पुणे : मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप असून पुणे न्यायालयाने ही अटक वॉरंट काढली आहे. त्यामुळे आता जरांगेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगेंनी २०१३ मध्ये जालना येथे एका नाटकाचे सहा प्रयोग आयोजित केले होते. पण त्यांनी निर्मात्याला याचे पूर्ण पैसे दिले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगेंसह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात कोथरूड पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
धनंजय घोरपडे यांनी ही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणात मनोज जरांगेंना दोनदा समन्स बजावण्यात आले. परंतू, ते सुनावणीकरिता उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात पुणे न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.