पुणे : सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांचा घटस्फोट झाला आहे का? याबद्दलची चौकशी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने पुणे पोलिसांना याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पूजा खेडकर यांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी आपल्या आईवडीलांचा घटस्फोट झाल्याचे कागदपत्र सादर केले होते. पण दुसरीकडे, त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मनोरमा खेडकर यांचा पत्नी म्हणून उल्लेख केल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे त्यांच्यात खरंच घटस्फोट झाला की, आरक्षणासाठी घटस्फोटाचा बनाव केला असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
त्यामुळे आता केंद्र सरकारने पोलिसांना याबाबतची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्याला पिस्तूलाचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर सध्या तुरुंगात आहेत. दरम्यान, मनोरमा आणि दिलीप खेडकर यांच्यातील घटस्फोट बनावट आढळल्यास खेडकर कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.