कारगिलची संस्मरणीय शौर्यगाथा...

    25-Jul-2024
Total Views |
loc kargil india pakistan war


1999च्या जुलै महिन्यात कारगिल युद्धाच्या निमित्ताने काश्मीर प्रश्न पुन्हा उकरून काढण्याचा पाकिस्तानचा कुटिल डाव फसला. आजच्याच तारखेला ठीक 25 वर्षांपूर्वी म्हणजे दि. 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. भारतीय जवानांनी आपल्या बलिदानाने ही ऐतिहासिक शौर्यगाथा लिहिली. असा हा आजचा दिवस म्हणूनच दरवर्षी ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने कारगिलच्या शौर्यगाथेचे स्मरण करुन देणारा हा लेख...

पाकिस्तानने कारगिलपूर्वी तीन युद्धांत (1947, 1965 व 1971) काश्मीरला भारतापासून तोडण्याचे निष्फळ प्रयत्न केले होतेच. पण, तेव्हाही पाकिस्तानला पराभवाचाच सामना करावा लागला. पाकिस्तानी लष्कराने सियाचीन हिमनदचा प्रदेश गिळंकृत करण्याचा प्रयत्नदेखील केला, पण भारताने तोही हाणून पाडला. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी ऑक्टोबर 1998 मध्ये जनरल परवेझ मुशर्रफ यांना सरसेनापतीपद बहाल केले. त्यावेळी मुशर्रफ आणि ‘आयएसआय’ (पाकिस्तानी गुप्तहेर संघटना) या दोहोंच्या दृष्टीने काश्मीर प्रश्न पेटता राहणे आवश्यक होते. कारगिल भागात घुसखोरी केल्याने पाकिस्तानचे दोन उद्देश साध्य होणार होते. एक म्हणजे, काश्मीरचा प्रश्न नव्याने धुमसणार होता आणि दुसरे म्हणजे, कारगिलमधील घुसखोरीमुळे सियाचीनचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार होती. पण, या काळात उभय देश अण्वस्त्रसज्ज होते. या परिस्थितीत भारतावर सरळ हल्ला करणे धोक्याचे होते. तरी, घुसखोरी तंत्राचा वापर करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील होता. त्याच रणनीतीचा भाग कारगिल युद्धाच्या निमित्ताने दिसतो.

मुशर्रफ यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन अल्-बदर’ मोहिमेची आखणी करण्यात आली. ऑक्टोबर 1998 ते मार्च 1999 या कालावधीत पाकिस्तानकडून ताबारेषेपर्यंत रस्त्यांची डागडुजी केली गेली. खेचरांसाठी पायवाटा बनविण्यात आल्या. पुरवठातळ उभे करून त्यांच्यात जड शस्त्रास्त्रे, खाण्यापिण्याचे पदार्थ, दारूगोळा, बर्फातील बूट इत्यादींचा साठा करण्यात आला. कारगिल 16 हजार फूट उंचीवरील हिमालयीन पर्वतशिखरांचा प्रदेश. या भागात विशेषत: ऑक्टोबर ते मे दरम्यान कडाक्याची थंडी असते. त्यामुळे काही निमित्तमात्र टेहळणी चौक्या कार्यरत ठेवून तिथे तैनात असलेल्या लष्कराच्या तुकड्या हिवाळ्यात खालच्या भागात येतात. 1971 पासून हे असेच सुरू आहे. हा प्रदेश युद्धजन्य हालचालींसाठी अवघड आणि हिवाळ्यात सैनिकी कारवाईसाठी अतिशय कठीण असल्यामुळे सैन्य मागे घेणे, हा नेहमीच्या रणनीतीचा भाग होता. पण, या परिस्थितीचा पाकिस्तान लष्कराने लाभ उठवण्याचा नापाक डाव रचला.

पाकिस्तानने 1999च्या जानेवारी आणि फेब्रुवारी या काळात सर्वप्रथम टेहळणी पथके कारगिल क्षेत्रात पाठविली. त्यानंतर मार्चमध्ये ‘नॉर्थ लाईट इन्फन्ट्री’च्या पलटणीच्या तुकड्यांनी आगेकूच केली. प्रत्येक ठाण्यात 40 ते 60 पाकिस्तानी सैनिकांच्या तुकड्या तैनात झाल्या. या ठाण्यांना मशीनगन, रॉकेट लाँचर, स्वयंचलित ग्रेनेड लाँचर, मॉर्टर, विमानविरोधी तोफा आणि विमानांवर अचूक मारा करणारी (अफगाणिस्तानातून पळविलेली) ‘स्टिंगर’ ही अत्याधुनिक शस्त्रास्त्रे देण्यात आली. भूसुरुंग पेरण्यात आले. 1998-99चा हिवाळा सौम्य असल्यामुळे हे काम सुकर झाले. दि. 4 मे रोजी मेंढपाळांकडून कारगिलमधील घुसखोरीची बातमी भारतीय लष्कराला मिळाल्यावर प्रत्युत्तरादाखल कार्यवाही सुरू झाली. ‘अल्-बदर’ मोहिमेची तयारी 1998 पासून चालू झाली, तरी तिची चाहूल मे 1999च्या पहिल्या आठवड्यापर्यंत भारतीय यंत्रणांना लागू नये, ही एक अक्षम्य त्रुटी होती. या अवघड आणि प्रतिकूल वातावरणात शत्रू हालचाली करू शकणारच नाही, या चुकीच्या पूर्वाग्रहाने भारतीय लष्कर गाफील राहिले.

पाकिस्तानने सुरुवातीला कारगिलमध्ये सीमा ओलांडून आलेले हे घुसखोर काश्मीर स्वतंत्र करण्यासाठी लढणारे स्वातंत्र्यसैनिक असून त्याचा पाकिस्तान सेनेशी संबंध नसल्याचा दाखविले गेले. पण, लढण्याचे तंत्र व शस्त्रसाधन सामग्रीमुळे पाकिस्तानी लष्कराचा प्रत्यक्ष सहभाग लपून राहिला नाही. पाकिस्तानची रणनीती अतिशय स्पष्ट होती. कारगिल व त्याच्या दक्षिणेकडील डोंगररांगांवर ताबा मिळवून लेह-श्रीनगर महामार्गावर व सियाचीनकडील भारताचा संपर्क खंडित करणे, युद्धाचा काळ लांबवून काश्मीर प्रश्न पुन्हा चर्चेत आणणे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारतीय लष्कराने शत्रूविरोधात मोहीम उघडली. या मोहिमेला ‘ऑपरेशन विजय’ हे नाव देण्यात आले.

भारताची युद्ध रणनीती दोन भागांत होती. पहिली-ताबारेषा न ओलांडता घुसखोरांना मागे रेटणे आणि दुसरी-कारगिलमधील घुसखोरी मागे घेण्यास पाकिस्तानला भाग पाडणे. जनरल व्ही. पी. मलिक यांच्या नेतृत्वात कारगिलची लढाई म्हणजे उत्कृष्ट रणनीतीचे उत्तम उदाहरण ठरले. त्याच्या जोडीला हवाईदलाचे प्रमुख विंग कमांडर व्ही. एस. धनोआ यांच्या नेतृत्वात हवाईदलाने ‘ऑपरेशन सफेदसागर’ व व्हॉईस अ‍ॅडमिरल माधवेंद्र यांच्या नेतृत्वात नौदलाने ‘ऑपरेशन तलवार’ मोहीम हाती घेतली. पूर्व-पश्चिम किनार्‍यावरील नाविकदल एकत्र येत कराची बंदराची नाकेबंदी करून पाकिस्तानवर दबाव निर्माण केला. शत्रूच्या बंदुकीच्या गोळीचे उत्तर तोफगोळ्यांनी देण्यात आले. या युद्धात ‘बोफोर्स’ तोफांचा वापर निर्णायक ठरला. 4 जुलै रोजी संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर ताबा मिळविला. कारगिल युद्धातील ही सर्वात अवघड मोहीम ठरली. यावेळी ‘बोफोर्स’ तोफांचा वापर निर्णायक ठरला.

पराभवाची चिन्हे दिसू लागताच, नवाझ शरीफ यांनी 5 जुलै रोजी सैन्य मागे घेत असल्याची औपचारिक घोषणा केली. पाकिस्तानच्या कुटिल रणनीतीला सुरुवातीला जरी यश मिळाले, तरी सामरिक रणनीतीत भारतापुढे ते तोकडे पडले. प्रत्येक टप्प्यावर पाकिस्तान लष्कराची रणनीती फोल ठरली. सरळसोट कडे, दुर्गम पायवाटा, सात-आठ हजार फूट शत्रूच्या नजरेखाली चढून जाताना होणारी दमछाक, अंगावर जड कपडे, पाठीवर शस्त्र, दारूगोळा आणि खाण्याच्या सामानाचे अवजड वजन हे सगळे पेलत दुर्गम पर्वतराजींच्या शिखरांवर ठाण मांडून बसलेल्या पाकिस्तानी मोर्चांवर हल्ला चढविणे व शस्त्राने सुसज्ज घुसखोरांना ताबारेषेमागे रेटणे, ही खडतर कामगिरी होती.

भारतीय लष्कराने अतुल्य पराक्रमाने ही अवघड मोहीम फत्ते केली. त्यामुळेच दि. 26 जुलै 1999 च्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्याचा ऐतिहासिक दिवस म्हणून संपूर्ण देशात ‘कारगिल विजय दिवस’ मोठ्या उत्साहाने साजरा करून हुतात्मा जवानांना वंदन केले जाते.

डॉ. गिरीश गावित