स्मार्टरोडचा बकालपणा 7 दिवसांत दूर करा, नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन

माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांचा इशारा

    25-Jul-2024
Total Views |

samal
 
 
कल्याण  : कडोंमपा प्रशासनाने आपल्या अब्रूचे धिंडवडे काढण्याचा चंग बांधला आहे की काय असा प्रश्न निर्माण व्हावा असा संतप्त प्रकार समोर आला आहे. मोठा गाजावाजा करत बांधण्यात येत असलेल्या कल्याण पश्चिमेतील स्मार्टरोड हा बकालपणाचा अड्डा झाला असून हा बकालपणा 7 दिवसांत दूर करा अन्यथा शिवसेनास्टाईल आंदोलन करून हा रस्ता बंद करू. आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी कडोंमपा प्रशासनाची असेल असा इशारा माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी दिला आहे.
मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि नवी मुंबईतील पाम बीच रोडच्या धर्तीवर कल्याणातही एक सुंदर असा रस्ता असावा या दृष्टीकोनातून या स्मार्ट रोडला मंजुरी देण्यात आली. थोडेथोडके नव्हे तर तब्बल 60 कोटी रुपये खर्च करून कल्याण पश्चिमेच्या रौनक सिटी येथील रिंग रोड ते माधव संकल्प पर्यंत हा स्मार्ट रोड उभारण्यात येत आहे. या रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून याठिकाणी आता आवश्यक सोयी सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. ज्यामध्ये सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, ई व्ही गाड्या चार्जर आदी सुविधांचा समावेश आहे.
यापैकी सायकल आणि जॉगिंग ट्रॅकचे काम पूर्ण झाले असून त्याजागी आता खाण्याच्या अनधिकृत गाड्या, फेरीवाले, अनधिकृत मंडप उभे राहिले असल्याचे सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी सांगितले. तर याहून कहर म्हणजे येथील गोदरेज हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर कडोंमपाच्या कचऱ्याच्या अनेक गाड्या उभ्या असून त्याठिकाणी रस्त्यावर सर्वत्र कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचा धक्कादायक प्रकारही समेळ यांनी उघडकीस आणला आहे. ज्यामुळे इथल्या नागरिकांना नाक मुठीत धरून आणि फुटपाथ असूनही चालायला जागा नसल्याने जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे.
नागरिकांच्या करांमधून आलेल्या पैशांतून हा स्मार्ट रोड बांधण्यात येत असून कडोंमपा प्रशासन, प्रभाग अधिकारी, घनकचरा विभागाचे उपायुक्त यांना हा गलिच्छपणा दिसत नाही का ? की या सर्व अनधिकृत खाद्यपदार्थांच्या गाड्या, फेरीवाल्यांशी त्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याने कारवाई केली जात नाही असे प्रश्नही समेळ यांनी उपस्थित केले आहेत.
तर कडोंमपा प्रशासनाने या स्मार्ट रोडवरील हा बकालपणा आणि गलिच्छपणा 7 दिवसांच्या आत दूर केला नाही तर आपण शिवसेना स्टाईल हा रस्ता बंद पाडू आणि त्याची संपूर्ण जबाबदारी कडोंमपा प्रशासनाची असेल अशा शब्दांत श्रेयस समेळ यांनी इशारा दिला आहे.
दरम्यान आधी शहर, स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी, मग रस्त्यांवरील खड्डे आणि आता स्मार्ट रोडवरील हा बकालपणा याद्वारे कडोंमपा स्वतःहून आपल्याच भोंगळ कारभाराचे धिंडवडे काढत आहे. ज्याला या शहरांतील जनता पार कंटाळून गेली आहेत. ज्यामुळे कडोंमपा प्रशासनाच्या या नाकर्तेपणाचे खापर आणि परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.