सेवा परमो धर्म:

    25-Jul-2024
Total Views |
pramod shreerang kale


आपल्या शिक्षणाच्या आणि कार्याच्या प्रदीर्घ अनुभवातून दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणार्‍या आणि आयुष्याच्या उत्तरार्धातही ‘सेवा परमो धर्म:’ या समर्पित वृत्तीने कार्यरत पुण्यातील प्रमोद श्रीरंग काळे यांच्याविषयी...
 
स्वार्थी भावनेने कार्यरत व्यक्ती आणि संस्थामुळेच आपल्या समाजात आजही सकारात्मकता चिरंतन टिकून आहे. ‘सेवावर्धिनी’ ही संस्था त्यांपैकीच एक. याच संस्थेसाठी अगदी तन्मयतेने, प्रामाणिकपणे काम करणार्‍या एका व्यक्तीची ही ओळख करुन देणे म्हणूनच गरजेचे वाटते. प्रमोद श्रीरंग काळे हे पुण्यातील एक असेच व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कार्याचा आवाका भव्यदिव्य नसला, तरी ते जे काम करतात ते समाजहितासाठी दीपस्तंभच.

लहानपणी अतिशय वांड, कृष्णा नदीच्या अंगाखांद्यावरती मनसोक्त खेळलेले, उत्तम पोहणारे, अनेक मित्रमंडळींमध्ये त्यांच्या गराड्यामध्ये सदैव आनंद मानणारे, नातेसंबंध जपणारे प्रमोद काळे. असे हे मनमिळावू व्यक्तिमत्त्व साहजिकच संघ परिवारातदेखील रमले. आपल्या मित्रपरिवारात ‘प्रमोद काका’ म्हणून आवडते असणार्‍या प्रमोदजींनी ‘महाराष्ट्र बारव समिती’वर सदस्य म्हणून कार्य करताना अनेक उपयुक्त सूचनाही केल्याआहेत.

प्रमोद काळे 1972 सालचे स्थापत्यशास्त्र पदवीधर (अभियंता). 1972 ते 2008 या कालावधीत शासनाच्या जलसंपदा विभागात ते कार्यरत होते. 2008 साली कार्यकारी अभियंता म्हणून निवृत्त झाल्यानंतर आपल्यातील या कलागुणांचा उपयोग समाजासाठी व्हावा म्हणून निवृत्तीनंतरचे जीवन ऐषोरामात न घालवता, सक्रिय राहण्यास त्यांनी प्राधान्य दिले आणि राज्याच्या भविष्यातील पिढ्यांसाठी आतापासून जे कार्य करून ठेवायला हवे, अशा कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले.

प्रमोदजींनी 1991 सालापासून ‘हायड्रोलॉजी’ विषयाचा अभ्यास केला आणि त्यानंतर 2015 साली ‘इंडोलॉजी’ विषयात पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. प्राचीन स्थापत्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला. ‘सेवावर्धिनी’ या समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणार्‍या संस्थेचे ते तज्ज्ञ सल्लागार म्हणून सध्या सक्रिय आहेत. 1972 ते 2008 शासनाच्या जलसंपदा विभागात सेवा भाटघर धरण मजबुतीकरण, भंडारा जलविद्युत प्रकल्पातील विद्युतगृह एकचे संपूर्ण काम अशा महत्त्वपूर्ण कामांमध्ये त्यांचे योगदान अतिशय बहुमूल्य असेच.

1991 सालापासून ‘हायड्रोलॉजी विषयाचा अभ्यास केल्यावर याचा लाभ त्यांनी कृष्णा खोर्‍यातील क्षेत्राचा विशेष अभ्यास करून महाराष्ट्रातील प्रकल्पांना ‘हायड्रोलॉजी’च्या उपयुक्ततेबाबत मान्यता मिळवण्याचा प्रयत्न आणि प्रत्यक्ष कार्य केले. केंद्रीय जल आयोगामध्ये कृष्णा खोर्‍याचा जलसंपत्तीविषयक सल्लागार म्हणूनदेखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सेवानिवृत्तीनंतर ‘गोदावरी खोरे विकास महामंडळा’अंतर्गत पूस, अरुणावती, कयाधू व पैनगंगा या चार खोर्‍यांचा बृहत आराखडा बनवण्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे.

येथील ‘सेवावर्धिनी’ने अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जन्मशताब्दीनिमित्त जे महाराष्ट्रात 300 बारवांचे काम हाती घेतले आहे, त्यासाठी प्रमोदकाका तन, मनाने कार्यरत झाले असून, यासाठी त्यांच्या अनुभवातून ते मार्गदर्शन करीत आहेत. नगर जिल्ह्यातील नुकत्याच मुक्ताई बारवाचे जे उद्घाटन झाले, त्यातदेखील प्रमोदकाकांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी याबाबतीत योग्य मार्गदर्शन केल्याने हे सर्व शक्य झाले. यासाठी काकांनी जी कामगिरी केली, ती अतिशय मौलिक अशीच!
 
विशेष म्हणजे, पाणी हा विषय अलीकडील काळात अतिशय महत्त्वाचा होत चालला आहे. पाणीटंचाई आणि अन्य संकटांवर मात करायची असेल, तर समाजात आता जलतज्ज्ञांची, त्यांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज. समाजासाठी विशेषतः भावी पिढ्यांसाठी हे संकट काळ बनून येता कामा नये, म्हणून आजपासूनच कार्य करीत राहिले पाहिजे, अशी भावना असणे गरजेचे. प्रमोदकाका हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण. आपल्या संपूर्ण कारकिर्दीतील याबाबतच्या अनुभवाचा उपयोग आता समाजासाठी झाला पाहिजे, म्हणून त्यांची चाललेली धडपड ही प्रेरक तर आहेच, मात्र तितकीच स्पृहणीय!

याशिवाय, ‘सेवावर्धिनी’ जो ‘एक मूठ धान्य’ हा उपक्रम राबवित असते, त्यातदेखील प्रमोदकाकांचा सक्रिय सहभाग अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा. पुण्यातील करिश्मा सोसायटी, आनंद, स्वप्नशिल्प, किनार तसेच तारा सोसायटीत जाऊन ते अन्नधान्य संकलित करतात. त्यांनी जवळपास 2 हजार, 500 किलो धान्य गोळा करून ‘सेवावर्धिनी’च्या उपक्रमांतर्गत निरनिराळ्या अनाथाश्रम आणि वसतिगृहांसाठी पाठविण्यास पुढाकार घेतला. असे हे अतिशय निगर्वी, नि:स्वार्थी भावनेने कार्यरत प्रमोदकाका...

मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारांची अजिबात पर्वा न करता, काकांनी स्वत:ला सेवाकार्यात सातत्याने गुंतवून ठेवले आहे, हे येथे आवर्जून नमूद करावेच लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात रमलेल्या काकांनी संघकार्याची शिकवण प्रत्यक्षात अमलात आणताना इतरांसाठी नक्कीच आदर्श प्रस्थापित केला आहे, असे म्हणता येईल. त्यांच्या या समाजकार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
(अधिक माहितीसाठी संपर्क - 9881400296)

 
अतुल तांदळीकर