पुण्यातील पुरपरिस्थितीचा मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा! 'डीप क्लीन' मोहिम राबवण्याचे निर्देश

    26-Jul-2024
Total Views |
 
Shinde
 
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा शुक्रवारी आढावा घेतला आहे. तसेच त्यांनी जिल्हा प्रशासनाला 'डीप क्लीन' मोहिम राबविण्याचे निर्देशही दिले आहेत. गुरुवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे पुण्यात पावसाचा हाहाकार माजला असून संपूर्ण पुणे परिसर पाण्याखाली आला आहे.
 
पुणे शहर आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी इत्यादी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
 
हे वाचलंत का? -  लाडकी बहीण योजनेच्या खर्चावरून मुनगंटीवारांनी सुनावलं, म्हणाले, "आमच्या बहिणी ॲमेझॉनवरुन..."
 
तसेच पुरामुळे झालेल्या घरांच्या आणि शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पूरग्रस्त भागातील घरामध्ये चिखल शिरला असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याची दखल घेत 'डीप क्लीन' मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.