रसिका शिंदे-पॉल
मुंबई : प्रवीण तरडे लिखित-दिग्दर्शित ‘धर्मवीर १ : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या यशानंतर धर्मवीर आनंद दिघे यांचं जीवन, त्यांचे नातसंबंध आणि त्यांचं हिंदुत्वाशी असलेलं नात दाखवणारा ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ चित्रपट ९ ऑगस्ट रोजी देशभरात मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कलाकार आणि आनंद दिघे यांचं नातं कसं होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘महाएमटीबी’ने केला असता अनेक कलाकारांचे आनंद दिघे यांच्यासोबत ऋणानुबंध कसे होते हे समजले. त्यापैकी अभिनेते आणि व्हॉईस ऑव्हर आर्टिस्ट उदय सबनीस यांनी आनंद दिघेंबद्दल आठवणी सांगत ते त्यांना थरार या नावाने का हाक मारत होते याचा विशेष किस्सा सांगितला.
…म्हणून माझं नाव थरार पडलं
उदय सबनीस म्हणाले की, “आनंद दिघे हे खरंच लोकांसाठी जगणारे नेते होते. १९९९ साली थरार नावाची एक मालिका सुरु होती. ज्यात मी केवळ दोनच भागांमध्ये काम केलं होतं आणि नेमकी दिघे साहेबांनी तोच भाग पाहिला होता. त्यानंतर माझी आणि आनंद दिघे यांची ज्या-ज्यावेळी भेट झाली ते मला थरार अशीच हाक मारायचे. माझ्याबद्दल दिघे साहेबांना माहित होतं की, एक ठाण्यातला धडपडणारा कलाकार आहे. आणि विशेष म्हणजे त्यांना कलाकरांबद्दल खुप आपुलकी होती. दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी दिघे साहेबांवर ‘सुर्य निघाला पुढे’ ही एक ऑडिओ व्हिडिओ कलाकृती तयार केली होती आणि त्याचा व्हॉईस ऑव्हर मी दिला होता. दिघे साहेब त्यांच्या कामात खुप व्यस्त असायचे पण त्या रेकॉर्डिंगसाठी रात्री दोन अडीच वाजता स्टुडिओत स्वत: दिघे साहेब आले होते आणि ते ऐकून त्यांनी आनंदाने माझ्या पाठीवर थाप मारली होती”, असा आठवणीतला किस्सा उदय सबनीस यांनी सांगितला.
दिघे साहेबांचा दरारा
शिवाय, ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही आपण पाहिलं आहे की मुलांच्या शाळा कॉलेजच्या एडमिशनसाठी दिघे साहेब स्वत: जायचे.. तर त्याचा खरा किस्सा उदय सबनीस यांनी सांगितला. सबनीस यांच्या पुतण्याला ठाणा कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता आणि त्याच कामासाठी उदय सबनीस कॉलेजच्या कार्यालयात उभे होते. त्यांनी पाहिलं की दिघे साहेब हातात फाईल्सचा गठ्ठा घेऊन येत आहेत. त्यावेळी उदय सबनीस यांच्या मनात विचार आला की आता अर्थात दिघे साहेब आल्यावर त्यांनाच आधी बोलावणार. हा विचार करत असतानाच दिघे साहेब सबनीस यांच्या जवळ आले आणि त्यांनी विचारलं की उदय काय काम आहे? तर त्यांनी सांगितलं पुतण्याच्या एडमिशनसाठी आलो आहे; पण तुम्ही जा आत. ते बोलले नाही तु जा आधी कारण मी गेलो तर माझ्याकडे खुप फाईल्स असल्याने वेळ जाईल. आणि अक्षरश: बाहेर दिघे साहेब थांबल्यामुळे सबनीस यांचं काम तातडीने झालं. त्यामुळे ठाण्यात आनंद दिघे यांचा दरारा कसा होता हे उदय सबनीस यांच्या आठवींतून समजते.
दरम्यान, ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाची कथा प्रवीण तरडे यांची असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. तर मंगेश देसाई यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटात अभिनेते प्रसाद ओक प्रमुख भूमिकेत आहेत. ९ ऑगस्ट २०२४ रोजी ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.