महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ३४ व्या राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी २४ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर येथे ही फेरी होणार आहे. या वर्षी या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मी नथुराम गोडसे बोलतोय, जर तरची गोष्ट, मर्डरवाले कुलकर्णी, चाणक्य, गालिब, २१७ पद्मिनी धाम, जन्मवारी, अस्तित्व आणि यदा कदाचित रिटर्न्स या ८ नाटकांची निवड झाली आहे.
२४ जुलै रोजी मी नथुराम गोडसे बोलतोय, २६ जुलै रोजी जर तरची गोष्ट, २८ जुलै रोजी मर्डरवाले कुलकर्णी, २९ जुलै रोजी चाणक्य, ३० जुलै रोजी गालिब, ३१ जुलै रोजी २१७ पद्मिनी धाम, १ ऑगस्ट रोजी जन्मवारी, २ ऑगस्ट रोजी अस्तित्व, ३ ऑगस्ट रोजी यदा कदाचित रिटर्न्स अशा स्वरूपात ही फेरी पार पडणार आहे.
१९८६-८७ साली सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ‘मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा’ सुरू करण्यात आल्या. दरवर्षी साधारणपणे २५ ते ३० व्यावसायिक नाट्य संस्थांचा या स्पर्धेत सहभाग असतो. डिसेंबर महिन्यात प्राथमिक फेरीसाठी प्रवेशिका मागविण्यात येतात. यातूनच,अंतिम फेरीसाठी नाट्यसंस्थांची निवड करण्यात येते.