मुंबई : निवडणूक जवळ आल्याने श्याम मानव यांना जाग आली आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा. त्यानंतर तुम्ही ईडीच्या प्रकरणातून सुटाल, असा दबाव माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टाकण्यात आल्याचा दावा श्याम मानव यांनी केला होता. यावर आता केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिले.
केशव उपाध्ये म्हणाले की, "श्याम मानव यांच्याबाबत असणाऱ्या अंधश्रद्धांचे आज खऱ्या अर्थाने निर्मूलन झाले आहे. त्यांना अचानक आत्ता कशी जाग आली? निवडणूक जवळ आल्यामुळे? आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या असतील तर त्यावेळीच का नाहीत बोलले?" असा सवाल त्यांनी केला आहे.
हे वाचलंत का? - पूजा खेडकर फरार? फोनही बंद...
ते पुढे म्हणाले की, "या देशात कायद्याचे राज्य आहे आणि या देशातली न्यायव्यवस्था एवढी कमकुवत नक्कीच नाही. १०० कोटींची वसुली करणारे अनिल देशमुख तुम्हाला आज हिरो वाटत आहेत. किल्ली दिलेल्या बाहुल्यासारखे आज अचानक श्याम मानव येऊन बोलले. पण यातली एक किल्ली मातोश्रीवरून आणि दुसरी बारामतीवरून फिरवली गेली आहे, हे कळण्याइतपत महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे," अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी केली आहे.