समता, बंधुता, एकतेचा महाउत्सव

    26-Jul-2024
Total Views |

Olympic
 
नवी दिल्ली :अवघ्या जगाला फ्रेंच राज्यक्रांतीद्वारे समता बंधुता आणि एकतेचा मंत्र देणार्‍या फ्रान्सच्या राजधानी पॅरिसमध्ये यंदाच्या 33व्या ऑलिम्पिकला शुक्रवार, दि. 26 जुलै रोजी सुरुवात होत आहे. अवघे जग या ऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये लोटले आहे. बॅरिन पिअर द कुबर्तिनने 1896 साली अथेन्समध्ये क्रीडाजगतातील या महाउत्सवाला सुरुवात केली होती. त्यावेळी त्याने हार-जीतपेक्षाही तुम्ही लढला कसे, याला ऑलिम्पिकमध्ये महत्त्व आहे, असे म्हटले होते.
 
आज कधी नव्हे, ते कुबर्तिनच्या या वाक्याची राजधानी पॅरिसच्या रस्त्यावर पदोपदी जाणीव होत आहे. जगभरातील निर्वासितांचे थवे फ्रान्समध्ये धडकत आहेत. अल्जेरियापासून ते सोमालियापर्यंत. लहान बाळांपासून ते अबालवृद्धांपर्यंत. यांचा रोजचा जगण्याचा संघर्ष पॅरिसच्या रस्त्यावर पदोपदी जाणवत आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये निर्वासितांचाही संघ दाखल झाला आहे. जगण्यासोबतच लढण्यासाठी. युद्धग्रस्त 11 देशांतील तब्बल 37 खेळाडू जगभरातील दिग्गज खेळाडूंसोबत मैदानावर उतरतील तेव्हा कुबर्तिनच्या शब्दांत ते विजेते असतील.
 
हार-जीतपेक्षाही ते खर्‍या अर्थाने जी-जान से लढले आहेत. यंदा प्रथमच ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा पॅरिसच्या जगप्रसिद्ध सेन नदीच्या पात्रात पार पडणार आहे. त्यात विविध देशांचे खेळाडू बोटीतून संचलन करतील. भारताचे खेळाडूही त्यात असतील, पण
तेव्हा एक टाळी या निर्वासितांच्या पथकालाही द्यायलाच हवी. काल पॅरिसमध्ये ऑलिम्पिक ज्योत आली. येथील प्रतिष्ठेच्या लादेफोन्स भागात विशेष सोहळ्याचे आयोजन केले आहे. लादेफोन्स म्हणजे मिनी इंडिया.
 
उजव्या डाव्या बाजूला बघितले तर एकतरी भारतीय दिसणारच. मराठी टक्काही येथे खूप आहे. आणि म्हणूनच या भागातून जेव्हा ऑलिम्पिक ज्योतीचा प्रवास झाला, तेव्हा त्यावेळी खास भारताच्या ऑलिम्पिक सुवर्ण पदकविजेत्या अभिनव बिंद्राला येथे आमंत्रित करण्यात आले होते. भारताचे एकूण 117 खेळाडू 17 क्रीडा प्रकारांत 95 पदकांसाठी झुंज देतील. टोकियोच्या तुलनेत यंदा सात खेळाडू कमी आहेत. टोकियोला 124 खेळाडूंचे पथक होते.
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ऐतिहासिक सात पदकांची कमाई केली होती. त्यात भालाफेकपटू निरज कुमारच्या सुर्र्‍ण पदकाचाही समावेश आहे. त्यामुळे ही कामगिरी उंचावण्याचे आव्हान भारतापुढे असेल. महाराष्ट्राचे पाच खेळाडू यंदाच्या ऑलिम्पकसाठी पात्र ठरले आहेत. त्यात अ‍ॅथलेटिक्समध्ये अविनाश साबळे, सर्वेश कुशारे, बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी, सेलिंगमध्ये विष्णू सर्वानन, तिरंदाजीत प्रवीण जाधव यांचा समावेश आहे.
 
ऑलिम्पिकमध्ये धडकणे हीच मोठी कामगिरी असते. त्यामुळे पुढील 15 दिवस खेळातील या महामहोत्सवाचा आनंद लुटूया... युद्घमय जगात खेळाद्वारे शांतीचा संदेश पोहोचवण्यासाठी जगभरातील दहा हजारांहून अधिक खेळाडू सज्ज झाले आहेत. चला त्यांच्या जग जिंकण्याच्या मोहिमेत आपणही सामील होऊया...