मुंबई : लाडकी बहिण लाडका भाऊ एकत्र राहिले असते तर पक्ष टिकला असता, असा खोचक टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना लगावला आहे. रंगशारदा सभागृहात आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, "भविष्यात येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय वाढून ठेवतोय याकडे लक्ष द्यायला हवं. पण आमच्याकडे पाणी, आरोग्य, नोकरी या प्रश्नांवर लक्ष द्यायला वेळ नाही. आमच्याकडे लाडकी बहीण, लाडका भाऊ सुरु आहे. जर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. त्यासाठी योजना कशाला हव्यात? मुळात राज्य सरकारकडे त्यासाठी पैसे आहेत का? त्यांच्याकडे रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत," असा टोला त्यांनी लगावला.
हे वाचलंत का? - "रिकामे पेनड्राईव्ह दाखवून दिशाभूल करु नका!"
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्राच्या मूळ प्रश्नांकडे आपण सर्वांनी लक्ष द्यायला हवं. हाच येणाऱ्या विधानसभेचा प्रचार असायला हवा. फक्त एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं, यामुळे काहीही हाताला लागणार नाही," असेही ते म्हणाले. तसेच जिथे जिथे घरात पाणी शिरलंय तिथे प्रत्येक घरात जाऊन मदत करा, असे आवाहनही त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केलं.