"अनिल देशमुखांचा पेनड्राईव्ह करप्ट!"

26 Jul 2024 16:22:33
 
Anil Deshmukh
 
नागपूर : अनिल देशमुखांचा पेनड्राईव्ह करप्ट आहे. ते फक्त फॅशनसाठी पेनड्राईव्ह वापरतात, अशी टीका भाजप नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. तसेच त्या पेनड्राईव्हमध्ये काही असल्यास ते जनतेसमोर उघड करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. 
 
आशिष देशमुख म्हणाले की, "महाराष्ट्रात अनिल देशमुखांची ओळख ही वेगवेगळ्या कॉलरचे शर्ट घालणं, वेगवेगळ्या रंगाचे कुर्ते आणि रंगीबेरंगी जॅकेट घालणं अशी आहे. त्यामुळे फॅशनेबल असलेले अनिल देशमुख फक्त फॅशन म्हणून पेनड्राईव्ह दाखवत आहेत. त्या पेनड्राईव्हच्या आतमध्ये काहीच नाही. तो पेनड्राईव्ह नक्कीच करप्ट आहे. त्यामुळे अनिल देशमुखांनी त्यांच्या पेनड्राईव्हमध्ये नक्की काय आहे , हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावं," असे आवाहन त्यांनी केले आहे.
 
हे वाचलंत का? -  वंचित बहुजन आघाडीकडून राज्यात 'आरक्षण बचाव यात्रा'!
 
ते पुढे म्हणाले की, "यावर्षी अनिल देशमुख यांच्याऐवजी त्यांचे पूत्र काटोल विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढवणार आहेत, ही बातमी परवाच ऐकली. संपूर्ण प्रकाशझोत या बातमीकडे जात असल्याने अनिल देशमुखांनी आता काही आरोप केले आहेत. शिवाय अनिल देशमुखांवर नवीन मतदारसंघ शोधण्याची वेळ आल्याने ते देवेंद्र फडणवीसांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघावर डोळा ठेवून त्यांच्यावर खोटे आरोप करत आहेत. त्यामुळे या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. मागील दीड वर्षांपासून अनिल देशमुख शांत बसले आणि आता निवडणूकीच्या तोंडावर त्यांच्याकडे मतदारसंघ उरलेला नसल्याने ज्यांच्या विरोधात लढायचं आहे त्यांच्या विरोधात खोटे आरोप करुन माध्यमांमध्ये जागा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0