तुमच्या घरातील Bigg Boss कोण? रितेश देशमुखने दिलं एका वाक्यात उत्तर…

    23-Jul-2024
Total Views |

big boss  
 
 
मुंबई : लोकप्रिय शो मराठी बिग बॉस दोन वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन लवकरच भेटीला येणार असून या पर्वाचे सुत्रसंचलन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. आजवरच्या चारही सीझनची धुरा अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांभाळली होती. त्यामुळे आता तोच दरारा रितेश देशमुख कायम ठेवणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याचं उत्तर नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत रितेश देशमुख यांनी दिले आहे. शिवाय, तुमच्या घरातील बिग बॉस कोण असे रितेश यांना विचारले असता त्याचे थेट उत्तर त्यांनी यावेळी दिले आहे.
 
रितेश म्हणाले की, “‘बिग बॉस मराठी’ या शोचा मी खर तर प्रचंड फॅन आहे. त्यामुळे मला ही संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी कलर्स मराठी वाहिनीचे आभार मानतो. मला शोबद्दल विचारल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया होती की, ‘केव्हा लाँच होईल हा शो?’ कारण, बिग बॉस होस्ट करायची माझी मनापासून इच्छा होती, त्यामुळे संधी मिळाली तसा लगेच मी होकार कळवला. माझ्या दोन-तीन शूटच्या तारखा देखील मी बदलल्या होत्या. हा शो यंदा होस्ट करण्याची संधी मिळाली यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे.”
 
रितेश देशमुख पुढे म्हणाले की, “शोमध्ये यावर्षी कोणते स्पर्धक येणार आहेत हे मला सुद्धा माहिती नाही. मी फक्त सध्या टीमबरोबर होस्टिंगची तयारी करत आहे. मला नेहमीच नवनवीन गोष्टी करायला आवडतात. आयुष्यात मला बऱ्याच संधी मिळाल्या आणि मी प्रत्येक ठिकाणी माझे शंभर टक्के दिले आहेत. सध्या माझ्या आयुष्यात ‘बिग बॉस’ होस्ट करत आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे”.
रतेश यांना तुमच्या घरातील बिग बॉस कोण?” असा प्रश्न विचारताच रितेश यांनी वेळ न घालवता म्हटले की, “माझ्याच नव्हे तर प्रत्येकाच्या घरात एकच बिग बॉस असतो…तो बॉस म्हणजे त्याची बायको. माझी मुलं बिग बॉस बघत नाहीत कारण, त्यांच्यासाठी घरात घडतं तेच बिग बॉस आहे आणि जिनिलीया बद्दल सांगायचं झालं तर, माझ्या आयुष्यात कोणतीही गोष्ट घडली तर मी सर्वात आधी तिलाच सांगतो. तिचं मत हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मी बिग बॉस करावं ही तिची मनापासून इच्छा होती कारण, आम्ही दोघंही बिग बॉस शोचे खूप मोठे फॅन आहोत.”
 
दरम्यान, कलर्स मराठी वाहिनीवर २९ जुलैपासून कल्ला होणार असून रितेश देशमुखचं सुत्रसंचलन किती प्रभावी असणार? सदस्य कोण असणार? यंदाचं पर्व किती वेगळं असणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.