काँग्रेसचा रामद्वेष उघड! कर्नाटकातील रामनगर जिल्ह्याचे नाव बदलले

    26-Jul-2024
Total Views |
 Gandhi
 
बंगळुरू : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारच्या मंत्रीमंडळाने रामनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजुरी दिली असून, यापुढे रामनगर जिल्हा बंगळुरू दक्षिण म्हणून ओळखला जाईल. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी शुक्रवार, दि. २६ जुलै २०२४ ही घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच शिवकुमार म्हणाले होते की, जिल्ह्यातील नेत्यांच्या शिष्टमंडळाने रामनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
 
त्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले होते की, "रामनगरा, चन्नापटना, मगडी, कनकापुरा, हरोहल्ली तालुक्यांचे भविष्य आणि विकास लक्षात घेऊन त्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून बंगळुरू दक्षिण जिल्हा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे."
 
राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य करत जिल्ह्याचे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे. याची घोषणा करताना डीके शिवकुमार म्हणाले, 'आम्ही सर्व मूळचे बंगळुरू जिल्ह्याचे आहोत, ज्यामध्ये बंगळुरू शहर, दोड्डाबल्लापूर, देवनहल्ली, होस्कोटे, कनकापुरा, रामनगरा, चन्नापटना, मगडी यांचा समावेश आहे. प्रशासकीयदृष्ट्या, ते पूर्वी बंगळुरू शहर, बंगळुरू ग्रामीण आणि रामनगरामध्ये विभागले गेले होते.
 
सरकारच्या निर्णयाचे समर्थन करताना ते म्हणाले की, "बंगळुरूला दक्षिण जिल्हा बनवल्याने म्हैसूरपर्यंत रामनगर, चन्नापटना आणि मगडीचा विकास होईल. उद्योगांच्या स्थापनेला आमंत्रण दिले जाईल आणि मालमत्ता मूल्य वाढण्यासही मदत होईल. बंगळुरूच्या एका बाजूला आंध्र प्रदेश आणि दुसऱ्या बाजूला तामिळनाडू आहे. त्यामुळे हा भाग बंगळुरूच्या विकासासाठी आणि विस्तारासाठी सोडण्यात आला आहे." विरोधकांनी मात्र, काँग्रेसला राम नावाचा द्वेष असल्याची टीका केली आहे.