भरकटलेले आणि दिशाहीन आंदोलन

    25-Jul-2024
Total Views |
manoj jarange suspends hunger strike
 

गांभीर्य गमावून बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाचे आंदोलन हे पूर्णत:भरकटलेले आणि दिशाहीनच! समाजाच्या उत्थानापेक्षा थेट फडणवीसांना राजकारणातून संपवण्याची, भाजपला निवडणुकीत पाडण्याची भाषा करणार्‍या जरांगे पाटलांच्या उक्ती आणि कृतीतून आता दर्प येतो तो केवळ जातीच्या आडून खेळल्या जाणार्‍या राजकीय षड्यंत्राचा!

जेलमध्ये गेलात तरी देवेंद्र फडणवीस यांना संपवा, जात संपवायला निघालेल्या पक्षासोबत राहू नका,” असे खळबळजनक विधान नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी केले. कालपरवापर्यंतचे आमरण उपोषण त्यांनी केव्हा आणि का मागे घेतले हे स्पष्ट झाले नसले, तरी आता ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. ते म्हणे आता विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण कायमचे संपवण्याचा विडाच (की सुपारी?) जरांगे पाटलांनी घेतलेला. उपोषण करत बसले की, निवडणुकीची कामे होत नाहीत, असे त्यांनी म्हणा मागेच म्हटले होते. मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देणारे हेच फडणवीस होते. ते टिकवता आले नाही, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला, ज्यात काँग्रेससह शरद पवारही सहभागी होते. असे असतानाही, ‘राजकारण मात्र फडणवीस यांचे संपवा,’ असेच मराठा समाजाला जरांगेंनी केलेले आवाहन, त्यांच्या हेतूची पोलखोल करणारे ठरावे. आजवरचे चित्र पाहता, मनोज जरांगे यांचा हा सगळा तुघलकी कारभार. म्हणजेच, या आंदोलनामागे शरद पवारच आहेत, असे जे वारंवार आरोप केले जातात, ते कुठे तरी सत्य असल्याचेच जरांगेंच्या उक्तीतून आणि कृतीतून आता स्पष्ट व्हावे.
 
मराठा समाजाला आरक्षण देण्यास शरद पवारांनीच विरोध केला होता, हे सत्य ज्ञात असूनही शरद पवारांविरोधात एक शब्दही जरांगे यांनी का उच्चारला नाही? त्यांनी नाही दिले तर तुम्ही द्या की, अशी बोटचेपी भूमिका त्यांनी का घेतली? हे सगळे ठाकरे आणि शरद पवार कंपनीच्या सांगण्यावरून होत आहे, म्हणून जरांगे यांची जीभ पवारांविरोधात बोलायला रेटत नाही का? मुळात पहिल्या दिवसापासूनच, जेव्हा शरद पवार आंतरवली सराटीला जरांगे यांच्या भेटीला रात्री उशिरा पोहोचले होते, त्यानंतरच आरक्षणासाठीचे आंदोलन भरकटत गेले. पोलिसांवर तुफान दगडफेक त्यानंतरच करण्यात आली. यात महिला पोेेलीसही गंभीर जखमी झाल्या. त्यानंतरच पोलिसांना नाइलाजास्तव लाठीमार करावा लागला. मात्र, जरांगे आरोप करतात की, पोलिसांनी विनाकारण आंदोलकांवर लाठीमार केला. आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर दगडफेक करणारे ते समाजकंटक कोण होते? त्या समाजकंटकांनी नेमक्या कोणाच्या सांगण्यावरून पोलिसांवर दगडफेक केली?

त्यामुळे सत्य हेच की, जरांगे यांचे आंदोलन आता मुळीच समाजहिताचे राहिलेले नसून, या आंदोलनाने पूर्णपणे राजकीय रंग धारण केला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, ही जरांगेंची मूळ मागणी. त्याची महायुती सरकारने यथायोग्य दखलही घेतली. तथापि, जरांगेंचा जो बोलवता धनी आहे, त्याने इशारा करावा आणि जरांगेंनी रोज नवनवीन मागण्या कराव्या, असे घडलेले अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे असतानाही, फडणवीस यांना आरक्षण द्यायचे नाहीये, असा आरोप जरांगे सातत्याने करत राहिले. जरांगे यांच्या सर्व मागण्यांची पूर्तता महायुती सरकारकडून केली गेली, तरीही ते ‘फडणवीस यांना संपवा’ अशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांविषयी असंविधानिक, अश्लाघ्य भाषा वापरत असतील, तर ‘फडणवीस नेमके कोणाला नको आहेत’ हेच स्पष्ट होते. आंदोलन काळातही उद्धव ठाकरे आणि शरद पवार जे बोलतात, तीच भाषा जरांगे वापरत होते. ज्यांच्या काळात फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, त्या ठाकरे-पवारांच्या विरोधात अवाक्षरही जरांगे उच्चारत नव्हते. त्यांचा सर्व रोख आणि रोष फडणवीस यांच्यावरच राहिला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी शब्द दिल्याप्रमाणे आंदोलनात केलेल्या सर्व मागण्या मान्य करून झाल्या. मुंबईत गुलालही उधळून झाला. त्यानंतरही केवळ राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा खाट घातला. त्यांच्या काही वैयक्तिक कारणांस्तव त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पेटवले. जरांगेंची सर्वात धक्कादायक मागणी म्हणजे, मुस्लीम समाजालाही आरक्षण द्या. घटनेने धर्मावर आधारित आरक्षण देण्यास प्रतिबंध केला असतानाही, ज्या संविधानाला वाचवण्याची उबळ काँग्रेसला येते, त्याच काँग्रेसने कर्नाटकात घटनाकारांचा अवमान करत, मुस्लिमांना आरक्षण दिले आहे.

पण, व्यासपीठ कोणतेही असो - जरांगेंचा रोख एकाच व्यक्तीवर असतो आणि ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. जरांगे यांना फडणवीस का नको आहेत, हे नुकत्याच घडत असलेल्या घडामोडींवरून स्पष्ट होते. मंत्री गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या आरोप प्रकरणात, मविआ सरकारच्या काळातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांचादेखील जबाब सीबीआयकडून नोंदवला गेला होता. मुंढे यांनी आपल्या जबाबात अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गिरीश महाजन यांच्यावरील गुन्हा दाखल करून घेण्यासाठी अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता, असा आरोप मुंढे यांनी केला आहे. 100 कोटींच्या वसुलीचा आरोप ज्यांच्यावर आहे, त्या देशमुख यांनी यासाठी चार ते पाच वेळा मुंढे यांना दूरध्वनी केला होता. त्यांच्यावर दबाव आणल्याचे आता स्पष्ट होते. महाजन यांना अडकवण्यासाठी कट रचला गेला, असा आरोप ‘सीबीआय’ने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जो ‘सीडी धमाका’ केला होता, त्याचा हा परिणाम आहे.

जरांगे वारंवार फडणवीस यांच्याविरोधात अपशब्दांचा वापर करतात, त्यांना संपवण्याची भाषा करतात, ते केवळ त्यांच्या ब्राह्मणद्वेषातून नव्हे, तर ही व्यक्ती पुन्हा सत्तेवर आली, तर इतरांचे घोटाळे बाहेर काढेल, याचा धसका जरांगे आणि त्यांच्या बोलवत्या धनींनी घेतला आहे. ठाकरे आणि पवार कंपनीला म्हणूनच फडणवीस नको. मराठा समाजाला आरक्षण फडणवीस यांनीच दिले. मराठा समाजाच्या हितासाठी सर्वोपरि उपाययोजना त्यांनीच राबविल्या. असे असतानाही, आगामी विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनाच संपवण्याची भाषा ही निव्वळ राजकीय विरोधातूनच. यात मराठा समाजाचे नेमके कोणते हित आहे, ते जरांगे यांनी स्पष्ट करावे. त्यांचे मागील आंदोलन लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापेपर्यंत सुरू राहिले. आता पुन्हा विधानसभेच्या हालचाली सुरु होताच जरांगेंना जोर आला. जरांगे यांचे हे कितवे आमरण उपोषण आहे, हेच आता तपासून बघावे लागेल. महायुती सरकारला नव्हे तर भाजपच्या उमेदवारांना पाडण्याचे त्यांनी केलेले आवाहन, जरांगे हे समाजासाठी नव्हे, तर राजकीय फायद्यासाठीच आहे, हे स्पष्ट करणारे. समाजासाठी आंदोलन करणारी व्यक्ती कशी नसावी, याचे म्हणूनच जरांगे हे उत्तम उदाहरण!