पॅरिस ऑलिम्पिक २०२४! उद्घाटन सोहळ्याच्या काही तास आधी रेल्वे रुळांवर जाळपोळ; ८ लाख प्रवासी अडकले

    26-Jul-2024
Total Views |
 Olympics 2024 train tracks arson
 
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची सुरूवात गुरुवार, दि. २६ जुलै २०२४ पासून सुरू होत आहे. फ्रान्सच्या राजधानीत १० हजारहून अधिक खेळाडू जमले असून सीन नदीवरील ऐतिहासिक ऑलिम्पिक सोहळ्याची तयारीही पूर्ण झाली आहे. दरम्यान, फ्रान्सच्या हायस्पीड रेल्वे मार्गांवर हल्ला करण्यात आला आहे.
 
त्यामुळे ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी पॅरिसमधील रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. फ्रान्सची राष्ट्रीय रेल्वे कंपनी एसएनसीएफने शुक्रवारी सांगितले की हाय-स्पीड लाईनवर अनेक संशयास्पद घटना घडल्या आहेत. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या दिवशी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रुळांवर जाळपोळ करण्यात आली आहे.
  
या घटनांमुळे रेल्वे रुळांच्या दुरुस्तीच्या कामाला आठवडाभराचा कालावधी लागू शकतो. अधिका-यांनी पुढे सांगितले की, या जाळपोळीचा रेल्वे वाहतुकीवर खूप गंभीर परिणाम होईल. एसएनसीएफने जाहीर केले की फ्रान्सच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेकडील रेल्वे मार्ग प्रभावित झाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या काही तास आधी घडलेल्या या घटनांचा फ्रेंच अधिकाऱ्यांनी निषेध केला.
  
एसएनसीएफचे मुख्य कार्यकारी जीन-पियरे फेरांडौ म्हणाले की, या घटनेमुळे फ्रान्समधील आठ लाख प्रवाशांवर परिणाम झाला. ही जाळपोळ ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात व्यत्यय आणण्यासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.