ममता बॅनर्जींच्या मतपेढीच्या राजकारणामुळे भारत-बांगलादेश संबंधात दुरावा? हसीना यांनी केला वक्तव्याचा निषेध

24 Jul 2024 11:31:20
  mamata hasina
 
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हिंसाचारग्रस्त बांगलादेशातून आलेल्या 'असहाय्य लोकांना' आश्रय देणार असल्याचे सांगितले होते. ममतांच्या या वक्तव्याचा निषेध करत बांगलादेशने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ही बाब लक्षात घेऊन आता बांगलादेश सरकारने भारत सरकारला एक नोट पाठवली आहे.
 
बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री हसन महमूद म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि लोकांची दिशाभूल होऊ शकते. युनायटेड न्यूज ऑफ बांगलादेशच्या वृत्तानुसार, हसन महमूद म्हणाले, "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल आदरपूर्वक मी सांगू इच्छितो की त्यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला असून लोकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे."
 
ममता बॅनर्जी यांचे हे विधान कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या (TMC) वार्षिक शहीद दिन रॅलीला संबोधित केल्यानंतर आले होते. यामध्ये त्यांनी बांगलादेशातील घुसखोरांना बंगालमध्ये आश्रय देणार असल्याचे सांगितले होते. बांगलादेशात आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांच्या एका गटाकडून हिंसक आंदोलने सुरू आहेत.
 
ममता म्हणाल्या होत्या की, "मी बांगलादेशच्या प्रकरणावर बोलू नये कारण ते एक सार्वभौम राष्ट्र आहे आणि या विषयावर जे काही बोलायचे ते केंद्राचा विषय आहे. पण मी तुम्हाला सांगू शकते की जर असहाय लोकांनी आमचे दरवाजे ठोठावले तर आम्ही त्यांना नक्कीच आश्रय देऊ."
 
 
Powered By Sangraha 9.0