तुम्हीदेखील जर इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर सेबीचा अहवाल काय सांगतो पाहाच

    24-Jul-2024
Total Views |
intraday trading sebi report


नवी दिल्ली :      सध्याच्या काळात शेअर बाजारात ट्रेडिंग करून पैसे कमाविण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय न स्वीकारता अल्पमुदतीत शेअर विक्री आणि खरेदी करण्यावर बऱ्याच जणांचा भर असतो. या प्रकारच्या इंट्रा-डे ट्रेडिंगमुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यातच आता भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी)कडून यासंदर्भात अभ्यास करण्यात आला आहे.


हे वाचलंत का? -    अर्थसंकल्पानंतरच्या पहिल्याच दिवशी इंधनांच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर


इक्विटी कॅश विभागातील वैयक्तिक इंट्राडे ट्रेडर्सपैकी ७० टक्क्यांहून अधिक ट्रेडर्सना आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये तोटा झाला आहे, असे बाजार नियामक सेबीने केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये इक्विटी कॅश सेगमेंटमध्ये इंट्राडे ट्रेडिंगमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत ३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात १० जणांपैकी ७ जणांना तोटा सहन करावा लागला आहे.

सेबीच्या अभ्यासात आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या तुलनेत मागील वर्षात इक्विटी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सहभाग घेणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत ३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. एका वर्षात ५०० पेक्षा जास्त ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी तोट्याचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तरुण ट्रेडर्समध्ये हेच प्रमाण जास्त असून तोटा सहन करणाऱ्यांची संख्या नफा मिळवणाऱ्यांपेक्षा जास्त होती, असेही सेबीने नमूद केले आहे.