कट्टरपंथी माजिद फ्रीमनवर लंडनमध्ये गुन्हा दाखल; हिंदूंविरोधात दंगल घडवण्याचे रचले होते षडयंत्र

25 Jul 2024 16:24:31
 Majid Freeman
 
लंडन : २०२२ मध्ये ब्रिटनमधील लीसेस्टरमध्ये हिंदूंविरुद्ध हिंसाचार भडकावणारा कट्टरपंथी माजिद फ्रीमनवर सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. त्याने दहशतवादी संघटना हमासला प्रोत्साहन दिल्याचे आणि फ्रान्समधील चार्ली हब्दोवरील हल्ल्याचे समर्थन केल्याचे आरोप आहेत.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ३६ वर्षीय माजिद नोवसारकाला बुधवार, दि. २४ जुलै २०२४ न्यायालयात हजर करण्यात आले. माजिदवर आरोप आहे की, त्याने दहशतवादी संघटना हमासच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. हमास ही ब्रिटनमधील प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे. याशिवाय माजिदने २०१५ मध्ये चार्ली हब्दो या फ्रेंच मासिकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे समर्थन केले होते आणि लोकांना अशाच प्रकारचा हल्ला करण्यास प्रवृत्त केले होते.
  
चार्ली हब्दोवर हा हल्ला आयएसआयएसने केला होता, कारण त्याने प्रेषित मुहम्मद यांचे व्यंगचित्र प्रकाशित केले होते. माजिद फ्रीमनला दि. ९ जुलै २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला काही अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. माजिदला सोशल मीडियावर पोस्ट करण्यास आणि घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. आता त्याच्यावरील खटला सुरूच राहणार आहे.
 
माजिद फ्रीमन हा लीसेस्टरमधील रहिवाशी आहे. लीसेस्टर हिंसाचाराच्या वेळी, माजिद हिंदूंविरुद्ध हिंसाचार भडकावणाऱ्या खोट्या बातम्या पसरवण्यात आघाडीवर होता. दि. २८ ऑगस्ट २०२२ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० सामन्यातील पराभवानंतर भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्यानंतर संघर्ष झाला होता. त्यावेळी दंगा भडकवण्याचे काम माजिद फ्रीमनने केले होते.
 
Powered By Sangraha 9.0