लोकांचे खाल्लेले पैसे परत द्या!

24 Jul 2024 12:39:47
 
Manoj Jarange
 
मुंबई : एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगेंविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढला आहे. दरम्यान, जरांगेंनी यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा आरोप केला आहे. यावरून आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांचा जोरदार समाचार घेतला. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
 
प्रसाद लाड म्हणाले की, "मनोज जरांगे पाटलांना मिळत असलेला पाठिंबा त्यांच्या नाट्यमय घडामोडींमुळे कमी होत चालला आहे. त्यांची नौटंकी लोकांसमोर येत आहे. त्यामुळे कुठेतरी भरकटलेले जरांगे पाटील आता आमच्यावर आणि फडणवीसांवर टीका करत आहेत. ते जे करतात ते योग्य आहे, असं त्यांना वाटतं. पण ते कुणाची सुपारी घेऊन करतात हे आता जनतेच्या समोर आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून याला पाडणार त्याला पाडणार असं ते म्हणतात. पण कोणाला पाडायचा याचा त्यांनी ठेका घेतलाय का? एवढी हिंमत असेल तर राजकारणात येऊन निवडणूक लढवा," असे आवाहन त्यांनी केले.
 
हे वाचलंत का? -  मनोज जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी!
 
ते पुढे म्हणाले की, "जरांगे पाटलांनी त्यांचं आंदोलन सोडून इतर गोष्टींमध्ये लक्ष देऊ नये. ते कुणाच्या सुपारीवर हे करत आहेत, हे आता महाराष्ट्राला कळलं आहे. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उभारलेल्या आंदोलनात लढावं. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. पण भाजप, देवेंद्र फडणवीस या विषयांमध्ये त्यांचा असलेला कल हा सुपारी फोडण्याचा कल दिसतो."
 
"आम्ही तुम्हाला पैसे खायला सांगितलं नाही. ज्यांनी तुमची तक्रार केली ते २०१३ मधील प्रकरण आहे. तुम्ही कधी पैसे खाल्ले ते बघा आणि लोकांचे खाल्लेले पैसे परत द्या. लोकं त्यांची तक्रार मागे घेतील. अटक वॉरंट हा न्यायालयाचा होतो. त्यामुळे आता जरांगेंना न्यायालयाचा निर्णयाचाही मान्य नाही का? त्यामुळे आपलं कृत्य चुकीचं असल्यास जरांगेंनी त्याचा न्यायनिवाडा करावा आणि चुकीचं नसेल तर न्यायालयात लढावं," असे ते म्हणाले.
 
तसेच "देवेंद्र फडणवीसांचं कुठे चुकलं हे जरांगेंनी चर्चा करुन सांगावं. देवेंद्र फडणवीसांनी २०१८ मध्ये मराठ्यांना दिलेलं आरक्षण चुकीचं होतं हे त्यांनी जगासमोर सांगावं. त्यांच्यात चर्चेला येण्याची हिंमत नाही. आम्ही तुमच्या आरक्षणाचा विरोध करत नाही. पण सुपारी घेतल्यासारखं बोलू नका. तुम्ही पवार आणि ठाकरेंना प्रश्न विचारा," असेही प्रसाद लाड म्हणाले आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0