आज श्याम मानव, उद्या कोण?

    26-Jul-2024
Total Views |
Shyam Manav


सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था सुरू करून तिच्याद्वारे हलकेच राजकीय क्षेत्रात प्रवेश करायचा, ही देशातील नवी पद्धत ठरून गेली आहे. आम आदमी पार्टीचे केजरीवाल हे त्याचे सर्वात यशस्वी उदाहरण. त्यावरून स्फूर्ती घेऊन महाराष्ट्रातील काही व्यक्तींनीही भाजपविरोधात भूमिका घेतलेली दिसते. पण, या व्यक्तींमध्ये खरोखरच इतके नेतृत्वगुण आहेत का? की त्यांच्या आडून राज्यातीलच काही प्रस्थापित नेते आपले राजकारण शिजवित आहेत, हा खरा प्रश्न. कारण, राज्यात फडणवीस यांच्याशी समोरासमोर दोन हात करण्याची क्षमता एकाही विरोधी नेत्यात नाही!

राज्याच्या विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत चालल्या आहेत, तसतशी राज्यात राजकीय शेरेबाजीही शिगेला पोहोचलेली दिसते. मात्र, ही वक्तव्ये प्रस्थापित नेत्यांकडून केली जात नसून, काही सामाजिक संस्थांकडून आणि त्यांच्या संचालकांकडून केली जात आहेत. पण, त्यांच्या टीकेचा रोख पाहिल्यास या व्यक्ती या भाजपविरोधी, त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविरोधी आहेत, हे अगदी स्पष्टपणे दिसून येते. त्याचेच ताजे उदाहरण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचे वक्तव्य. त्यांनीही नुकतेच नवे तारे तोडले. “देशात सध्या राहुल गांधी, शरद पवार आणि राज्यात उद्धव ठाकरे हेच तीन चेहरे जनतेला आश्वासक वाटतात,” असे विधान मानव यांनी केले. इतकेच बोलून ते थांबलेले नाहीत, तर राज्यातील विद्यमान सरकार उलथवून टाकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
एखाद्या व्यक्तीला कोणता नेता आवडावा, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न. जो तो आपला अंगभूत स्वभाव आणि वैचारिक पातळीशी मिळत्याजुळत्या नेत्याची बाजू घेईल, हेही स्वाभाविकच. त्यामुळे मानव यांना राहुल गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे हे आश्वासक नेते वाटत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण, त्यांनी केलेले ‘राज्यातील विद्यमान सरकार उलथवून लावले पाहिजे,’ हे विधान मात्र थेट राजकीय स्वरूपाचे आणि प्रक्षोभकच! पण, तत्पूर्वी मानव यांच्या या तीन लाडक्या नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी नेमके काय काम केले आणि राज्याचे किती भले केले, हे मानव यांनी सांगितले पाहिजे.ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्यात जी बेबंदशाही माजली होती, ती विसरण्याइतका काळ अजून लोटलेला नाही. जनतेच्या मनात ठाकरे यांच्या काळ्या कारकिर्दीची भीती आजही कायम आहे. राज्याच्या सर्व विकास योजना ठाकरे यांनी बंद करून टाकल्या. मुंबईतील मेट्रोचे काम वैयक्तिक अहंकारापोटी रोखून ठेवले आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या माथ्यावर त्यांनी तब्बल दहा हजार कोटी रुपयांचे कर्ज वाढविले होते. शेतकर्‍यांसाठी अतिशय लाभदायक ठरलेली ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षा योजनाही ठाकरे यांनी बंद करून टाकली होती, कारण ती सुरू करण्याची कल्पना देवेंद्र फडणवीस यांची होती.
 
इतर अनेक विकासकामांना, प्रकल्पांनाही ठाकरेंनी बिनबोभाटपणे स्थगिती दिली. पण, विकासकामे सोडा, त्यांच्या सरकारच्या काळात राज्यात अक्षरश: मोगलाई अवतरली. पालघर येथील साधूंची जाहीरपणे झालेली हत्या असो की अनंत करमुसे यांना एका गुंड प्रवृत्तीच्या मंत्र्याने आपल्या बंगल्यावर नेऊन केलेली मारहाण असो की एका निवृत्त नौदल अधिकार्‍याला केलेली मारहाण असो- या काही घटना तर जनतेच्या मनात आजही ताज्या आहेत. याखेरीज, कंगना राणावतचे घर आणि कार्यालय न्यायालयाचा आदेश धुडकावून तोडणे, सुशांत सिंह राजपूतची कथित आत्महत्या प्रकरण, बारमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करणे, मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली मोटार उभी करणे आणि ते दडपण्यासाठी एका साक्षीदाराची हत्या करणारा सचिन वाझे प्रकरण, कोविड योजनांतील प्रचंड घोटाळा, पत्राचाळ प्रकरण यासारख्या गुन्हेगारी घटनांची यादी बरीच मोठी आहे. या घटना ठाकरे यांच्या अवघ्या अडीच वर्षांच्या काळात घडल्या, हे लक्षात घेतल्यास त्यांच्या पूर्ण कारकिर्दीत काय काय घडले असते, याची कल्पनाही अंगावर शहारे आणणारी आहे.

त्याचप्रमाणे राज्यातील विद्यमान सरकार उलथवून टाकण्यासारखे असे कोणते एक किंवा अधिक कामे या सरकारने केली आहेत, तेही मानव यांनी सप्रमाण सांगावे. अर्थात, मानव हे तर्कशुद्ध युक्तिवादासाठी प्रसिद्ध नाहीत. यापूर्वी त्यांनी अशी अनेक बिनबुडाची आणि वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांचे अंधश्रद्धेविरोधातील कथित कार्यही तसे वादग्रस्त. कारण, त्यांनी आजवर फक्त हिंदू धर्मीयांना लक्ष्य केले. बुवाबाजी काय फक्त हिंदू धर्मात आहे? अन्य धर्मांत बुवाबाजी, ढोंगबाजी नाही काय? पण, येथे प्रश्न राजकीय विरोधाचा आहे. लोकशाहीत राजकीय विरोध असणारच. पण, केवळ विरोधासाठी विरोध हा कोणाच्याच फायद्याचा नसतो. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि तिच्या सहयोगी पक्षांकडून सध्या केवळ राजकीय कारणासाठी सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा विरोध केला जात आहे. त्यातून जनतेचे हित साधले जात नाही. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी काही वर्षांपासून आंदोलन सुरू केले.

मध्यंतरी, त्यांनी जरा उसंत घेतली असली, तरी आता ते पुन्हा नव्याने आंदोलनाची भाषा करीत आहेत. त्यांचे आंदोलन हे सामाजिक नसून राजकीय स्वरूपाचे कसे आहे, त्याचा सविस्तर वेध आम्ही कालच्या अग्रलेखातून घेतला होता. पण, जरांगेंप्रमाणेच आता श्याम मानव हेही राजकारणात उतरत आहेत की काय, ते पाहावे लागेल. कारण, त्यांची वक्तव्ये ही शुद्ध राजकीय स्वरूपाची आहेत. गेल्या काही काळापासून स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण करण्याचा नवा ट्रेण्ड रूढ होत आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे त्याचे सर्वात यशस्वी उदाहरण म्हणावे लागेल. पण, या संस्थांना कोण अर्थसाहाय्य करते, हे पाहिले पाहिजे. कारण, सामाजिक कार्याच्या आवरणाखाली या संस्था राजकीय काम करीत असतील, तर त्यांना वेळीच चाप लावण्याची गरज आहे. तसेच या संस्थांना आधार देणारे राज्यातील प्रस्थापित विरोधी नेते आहेत का, तेही तपासावे लागेल. या नेत्यांना असे वाटत असेल की लोकसभेच्या निकालांमुळे आगामी विधानसभेत आपल्याला विजयी होण्याची संधी आहे, तर ते मूर्खांच्या नंदनवनात राहत आहेत. विधानसभा मतदारांपुढील प्रश्नही वेगळे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असतात. राज्यात फडणवीस यांच्याशी थेट दोन हात करण्याची कुवत आणि हिंमत सध्या तरी कोणत्याच विरोधी नेत्यात नाही. त्यामुळे हे नेते अशा देशविरोधी अजेंडा राबविणार्‍या स्वयंसेवी संस्थांमार्फत आपले राजकीय ईप्सित साध्य करीत आहेत का, असाच प्रश्न उपस्थित होतो.