प्रत्येकजण राजकीय अभिनिवेशातून सत्ताधारी पक्षावर टीका करत असतो

राज ठाकरेंच्या विधानाला दरेकरांचे प्रत्युत्तर

    25-Jul-2024
Total Views |
pravin darekar on raj thackeray


मुंबई :       पक्षाला निवडणुकीला सामोरे जायचे असेल तर सत्ताधारी पक्षावर टीका करण्याशिवाय दुसरा मार्ग कोणता असतो? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय होतेय, असे चोख प्रत्युत्तर भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी राज ठाकरेंना दिले आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर विधान केले होते या विधानाला प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले, गरीब, गरजू महिलांना एक आधार वाटतो. कोट्यवधीची नोंदणी होते असून प्रत्येकजण राजकीय अभिनिवेशातून किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षावर टीका करत असतो, असे दरेकर म्हणाले.

दरेकर म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येक पक्षाला २८८ जागा लढण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाचे महाराष्ट्रात कार्यकर्ते आहेत. ते जास्तीत जास्त जागा लढविणे स्वाभाविक असून जागा लढवून कार्यकर्त्यांची फळी कार्यरत होते. आपण कशा जागा लढवल्या पाहिजेत हा प्रत्येक पक्ष प्रयत्न करतो आहे. निवडणुकीत युत्या, आघाड्या नेमक्या कशा होणार हे अद्याप अधांतरी आहे. त्याचपद्धतीने राज ठाकरे आणि मनसे जास्तीच्या जागा लढविण्याचा प्रयत्न करताहेत, जो प्रत्येक पक्ष करत असतो, असेही दरेकर म्हणाले.

संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांचे नावच टीकाकार आहे. ते सकाळी उठून कधी चांगले बोललेत अशी एखादी पत्रकार परिषद दाखवावी. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपावर टीका करणार. संजय राऊत यांनी एकदा तरी शुभ बोलावे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून गरीबाच्या कल्याणाच्या एवढ्या चांगल्या योजना आल्या आहेत. जर काही चुकीचे निदर्शनास आले तर ते दुरुस्त करण्याची मानसिकताही आमच्याकडे आहे, असेही दरेकरांनी सांगितले.
 
 
भाजप निवडणुकीच्या ॲक्शन मोडमध्ये, खरी गोष्ट ताकदीने जनतेसमोर मांडणार

भाजपा निवडणुकीच्या ॲक्शन मोडमध्ये आली आहे. लोकसभा निवडणुकीत चांगले काम करूनही, पंतप्रधान मोदींनी १० वर्ष देशासाठी समर्पित भावना घेऊन केवळ फेक नरेटिव्हच्या आधारे लोकांमध्ये जाऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारचा कुठलाही धोका पत्करायला आम्ही तयार नाही अशावेळी फेक नरेटिव्ह तळागाळात करून जे वातावरण कलूषित करताहेत याबाबत पक्ष अलर्ट मोडवर आहे. आता चुकीचे काही जाऊ देणार नाही, खरी गोष्ट ताकदीने सर्वसामान्य जनतेसमोर मांडणार असल्याचेही दरेकरांनी म्हटले.