‘ती’ व्हायरल कविता : बालसाहित्य की बालिश साहित्य?

    26-Jul-2024
Total Views |
Children's Literature
गेल्या काही दिवसांपासून इयत्ता पहिलीच्या ‘बालभारती’च्या मराठी पुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ ही कविता समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली. त्याचे कारण म्हणजे, या कवितेतील अमराठी शब्दप्रयोग, ओढूनताणून जुळवलेले यमक आणि एकूणच या कवितेचा दर्जा. यामुळे या कवितेच्या कवयित्री आणि ‘बालभारती’वरही सर्व स्तरातून टीकेची झोड उठली. तसेच मराठी भाषा, बालसाहित्य, ‘बालभारती’ची पुस्तके, कवितानिवडीचे निकष अशा अनेक मुद्द्यांनाही या ‘व्हायरल’ कवितेने ऐरणीवर आणले. त्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने या कवितेविषयी शिक्षक, बालसाहित्यिक आणि भाषातज्ज्ञांना नेमके काय वाटते, ते जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
 
निवड समितीमध्ये बालसाहित्यिक का नाहीत?
 
शालेय अभ्यासक्रमात साहित्य समाविष्ट करण्यासाठी निवड समिती म्हणून एक काम असते ना? मग मुलांमध्ये मराठी भाषेविषयी गोडी वाढवायची असेल आणि मराठी भाषेविषयी त्यांना अधिक जागरुक करायचं असेल तर, अशा कविता ‘बालभारती’ने पुस्तकात समाविष्ट करून घ्याव्यात का? असा माझा निवड समितीलाच थेट प्रश्न आहे. इतका साधा विचारही न करता, आपण कविता-बडबडगीतं अभ्यासक्रमात घेता कामा नये. आपण पहिली-दुसरी इयत्तेला वाचन-लेखनाचा पूर्वकाळ मानतो; तर त्या वयात बडबडगीतांना, अभिनयगीतांना खूप महत्त्व असतं आणि ते जर साध्य होत नसेल, तर मग या प्रकारची कविता पहिलीच्या अभ्यासक्रमात का आहे? २०१८ मध्ये ही कविता पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली आणि २०२४ मध्येही ती आहे. मग, अशा गोष्टींचा ‘रिव्ह्यू’ घेण्याची काही पद्धत ‘बालभारती’कडे आहे का? इतके सगळे दिग्गज लोक त्या निवड समितीमध्ये आहेत, तर मग ही कविता त्यांच्या डोळ्यांखालून गेली नाही का? किंवा मग मुलांच्या दृष्टीने हे साहित्य असेल, बालसाहित्य असेल, तर मग त्या समितीमध्ये कुणी बालसाहित्यिक का नाहीत? या कवितेमुळे सर्व पाठ्यपुस्तकांचेच ‘ऑडिट’ होण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
अर्चना कुरतडकर, संपादक, शिक्षण विवेक

 
-----------------

प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे कारण नाही!


कविता म्हटले की, त्यात नाद, लय आणि ताल असतोच. तसेच तिची काही वैशिष्ट्यपूर्ण यमकरचनाही असते. इयत्ता पहिलीची जी कविता चर्चेत आली आहे, ती कविता तशी नादमय, तालबद्ध आहे. या कवितेत आलेला एक इंग्रजी शब्द ‘वन्स मोअर’ हा रूढ शब्दच आहे की, जो मराठीमध्येही सर्रास वापरला जातो. यावरून त्या कवितेवर किंवा कवीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे कारण नाही.
 
संदेश कदम, इयत्ता पहिलीचे शिक्षक, छबिलदास लल्लुभाई प्राथमिक शाळा, दादर

 
---------------

 
कवितेच्या दर्जाचा विचार व्हायला हवा

कवितेमध्ये मुलांसाठी काही एक गंमत हवी असते, त्यांना ती मजेदार वाटली पाहिजे. बोलताना छान वाटली पाहिजे, सहज पाठ झाली पाहिजे, पण ती कविता कल्पनारम्यसुद्धा असली पाहिजे. यमक जुळवलं गेलं नसेल, अगदीच सुमार दर्जाची असेल, तर मग ती ‘बालभारती’च्या पुस्तकात घ्यावी का? अशा कवितेची निवड का व्हावी? असे प्रश्न साहजिकच उपस्थित होतात आणि दुसरं म्हणजे, कविता सगळेच करत असतात. लहानपणी, मोठेपणीही. काव्यलेखनाची काहींना आवड असते. पण, त्या आवडीवर काम केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपण बालकविता लिहू शकतो. आपापली कविता लिहून आपण आपल्या वहीतही ठेवू शकतो. गंमत म्हणून, आनंद म्हणून किंवा सुचली आहे म्हणून कविता लिहिणे, ही गोष्ट वेगळी; पण जेव्हा ही कविता सगळ्यांसाठी असते, तेव्हा त्या कवितेचा आणि तिच्या दर्जाचा नक्कीच विचार व्हायला हवा.

संगीता बर्वे, प्रसिद्ध बालसाहित्यिक
 
------------

सावध ऐका पुढल्या हाका!

एकीकडे आपण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी भांडतोय आणि दुसरीकडे अशी कविता आपण पुस्तकांतून मुलांना वाचायला देतोय. केवळ यमक जुळावं म्हणून इंग्रजी शब्दांचा शिरकाव या कवितेत झाला. पण, याउलट इंग्रजी कवितेमध्ये कधी मराठी शब्दांचा वापर होईल का? तर असं अजिबात होणार नाही. मराठीवर हा एकप्रकारे अन्याय आहे. माऊलींनी ७०० वर्षांपूर्वी ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातही पैजा जिंके’ असं म्हटलं आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या बाबतीत तरी किमान हे असले प्रकार होऊ नये. ‘सावध ऐका पुढल्या हाका’ हे सूत्र डोळ्यांसमोर ‘बालभारती’ने ठेवायला हवे. अशा गोष्टींची पुनरावृत्ती, मुलांचे नुकसान होऊ नये, या दृष्टीने प्रयत्न करायला हवा. त्यामुळे हा चुकीचा पायंडा पडता कामा नये, अशीच आमची इच्छा.
अशोक तकटे, उपाध्यक्ष, मायमराठी राज्य अध्यापक संघ

--------------------
आता तरी सजग राहा!
 
मुळात माझ्या दृष्टीने पाहायचं झालं तर या कवितेमध्ये इंग्रजी शब्द आहेत, म्हणून जो गदारोळ होतोय, तो मला पटत नाही. कारण, अनेक मोठ्या कवींनीसुद्धा आपल्या कवितांमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर केला आहे. खरी चर्चा जर व्हायला हवी असेल तर पाठ्यपुस्तक मंडळाने ही जी कविता निवडली आहे, तिच्या दर्जाविषयी होणे आवश्यक आहे. एक-दोन वर्षांतच हे पुस्तक अभ्यासक्रमातून बदलून, नवीन पुस्तक येईल. म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखे आहे. पण, ही चर्चा होतेय तेही एका अर्थाने महत्त्वाचे. लोक जागृत झाले आहेत. त्यानिमित्ताने तरी ‘बालभारती’ला आता तरी सजग राहा, असं आपण सांगूया!

गोविंद गोडबोले, प्रसिद्ध बालसाहित्यिक


-------------

नवीन लोकांना संधी द्या, पण दर्जा सांभाळा!


या संपूर्ण प्रकरणावरुन बर्‍याच लोकांनी असा गदारोळ उठवला की, आमच्या वेळी किती मोठ्या मोठ्या लोकांच्या कविता होत्या आणि त्या किती चांगल्या होत्या. मला असं वाटतं की, सारखी आपल्याला जी दहा नावं आठवतात, त्यांच्याच कविता पुस्तकात असणं आवश्यक नाही. नवीन पण खूप लोक लिहितात, त्यांनाही पाठ्यपुस्तकात लिहिण्याची जरुर संधी मिळाली पाहिजे. पण, त्याचवेळी मला असं वाटतं की, त्या कवितांचा दर्जा, त्यांची भाषा यांचा विचार व्हायला हवा. जेव्हा तुमचा स्वत:चा बालकविता संग्रह असतो आणि त्यात इंग्रजी, मराठी मिक्स शब्द असतात, वेगवेगळ्या माध्यमांतील मुलं त्या कविता वाचतात त्यात काही चूक नाही. पण, जेव्हा तुम्ही पाठ्यपुस्तकासाठी कविता लिहिता, तेव्हा ज्या भाषेत ती छापली जाते, ज्या विषयाशी ती संबंधित आहे, त्याचा थोडा विचार व्हायला हवा.
चिन्मयी सुमित, अभिनेत्री



- दीपाली कानसे