माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करणार

25 Jul 2024 18:50:57
former soldier mahamandal maharashtra


मुंबई :     माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, ब्रिगेडीअर सावंत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजल जाधव आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी माजी सैनिकांच्या विविध विषयांसंदर्भात आढावा घेण्यात आला. खारघर येथे माजी सैनिकांसाठी विश्रामगृह, मेस्को महामंडळामार्फत होणारे उपक्रम, माजी सैनिकांचे वेतन, मुंबईमध्ये संग्रहालय उभारणे, सातारा जिल्ह्यातील सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या अपशिंगे गावाला विशेष दर्जा देऊन तेथे विकासकामे करणे, माजी सैनिकांना टोल मध्ये सवलत आदी विविध विषयांबाबत सविस्तर चर्चा झाली.

सैनिकांनी देशासाठी जीवाची पर्वा न करता सीमेवर कर्तव्य बजावले आहे. अशा माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विभागाच्या सचिवांना दिले. माजी सैनिकांच्या विश्रामगृहाला सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर येथे जागा देण्यात आली आहे. तेथे विश्रामगृहाच्या कामाला तातडीने सुरूवात करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन सदैव सकारात्मक असून त्यासाठी विभागाने माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.



Powered By Sangraha 9.0