अमेरिकेच्या संसदेत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहूंची गर्जना; म्हणाले, "हमास समर्थकांना..."

    25-Jul-2024
Total Views |
 NETANYAHU
 
वॉशिंग्टन डी.सी : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना त्यांनी इराणवर इस्रायलचा विरोध करण्यासाठी काही गटांना निधी आणि समर्थन दिल्याबद्दल टीका केली.
 
इराणवर निशाणा साधत नेतान्याहू म्हणाले की, "आपल्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी धैर्य लागते." अमेरिकन संसदेला संबोधित करताना ते म्हणाले, "आम्हाला माहित आहे की इराण इस्रायलच्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांना आर्थिक मदत करत आहे. अनेक नाही, पण इथे आणि प्रत्येक राज्यात काही आहेत. या आंदोलकांसाठी माझा एक संदेश आहे. या आंदोलकांसाठी माझा संदेश आहे - जेव्हा तेहरानचे हुकूमशहा, जे समलैंगिकांना फाशी देतात आणि केस न झाकल्याबद्दल महिलांना मारतात, तेच तुमची प्रशंसा करतात, तुम्हाला निधी देतात, तुम्ही मूर्ख बनलात."
 
नेतान्याहू पुढे म्हणाले, "उत्कृष्ट, अतिशय अद्भुत. यातील काही आंदोलकांनी गाझासाठी घोषणा करणारे फलक हातात घेतले आहेत. हे आंदोलक नद्यांपासून समुद्रापर्यंत नारे देत आहेत. यापैकी बहुतेकांना हे समजले नसेल की नदी आणि समुद्र म्हणजे काय? ते इतिहासात अयशस्वी ठरतात की इस्त्रायलची भूमी हीच आहे जिथे दाऊद आणि सुलेमानने राज्य केले.
 
नेतान्याहू यांच्या भाषणावेळी पॅलेस्टिनी समर्थकांनी संसदेजवळील अमेरिकन ध्वज उतरवून जाळला. त्याऐवजी त्यांनी पॅलेस्टिनी ध्वज फडकावला. ही घटना अमेरिकन संसदेजवळील युनियन स्टेशनजवळ घडली. शेकडो निदर्शक मध्यपूर्वेत अमेरिकेच्या धोरणाविरोधात निदर्शने करत आहेत. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी सहा जणांना अटक केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये आंदोलक इस्रायलच्या विरोधात घोषणा देताना दिसत होते. त्यांनी एका युनियन स्टेशनसमोर एक मोठा अमेरिकन ध्वज उतरवला आणि तो जाळला. त्या जागी त्यांनी पॅलेस्टिनी ध्वज फडकावला.
 
अमेरिकेतील इतर काही शहरांमध्येही निदर्शने झाली. अनेकांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. सध्याची परिस्थिती पाहता महत्त्वाच्या सरकारी इमारतींसमोर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. यामध्ये व्हाईट हाऊस आणि अमेरिकन संसद भवनाचाही समावेश आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस मिरचीचा स्प्रे वापरत आहेत. स्थानिक मीडियानुसार, अमेरिकेचा झेंडा जाळल्याप्रकरणी २३ जणांना अटक करण्यात आली आहे. आंदोलकांनी नेतान्याहू यांच्या पुतळ्याचेही दहन केले.