मुंबई : रिकामे पेनड्राईव्ह दाखवून दिशाभूल करु नका, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना दिला आहे. अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले होते. यावर आता चित्रा वाघ यांनी त्यांचा जोरदार समाचार घेतला.
चित्रा वाघ म्हणाल्या की, " अनिल देशमुख यांनी रिकामे पेनड्राईव्ह दाखवून उगाच जनतेची दिशाभूल करू नये. खोट्या आरोपांची आणि नाटकांची हद्द असते. अशी सोंगं करण्यापेक्षा तुमच्याकडे पुरावे असतील तर ते तात्काळ जाहीर करा," असे आवाहन त्यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या की, "आम्ही शब्द देतो, तुम्ही पुरावे देताच ३ तासाच्या आत तुमच्या ऑडियो क्लिप्स महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाहीर करू आणि त्यांचा पर्दाफाश करू," असा सूचक इशाराही चित्रा वाघ यांनी अनिल देशमुखांना दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
माजी गृहमंत्री आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अनिल परब आणि अजित पवारांवर आरोप करणारी शपथपत्र स्वाक्षरी करण्यासाठी फडणवीसांच्या एका माणसाने माझ्याशी संपर्क केला होता, असा दावा अनिल देशमुखांनी केला होता. श्याम मानव यांनी सर्वप्रथम हा आरोप केल्यानंतर देशमुखांनी त्याला दुजोरा दिला. मात्र, यावरून आता अनिल देशमुखांवर जोरदार टीका होत असून त्यांना फडणवीसांनी इशाराही दिलाय.