नवी दिल्ली : दिल्लीतील भजनपुरा येथील जिम मालकाच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. सुमित गुर्जर असे मृताचे नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समोर आलेल्या १० सेकंदाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुमित गुर्जर रस्त्यावर एका मुलाजवळ उभा असल्याचे दिसत आहे. काही वेळाने अचानक टोपी घातलेला मुलगा सुमितच्या जवळ येतो आणि त्याच्यावर चाकूने हल्ला करू लागतो. घटनेनंतर सुमित जखमी होऊन नाल्यात पडला.
मीडिया रिपोर्ट्समध्ये ही घटना दि. ११ जुलै रोजी घडल्याचे बोलले जात आहे. सुमितचा मृतदेह पोलिसांना भजनपुरा येथील गमरी एक्स्टेंशनमध्ये सापडल्याची बातमी आहे. या कालावधीत सुमितच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि पोटावर १७ वेळा चाकूने वार केल्याचे समोर आले आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
उल्लेखनीय आहे की, काही दिवसांपूर्वी दिल्लीतील शाहबाद डेअरीमधूनही असेच एक प्रकरण समोर आले होते. त्यावेळी साहिल नावाच्या मुलाने १६ वर्षांच्या मुलीवर चाकूने वार केले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळेही चर्चेत आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये साहिलने मुलीला कसे भोसकले आणि नंतर तिचा मृत्यू सुनिश्चित करण्यासाठी दगडाने तिचे डोके ठेचले हे दिसले. यानंतर तो सीसीटीव्हीमध्ये आनंदाने धावताना दिसला.