फुटीरतावादाचा नवा खेळ

26 Jul 2024 21:22:35
Bangladeshi infiltrators


झारखंडमध्ये विशेषतः संथाल परगणामध्ये बांगलादेशी आणि बंगाली मुस्लिमांची दिवसेंदिवस झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, बंगालमध्येही बांगलादेशी घुसखोरांचा गंभीर प्रश्न आणि पंजाबमध्ये अमृतपाल सिंग या नवखलिस्तानी नेत्याचा उदय, या घटना देशातील फुटीरतावादाच्या नव्या खेळाकडेच अंगुलीनिर्देश करतात.
 
झारखंडमध्ये विशेषतः संथाल परगणामध्ये बांगलादेशी आणि बंगाली मुस्लिमांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. झारखंडमधील गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हा मुद्दा नुकताच संसदेत उपस्थित केला. संथाल परगणा भागामध्ये ‘एनआरसी’ लागू करण्याची मागणीदेखील दुबे यांनी केली. एवढेच नाही तर झारखंडच्या संथाल परगणासह पश्चिम बंगालमधील मालदा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांना केंद्रशासित प्रदेश बनवण्याची मागणी दुबे यांनी केली आहे. निशिकांत दुबे यांनी सभागृहात सांगितले की, झारखंडमध्ये वनवासी समुदायाची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. येथे मुस्लीम तरुण वनवासी महिलांशी विवाह करत आहेत. लोकसभा निवडणूक लढवलेल्या एका महिला नेत्याचा आणि नगरपालिकेच्या अध्यक्षांचा संदर्भही त्यांनी दिला. लोकसभेत बोलताना खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, “संविधान धोक्यात असल्याचे विरोधक नेहमी म्हणतात, पण सत्य हे आहे की, संविधान नाही, तर त्यांचे राजकारण धोक्यात आले आहे.” ते म्हणाले की, “जेव्हा झारखंड बिहारपासून वेगळे झाले आणि वेगळे राज्य बनले, तेव्हा संथाल परगणा प्रदेशात २००० सालात ३६ टक्के वनवासी लोकसंख्या होती, जी आता २६ टक्के झाली आहे. या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे सर्वांचेच कसे दुर्लक्ष होते,” असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, “सर्वत्र मतदार १५-१७ टक्क्यांनी वाढतात, मात्र इथे तब्बल १२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आपल्या लोकसभा मतदारसंघात येणार्‍या विधानसभा मतदारसंघात जवळपास २६७ बुथवर मुस्लिमांची लोकसंख्या ११७ टक्क्यांनी वाढली आहे. झारखंडमध्ये अशा २५ विधानसभेच्या जागा आहेत, जेथे लोकसंख्या १२३ टक्क्यांनी वाढली आहे, ही चिंतेची बाब आहे.” ते म्हणाले की, “पाकूर जिल्ह्यातील तारानगर भागात दंगल उसळली होती. या दंगलीचे कारण म्हणजे बंगाल पोलीस आणि मालदा, मुर्शिदाबादचे लोक येऊन हिंदू लोकांना पळवून लावत आहेत. हिंदू गावे रिकामी होत आहेत.” पुढे दुबे यांनी अधिकच धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले, “बंगालच्या मालदा आणि मुर्शिदाबाद येथील लोकांनी हिंदूंवर अत्याचार केले आहेत. झारखंड पोलीस कारवाई करण्यास असमर्थ आहेत. संपूर्ण मालदा, मुर्शिदाबाद, अररिया, कटिहार, किशनगंज येथील लोकांनी हिंदूंवर अत्याचार केले आहेत. केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि या भागांचा केंद्रशासित प्रदेश म्हणून विचार करावा,” अशी मागणी असल्याचेही दुबे यांनी म्हटले.

झारखंडमध्ये बांगलादेशी मुस्लिमांच्या वाढत्या संख्येचा प्रश्न हा प्रथमच संसदेत मांडला गेला आहे. बांगलादेशी घुसखोर हा दीर्घकाळापासूनच राष्ट्रीय सुरक्षेस धोका आहे. अर्थात, तरीदेखील प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बांगलादेशी घुसखोरांना आपल्या राज्यात आश्रय देत असल्याचा आरोप भाजपकडून नेहमीच करण्यात येतो. बांगलादेशी घुसखोरांद्वारे तृणमूल काँग्रेस राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये आपापली मतपेढी तयार करत असल्याचेही आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत असतात. त्यातच बांगलादेशात सध्या सुरू असलेल्या आरक्षणविषयक आंदोलनाची झळ बसलेल्यांना आपल्या राज्यात पण मुक्तप्रवेश आणि आसरा देऊ, असे अतिशय बेजबाबदार विधानही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतेच केले होते. त्यामुळे अशाप्रकारे केवळ बंगाल अथवा झारखंडमधील काही भागच नव्हे, तर संपूर्ण देशभरातच बांगलादेशी घुसखोरांची समस्या निर्माण झाली आहे. यातून राष्ट्रीय सुरक्षेस थेट धोका आहे. हा धोका टाळण्यासाठीच केंद्र सरकारने ‘एनआरसी’ प्रस्तावित केले आहे. मात्र, या ‘एनआरसी’ला ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विरोध केला आहे. मात्र, अशाप्रकारे देशातील वनवासी समुदायासमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहत असल्यास ‘एनआरसी’ अथवा अन्य उपायांनी बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न सोडविणे आवश्यक झाले आहे, अन्यथा देशात फुटीरतावादास पोषक वातावरण निर्माण होऊ शकते.

एकीकडे बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याचवेळी दुसरीकडे पंजाबमध्ये अमृतपाल नामक नवा खलिस्तानी नेता पुन्हा एकदा उदयास आणला जात आहे. धक्कादायक म्हणजे, यावेळीही काँग्रेसद्वारे त्यास पाठिंबा आहे की काय, अशी शंका उत्पन्न होण्यास जागा आहे. कारण, यापूर्वी ८०च्या दशकात खलिस्तानी भिंद्रनवालेस तत्कालीन काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांनी मोठ्या प्रमाणात साहाय्य केल्याचे आजही बोलले जाते. देशविरोधी कारवायांच्या आरोपाखाली राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत तुरुंगात असलेल्या खलिस्तानी अमृतपाल सिंग यास काँग्रेसचे खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी लोकसभेत ज्या प्रकारे पाठिंबा दिला, ते आश्चर्यकारक आणि अस्वस्थ करणारे आहे. खलिस्तानी दहशतवादामुळे ज्या काँग्रेसच्या नेत्यांचे मोठे नुकसान झाले, अशा काँग्रेसच्या खासदाराने संकुचित राजकीय स्वार्थापोटी अमृतपाल सिंग याच्यासारख्या फुटीरतावाद्यांचे उघडपणे समर्थन करणे अकल्पनीय आहे.

लोकसभेत चरणजित चन्नी यांनी ज्या तडफेने अमृतपालचे समर्थन केले, ते पाहता त्यांना खलिस्तान्यांनी केलेली पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या, काँग्रेस नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री बेअंतसिंग यांची केलेली हत्या या गंभीर घटनांचा विसर पडल्याचे दिसते. त्यामुळेच त्यांनी मूठभर खलिस्तान्यांना आपलेसे करण्यासाठी अमृतपालची पाठराखण केली असावी. अमृतपाल सिंग सारख्या खलिस्तान्यांनी निवडणूक लढवली नसती, तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अधिक चांगली कामगिरी करू शकली असती, याचेही भान त्यांना राहिलेले नाही. चरणजीत चन्नी यांनी यापूर्वीही बेताल वक्तव्ये केली आहेत. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याला त्यांनी एकदा ‘स्टंट’ म्हटले होते. तसेच पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्याला थांबवण्यात आले, तेव्हा मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी आपल्या सुरक्षेची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाची असल्याचे सांगितले होते. चरणजितसिंग चन्नीच नव्हे, तर इतर काँग्रेस नेत्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, अमृतपाल सिंग यास पाठिंबा देऊन चन्नी केवळ पंजाबमधील खलिस्तान समर्थकांना बळ पुरवत नाहीत, तर जगातील अनेक देशांमध्ये आणि विशेषत: कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये सक्रिय असलेल्या खलिस्तानी अतिरेक्यांना आणि युरोपीय देशही भारताविरुद्ध वातावरण निर्माण करण्याची संधी देत आहेत.


 
Powered By Sangraha 9.0