राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोक हॉलचे नाव बदलले

    26-Jul-2024
Total Views |
Rashtrapati Bhavan 
 
२५ जुलै रोजी राष्ट्रपती भवनातील ‘दरबार हॉल’ आणि ‘अशोक हॉल’ या दोन वास्तूंचे नामांतर करण्यात आले. दरबार हॉलचे नाव बदलून ‘गणतंत्र मंडप’ आणि अशोक हॉलचे नाव बदलून 'अशोक मंडप' असे करण्यात आले आहे.
दरबार हा शब्द राजेशाही व्यवस्थेशी संबंधित आहे, पूर्वी राजाचा दरबार भरायचा. “दरबार हा शब्द भारतातील राजे आणि ब्रिटिशकालीन न्यायालये तसेच संमेलनांचा संदर्भ देतो. भारत हा देश आता प्रजासत्ताक आहे. त्यामुळे दरबार या शब्दाने प्रासंगिकता गमावली आहे. म्हणूनच या हॉलचे नामांतर गणतंत्र मंडप असे करण्यात आले आहे” असे राष्ट्रपती सचिवालयातून आलेल्या निवेदनात म्हटले आहे. देशातील अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक कार्यक्रम दरबार हॉलमध्ये आयोजित केले जातात. राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाणारे महत्त्वाचे पुरस्कार याच ठिकाणी दिले जातात. तसेच देशाच्या सरन्यायाधीशांच्या शपथविधी समारंभासारखे महत्त्वाचे समारंभही याच हॉलमध्ये आयोजिले जातात. १९४७ साली भारताच्या पहिल्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचाही दरबार हॉल हा साक्षीदार होता.
‘अशोक हॉल’ मुळात बॉलरूम होता. “सर्व कष्टापासून दूर असलेली व्यक्ति म्हणजे अशोक. अशोक हा एकता आणि शांतता सहअस्तीत्वाचे प्रतीक आहे. अशोक हा शब्द अशोक वृक्षाच्या संदर्भातही वापरला जातो. या वृक्षाचे भारतीय परंपरा, कला आणि संस्कृतीमध्ये मोठे महत्व आहे” असे राष्ट्रपती भवनाच्या निवेदनामध्ये म्हटले आहे. या हॉलमध्ये परदेशातील प्रमुख व्यक्तींची ओळखपत्रे सादर करणे, राष्ट्रपतींकडून दिलेल्या मेजवानीपूर्वीच्या औपचारिक भेटी, महत्त्वाच्या समारंभांपूर्वी राष्ट्रगीताचे गायन याच हॉलमध्ये होते. भारतीय आणि पाश्चिमात्य स्थापत्यकलेचे मिश्रण या हॉलमध्ये पाहायला मिळते. हॉल या शब्दासाठी ‘मंडप’ हा भारतीय प्रतिशब्द आहे. त्यामुळे दरबार हॉल आणि अशोक हॉल या असे न म्हटले जाता आता त्यांचा उल्लेख आता ‘गणतंत्र मंडप’ आणि ‘अशोक मंडप’ असे केले जाणार आहे.