ठाण्यात पावसाचा असाही फटका, पोलीस भरती पुढे ढकलली

    25-Jul-2024
Total Views |
thane city police recruitment


ठाणे :   
  ठाण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी पहाटेपासुन चांगलेच धुमशान मारले. तलावांचे शहर असलेल्या ठाणे शहरातील तलाव भरले असुन अनेक सखल भागात पाण्याचे तळे साचल्याने जनजीवन विस्कळित झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ४८ वृक्षांची पडझड होऊन दोघेजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या. यातील वृद्ध शशिकांत कर्णिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे प्रशासनाने सांगितले.

संततधार पावसाची चिन्हे पाहुन तसेच हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवारच्या दुपारच्या सत्रासाठी सुट्टी जाहिर केली. ठाणे स्थानकात मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बरची उपनगरी वाहतुक विलंबाने सुरू होती. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी व्हीसी द्वारे परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या.


पोलीस भरती पुढे ढकलली

हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने ठाण्यात सुरू असलेल्या पोलीस भरतीला फटका बसला आहे. साकेत मैदानात गुरुवारी लांबुन आलेल्या महीला पोलीसांच्या शारिरीक मोजमाप व मैदानी चाचण्या ३१ जुलै रोजी पुढे ढकलण्यात आल्यात. तर २६ आणि २७ जुलै रोजी होणारी भरती १ आणि २ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी दिली.