‘हॉरर-कॉमेडी’चा झणझणीत तडका ‘काकूडा’

Total Views |
Kakuda


मनुष्य म्हटलं की आनंद, दु:ख आणि भीती वाटणं हे तसं स्वाभाविकच. त्यामुळे अशाच मानवी भावभावनांचे उत्कट प्रसंग कथानकामध्ये गुंफत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बर्‍याचदा भयपटांची निर्मिती केली जाते. जरा चित्रपटसृष्टीच्या भयपटांच्या यादीत मागे डोकावून पाहिलं तर ‘भूत’, ‘राज’, ‘वास्तुशास्त्र’, ‘कृष्णा कॉटेज’, ‘फुंक’ अशी मोठीच्या मोठी यादी आहे. ९०च्या दशकात ज्यांचा जन्म झाला आहे, त्यांनी नक्कीच हे भयपट परिचयाचे असतील आणि त्यांची भांबेरी उडाली असेल. पण, कालानुरुप भयपटांच्या सादरीकरणाची पद्धत, तंत्रही बदलले आणि लहान मुलांनाही हे चित्रपट पाहायला मिळावे, यासाठी ‘हॉरर-कॉमेडी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. याच पठडीतील आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता; त्यानंतर आता सरपोतदार यांनी ‘ओटीटी’ प्रेक्षकांसाठी खास ‘काकूडा’ हा आणखी एक ‘हॉरर-कॉमेडी’ चित्रपट आणला आहे. त्याविषयी...
 
‘काकूडा’ चित्रपटाची कथा सुरु होते रतौडी या गावातून. महत्त्वाची बाब म्हणजे, दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी सांगितले होते की, “मथुरेतील एका गावातील ही एक खरी कथा आहे आणि या सत्यघटनेच्या आधारावर ‘काकूडा’ चित्रपटाचे कथानक बांधण्यात आले आहे.”या रतौडी गावातील प्रत्येक घरात दोन दरवाजे. त्यापैकी मोठा सदस्यांसाठी आणि लहान ‘काकूडा’साठी. दररोज संध्याकाळी न चुकता ७.१५ वाजता घरातील एका पुरुषाने तो लहान दरवाजा ‘काकूडा’साठी उघडणं गरजेचं असतं. जर का तसं केलं नाही तर ‘काकूडा’ त्यांना श्राप देतो आणि त्या पुरुषाच्या पाठीवर भलंमोठं कुबड येऊन त्याचा अवघ्या १३ दिवसांत मृत्यू होतो. गेली अनेक वर्षे सातत्याने रतौडी गावातील पुरुष ‘काकूडा’साठी सायंकाळी दरवाजा उघडत असतात. पण, एकेदिवशी चित्रपटातील नायकाला (अभिनेता साकीब सलीम) काही वैयक्तिक कारणांमुळे सायंकाळी दरवाजा उघण्यास विलंब होतो आणि त्याला ‘काकूडा’चा श्राप लागतो.


परिणामी, कुबड येऊन त्याच्या मृत्यूच्या १३ दिवसांचा काळ सुरु होतो. मात्र, या सगळ्यावर इंदूचा (अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा) विश्वास नसतो; याउलट तिचं असं म्हणणं असतं की, रतौडी गावात गंभीर आजाराची महामारी पसरली आहे आणि डॉक्टर त्यावर उपचार करु शकतात. आपल्या नवर्‍याला वाचवण्यासाठी इंदू डॉक्टरांचा सल्ला घेते खरा, पण त्याचा काहीएक उपयोग होत नाही. मग शेवटी त्याला वाचवण्यासाठी एन्ट्री होते ‘घोस्ट हंटर’ विक्टरची (अभिनेता रितेश देशमुख). पुढे मग इंदू या भूतांचा शोध घेणार्‍या विक्टरच्या मदतीने ‘काकूडा’चा सामना कसा करते? विक्टर ‘काकूडा’चा उजवा पाय का कापतो? याची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘जिओ सिनेमा’वर ‘काकूडा’ चित्रपट पाहावा लागेल. हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या चरित्रपट, अ‍ॅक्शनपट किंवा अन्य भाषांमधील चित्रपटांचे ‘रिमेक’ यापलीकडे काहीतरी पाहावे, अशी प्रेक्षकांची नक्कीच इच्छा असेल आणि ‘काकूडा’च्या माध्यमातून प्रेक्षकांना काहीतरी वेगळा आशय नक्की पाहायला मिळतो.
 
‘काकूडा’ या चित्रपटातील कथानक अगदी मोजक्या शब्दांत आणि थोडक्यात मांडले आहे, यासाठी लेखक आणि दिग्दर्शकांचे विशेष कौतुक करावे लागेल. मुळात भयपटाची खासियत हे भूत किती विक्षिप्त किंवा भयानक दिसतं, यापेक्षा त्याचा आवाज किती भयानक आहे, त्याचा प्रभाव न दिसूनही प्रेक्षकांवर किती पडतो, यावर सारं काही अवलंबून असतं आणि ते साध्य करण्यात दिग्दर्शक ‘मुंज्या’प्रमाणे यंदाही यशस्वी झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून तयार केलेला ‘काकूडा’ फारसा भयानक जरी वाटत नसला तरी त्याची दहशत नक्कीच वाटते. यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे विक्टर ‘काकूडा’चा पाय कापतो असं दाखवण्यात आलं आहे; पण भूताला मुळात शरीर नसल्यामुळे त्याचा पाय कसा कापणार? हा विचार जरा तारतम्य साधणारा वाटत नाही. पण, त्याव्यतिरिक्त निव्वळ मनोरंजक असा ‘काकूडा’ चित्रपट नक्कीच आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.
 
आता अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर अभिनेता रितेश देशमुख याने त्याचे विनोदी अंग नेहमीप्रमाणे जपले आहे. शिवाय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेदेखील उत्तम अभिनय केला आहे. मात्र, या चित्रपटात विशेष कौतुक केलं पाहिजे ते म्हणजे सनीच्या मित्राचं पात्र ज्याने साकारलं त्या आसिफ खान याचं. बर्‍याचवेळी असं होतं की, छोटेखानी भूमिका साकारलेला कलाकार फारसा लक्षात राहत नाही किंवा मोठ्या कलाकारांच्या मागे तो झाकोळून जातो. पण, आसिफ याने साकारलेल्या केल्वीश या पात्राबद्दल तसं झालं नाही. संपूर्ण चित्रपटात त्याने उल्लेखनीय काम केले असून, काहीवेळा त्याने सोनाक्षीलाही अभिनयाच्या बाबतीत मागे टाकलं आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने कौटुंबिक ‘हॉरर-कॉमेडी’ चित्रपट या यादीत ‘काकूडा’ या चित्रपटाचा समावेश झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
चित्रपट : काकूडा
दिग्दर्शक : आदित्य सरपोतदार
कलाकार : रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा, साकीब सलीम, आसिफ खान
रेटिंग : ***

 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.