाचल प्रदेशात) भारतावर आक्रमण केले. तिथेही नौदलाचा संबंध नव्हता. नंतर १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण करताना द्वारका बंदरावर तोफा डागल्या होत्या. भारतीय नौदल या आक्रमणाचा सणसणीत जबाब द्यायला सक्षमही होते आणि उत्सुक तर फारच होते. पण, तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी नौदलाला या युद्धात न उतरवण्याचा निर्णय घेतला. नौदलाने पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचे फक्त रक्षण करावे, आक्रमण करून जाऊ नये, असा कडक आदेश यांनी दिला. यामुळे आपले आरमारी योद्धे फार नाराज झाले. त्याचे सगळे उट्टे त्यांनी १९७१ साली बांगलादेश युद्धात अगदी भरभरून काढते. पश्चिमेकडे त्यांनी कराची बंदर पेटवून दिले, तर पूर्वेकडे पाकची ‘गाझी’ ही विद्ध्वंसक पाणबुडी खतम केली आणि चित्तगाँग, मोंगला, कॉक्स बझार इत्यादी बंदरांची जबर नाकेबंदी केली. यामुळे पूर्व पाकिस्तानातल्या (आताचा बांगलादेश) पाक सैन्याची रसद साफच बंद पडली.
 
आता नौदलाला पुन्हा पाकच्या कराची बंदराची कोंडी करून पाकचा सगळाच व्यापार, लष्करी-नागरी पुरवठा बंद पाडायचे आदेश मिळाले. ‘ऑपरेशन तलवार’ सुरू झाले. भारतीय युद्धनौका वेगाने कराचीकडे सुटल्या. विशिष्ट अंतरावरून सुमारे ३० भारतीय नौकांनी कराची बंदराकडे जाणारे सर्व समुद्री मार्ग पक्के रोखून धरले. पाकचा सगळा तेलपुरवठा उमानचे आखात (ओमान) असा चालायचा. तो मार्ग तर विशेषच दाबून धरण्यात आला. म्हणजे काय? म्हणजे असे की, जमिनीवरच्या रस्त्यांप्रमाणेच समुद्रातही रस्ते असतात. पाण्याची खोली, पाण्यात लपलेले खडक, प्रवाळांची बेटे, समुद्री प्रवाह अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून या समुद्री रस्त्यांचे नकाशे बनवण्यात येतात. जहाजांचे कप्तान त्या नकाशांनुसारच जहाज चालवतात. हे समुद्री रस्ते रोखून धरणे म्हणजे त्यांना आपल्या जहाजावरच्या तोफांच्या पल्ल्यामध्ये (रेंजमध्ये) आणणे. भारतीय नौदलाचे तत्कालीन ‘चीफ ऑफ नेव्हल स्टाफ’ (सी.एन.एस.) अ‍ॅडमिरल सुशील कुमार यांनी सेवानिवृत्तीनंतर ‘अ प्राईम मिनिस्टर टु रिमेम्बर - मेमरीज ऑफ अ मिलिटरी चीफ’ या नावाने पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी ‘ऑपरेशन तलवार’ बद्दल सविस्तर लिहिले आहे.

ही कारवाई पूर्णपणे यशस्वी झाली. पाक नौदलाने भारतीय नौदलाच्या भीतीने आपल्या सगळ्या नौकांना संदेश पाठवले- ‘ज्या बंदरात असाल तिथेच थांबा. बाहेर पडू नका.’ या नाकेबंदीचा परिणाम नंतर पाकचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याच तोंडून बाहेर पडला. दि. ५ जुलै १९९९ रोजी नवाझ शरीफ यांनी जाहीर केले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या सूचनेनुसार पाकिस्तान कारगिलमधून आपले सैन्य मागे घेत आहे. त्यावेळी त्यांनी असेही सांगितले की, पाकिस्तानकडे आता फक्त सहा दिवसच पुरेल इतकाच तेलसाठा शिल्लक आहे. शत्रूची रसद मारून त्याला उपासमारीच्या उंबरठ्यावर आणून ठेवणे, हे जे नौदलाच्या कारवाईचे उद्दिष्ट आहे, ते पूर्णपणे सफल झाले. तोफेचा एकही गोळा न डागता! एकही गोळी न झाडता! सैनिकी पेशात म्हटले जाते की, अनेकदा मोठे विजय इतक्या शांतपणे प्राप्त केले जातात की सर्वसामान्यांना कदाचित ते कधीच कळत नाहीत. ‘ऑपरेशन तलवार’चा नौदल विजय हा त्या प्रकारचा होता, असे म्हटले पाहिजे. बिल क्लिंटन यांच्या सूचनेनुसार म्हणजे प्रत्यक्षात तंबीनुसार दि. ५ जुलै १९९९ रोजी पाकने सैन्य माघारीची घोषणा केली असली, तरी सर्व राजनैतिक आणि लष्करी औपचारिकता पूर्ण व्हायला आणखी २० दिवस गेले. दि. २६ जुलै १९९९ रोजी भारताने जाहीर केले की, भारतीय भूदलाचे ‘ऑपरेशन विजय’ पूर्णपणे यशस्वी झाले असून, एकूण एक पाकी घुसखोर भूमीतून हाकलून देण्यात आलेला आहे.
 
भारतात साहजिकच विजयाचा जल्लोष झाला, तर पाकिस्तानमध्ये पंतप्रधान नवाझ शरीफ आणि सेवाप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या नावाने शिव्यांची सरबत्ती झाली. असे म्हटले जाते की, सैनिकी मुख्यालयात तीनही दलांचे प्रमुख आणि नवाझ शरीफ यांच्यात एक गरमागरम बैठक झाली.  बैठकीत ‘चीफ ऑफ नेव्हल स्टाफ’ अ‍ॅडमिरल फसीह बोखारी आणि सरसेनापती मुशर्रफ यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. अ‍ॅडमिरल बोखारींनी भर बैठकीतच जनरल मुशर्रफ यांच्यावर ‘कोर्टमार्शल’ खटला भरण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेत्या बेनझीर भुत्तो यांनी या पराभवाला उद्देशून ‘पाकिस्तान’स ग्रेटेस्ट ब्लंडर’ - ‘पाकिस्तानची सर्वोच्च घोडचूक’ असे उद्गार काढले. पाकिस्तानी शक्तिमान हेरखाते ‘आयएसआय’नेही ‘कारगिल हा एक वेळ फुकट दवडणारा उद्योग होता आणि त्यातून काहीही साध्य झाले नाही,’ असा शेरा मारला. नंतर २००६ साली ‘पाकिस्तान मुस्लीम लीग’ या पक्षाने एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. त्यात असे म्हटले होते की, नवाझ शरीफ यांनी या पराभवाची न्यायालयीन चौकशी करून जनरल मुशर्रफ यांच्यावर कोर्टमार्शल खटला करण्याची सिद्धता केली होती. पण, दोनच महिन्यांत म्हणजे दि. १२ ऑक्टोबर १९९९ रोजी जनरल मुशर्रफ यांनी राज्यक्रांती करून नवाझ शरीफ यांना पदच्युत केले. चौकशी अहवाल दाबून टाकला.
 
भारताने मात्र योग्य तो धडा घेत कृष्णस्वामी सुब्रह्मण्यम या अतिशय अनुभवी, उच्च सनदी अधिकार्‍याची चौकशी समिती नेमली. सुब्रह्मण्यम हे ‘इन्स्टिटयूट फॉर डिफेन्स स्टडीज अ‍ॅण्ड अ‍ॅनलिसिस - आय.डी.एस.ए.’ या प्रख्यात संस्थेचे संचालक होते. कारगिल घुसखोरीची बातमी मिळवण्यात भारतीय हेरखाने अपयशी ठरले. याला ‘इंटेलिजन्स फेल्युअर’ असे म्हणतात. याचा सखोल विचार करून सुब्रह्मण्यम समितीने भारतीय गुप्तचर संस्थांची व्यापक पुनर्रचना केली. सुब्रह्मण्यम समितीचा अहवाल इतका संवेदनशील आहे की, त्यातला बराच भाग वाजपेयी सरकारने ‘अतिगुप्त’ म्हणून प्रसिद्ध केला नाही. अंमलबजावणी मात्र केली. भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये, त्यातही अणुऊर्जा, आण्विक क्षेपणास्त्रे, अण्वस्त्र चाचणी इत्यादी मुद्द्यांवर सुब्रह्मण्यम या माणसाने सखोल चिंतन करून ठेवले आहे. भारताचे वर्तमान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर किंवा सुब्रह्मण्यम जयशंकर हे या कृष्णस्वामी सुब्रह्मण्यम यांचे चिरंजीव आहेत. कारगिल विजयाचा राजकीय परिणाम म्हणजे, सप्टेंबर-ऑक्टोबर १९९९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ युती सरकार बहुमताने निवडून आले आणि त्यांनी २००४ सालापर्यंत म्हणजे पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ सत्ता सांभाळली.
 
 
मल्हार कृष्ण गोखले