अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्पना कमला हॅरिसचे आव्हान

    23-Jul-2024   
Total Views |
american presidential election


जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवारीच्या माघारीमुळेे अमेरिकेतील राजकीय समीकरणांवर निश्चितच परिणाम होऊ शकतो. तसेच आता रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे आव्हान उभे ठाकल्यामुळे, अमेरिकन जनता कोणाच्या हाती देशाच्या चाव्या देते, हे पाहणे औत्सुक्याचे.

अमेरिकेतील 2024 सालच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकींची उत्कंठा वाढतच चालली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नाला एक आठवडा पूर्ण होत नाही, तोवर अध्यक्ष जो बायडन यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. त्यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपला पाठिंबा जाहीर केला. बायडन यांनी स्वतःहून माघार घेतली की पक्षाने त्यांना माघार घ्यायला भाग पाडले, अशी शंका व्यक्त केली जात आहे. माघार घेण्यापूर्वी तीन दिवस बायडन यांना ‘कोविड 19’ झाल्याचे जाहीर करण्यात आले. बायडन विलगीकरणात गेल्यामुळे आता प्रचाराचे काय, हा मुद्दा उपस्थित केला जाऊ लागला. दि. 21 जुलै रोजी दुपारी बायडन यांच्या ट्विटर खात्यातून आपण 2024 सालची अध्यक्षीय निवडणूक लढवणार नसून कमला हॅरिस यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा स्वतः बायडन व्हिडिओच्या माध्यमातून करू शकले असते, पण तसे झाले नाही. जे पत्र त्यांच्या ट्विटरवर प्रसिद्ध करण्यात आले, त्यावर त्यांची डिजिटल स्वाक्षरी असल्यामुळे ते पत्र त्यांनी स्वतः लिहिले की त्यांच्या कार्यालयीन कर्मचार्‍याने, असाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. एरव्ही असे विषय गौण ठरले असते, पण बायडन यांचे वय, त्यांना होत असलेले विस्मरण, चालताना जाणारा तोल या गोष्टींमुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना दुसरेच कोणीतरी चालवत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली.

बायडन 50 वर्षांहून अधिक काळ अमेरिकेच्या संसदीय राजकारणात असले, तरी ते अध्यक्षपदाचे प्रथम पसंतीचे उमेदवार कधीही नव्हते. बराक ओबामांनी अध्यक्षपदाची आठ वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्यानंतर पक्षाने बायडन यांना मैदानात उतरवणे अपेक्षित होते. पण, तेव्हा त्यांच्याऐवजी हिलरी क्लिटंन यांना अध्यक्षपदाचे उमेदवार बनवण्यात आले. 2016 सालच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी क्लिटंन यांचा धक्कादायक पराभव केला. त्यांनी आपल्या टोकाच्या भूमिकांमुळे अमेरिकन राजकारणाचे धु्रवीकरण केले. डेमोक्रॅटिक पक्ष एकसंध नसून इंद्रधनुष्याप्रमाणे विविधरंगी विचारधारांचा आहे. त्यात कोणी अल्पसंख्याकवादी आहेत, त्यात मुस्लीम मूलतत्ववादीही वेगळे अस्तित्व राखून आहेत, कोणी कृष्णवर्णीय आणि अन्य वांशिक अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व करतात, तर कोणी महिला हक्कांचे समर्थक आहेत, कोणी समलैंगिकांचे समर्थक आहेत, तर कोणी शहरी गरिबांचे समर्थक आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे अनेक नेते संपूर्ण पक्षाचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. अमेरिकेतील राजकारणाचे ध्रुवीकरण झाल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षात सर्वांना सोबत घेऊन जाऊ शकेल, असा नेताच उरला नाही. म्हणून मग ट्रम्पविरोधात लढायला 77 वर्षांच्या बायडन यांना मैदानात उतरवण्यात आले. तेव्हाच त्यांच्या आरोग्याच्या आणि स्मरणशक्तीच्या समस्या जाणवत होत्या. पण, ट्रम्पविरोधात अमेरिकेतील पुरोगामी माध्यमे आणि समाजमाध्यमे एकत्र झाल्याने या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यात आले.

ट्रम्प यांना समाजमाध्यमांवरून हटवून, त्यांना हुकुमशहा ठरवून बायडन यांना आणले खरे; पण अध्यक्ष झाल्यापासून बायडन कोणत्याही गटाच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. पहिले अमेरिकेच्या तेल उत्खननावर निर्बंध आणून त्यांनी इंधनाचे भाव वाढवले आणि अमेरिकेतील गरिबांना दुखावले. त्यानंतर सौदी अरेबियाचे पंतप्रधान महंमद बिन सलमान यांच्याशी जुळवून घेऊन पक्षाच्या मानवाधिकारवादी पाठीराख्यांना दुखावले. युक्रेन युद्धातील त्यांच्या भूमिकेमुळे अमेरिकेत महागाई गगनाला भिडली. व्याजाचे दर वाढले. त्यात पक्षाचा तरुण मतदार होरपळून निघाला. ‘हमास’च्या दहशतवादी हल्यानंतर गाझा पट्टीत सुरू झालेल्या युद्धात इस्रायलला पूर्ण पाठिंबा दिल्याने पक्षाच्या मुस्लीम, तसेच सुशिक्षित मतदारांना दुखावले. याच काळात अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आल्याने त्यांनी महत्त्वाची विधेयके आणि अर्थसंकल्पीय तरतुदी रोखून धरल्या. त्यामुळे बायडन यांच्या महत्त्वाकांक्षी योजना रखडल्या. अमेरिकेत अध्यक्षांनी दुसर्‍या टर्मसाठी उभे राहायचे ठरवल्यास सहसा त्यांना विरोध केला जात नाही. बायडन यांचे वय, त्यांची प्रकृती आणि बौद्धिक क्षमतेविषयी प्रश्न उपस्थित केले जात असतानाही पक्षाने त्यांना पाठिंबा दिला. एवढेच नाही, तर त्यांच्यातील वैगुण्य झाकून प्रतिमा झळकावण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला.

रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांनाच पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी निवडल्यावर अमेरिकेतील परंपरेनुसार बायडन आणि ट्रम्प यांच्यात परस्पर सहमतीने वादविवादाचे आयोजन करण्यात आले. ‘सीएनएन’सारखी डेमोक्रॅटिक पक्षाकडे झुकलेली वाहिनी आणि बायडन यांना मानवतील अशा अटी आणि शर्थी असूनही ट्रम्प यांच्यापुढे बायडन पार फिके पडले. या चर्चेत बायडन यांना काही काळ विस्मरण झाल्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये असंबद्धतता होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी उमेदवाराला विविध राज्यांमधून 270 हून जास्त मते मिळवणे आवश्यक आहे. आजघडीला डोनाल्ड ट्रम्प यांना 300 हून अधिक मते मिळतील, अशी शक्यता आहे. आजवर असे वाटत होते की, येत्या निवडणुकीत ट्रम्प यांना विजयाची चांगली संधी असली, तरी अमेरिकेचे सिनेट किंवा प्रतिनिधी गह यांपैकी एका सभागृहात डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळेल. पण, आता या दोन्ही ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला विजय मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षात बायडन यांनी माघार घ्यावी, ही मागणी जोर धरू लागली. पेन्सिल्विनियामधील बटलर येथे झालेल्या प्रचारसभेत ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नामुळे त्यांची लोकप्रियता आणखीनच वाढली. कानाला गोळी चाटून जाऊनही ट्रम्प पुन्हा उभे राहिले आणि आपल्या समर्थकांना लढण्याचे आव्हान केले. त्यातून त्यांचा विजय ही औपचारिकता असल्याचे मानले जाऊ लागले.

गेल्या आठवड्यात अमेरिकेतील मिलवाकी येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. त्यात ट्रम्प यांना पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याची औपचारिकता पार पडली. ट्रम्प यांनी उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अमेरिकेच्या औद्योगिक पट्यातील श्वेतवर्णीय श्रमिकांचे तसेच सैनिकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या जे. डी. वान्स यांचे नाव घोषित केले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतपेटीवरच घाव घालण्याच्या या खेळीमुळे बायडन यांच्यावरील दबाव वाढू लागला. याच सुमारास बायडन यांना पुन्हा ‘कोविड’ झाल्याचे उघड झाले आणि ते विलगीकरणात गेले. बायडन यांनी निवडणुकीतून माघार घेऊन कमला हॅरिस यांना पाठिंबा देताच, पक्षातील मोठ्या नेत्यांनीही त्यांचे अनुकरण केले. यामध्ये माजी अध्यक्ष बिल क्लिटंन आणि माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिटंन यांचाही समावेश आहे. कमला हॅरिस या पहिल्या कृष्णवर्णीय महिला उमेदवार असून त्या विजयी झाल्या, तर अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरतील.

कमला हॅरिसना त्यांचा पुरोगामी भूमिकेसाठी स्त्रीवादी लोक मतदान करतील, तसेच कृष्णवर्णीय आणि भारतीय लोकही मतदान करतील, अशी स्वप्ने रंगवली जात असली, तरी त्यात फारसे तथ्य नाही. या वर्गांची लोकसंख्या जिथे सर्वात जास्त आहे, अशा राज्यांमध्ये एरव्हीही डेमोक्रॅटिक पक्षाचा विजय होतो. याउलट, बायडन यांच्या ज्या धोरणांमुळे त्यांच्याविरुद्ध रोष आहे, त्यात कमला हॅरिस यांचाही समावेश आहे. कमला हॅरिस यांचे व्यक्तिमत्व वादग्रस्त आहे. त्यांचे वडील कृष्णवर्णीय असले, तरी उच्चशिक्षित होते. वयाच्या सातव्या वर्षी त्यांचे आईवडील विभक्त झाल्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या भारतीय वंशाच्या, उच्चशिक्षित आईने केला. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्या स्वतःला ‘दक्षिण आशियाई’ म्हणवत असत. कालांतराने त्या स्वतःला कृष्णवर्णीय म्हणवू लागल्या. सार्वजनिक ठिकाणी त्यांची भाषणे ऐकली असता, त्यात फारशी चमक दिसत नाही. त्यांच्यावर 2020 सालच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वपदाच्या शर्यतीत सुरुवातीलाच माघार घेण्याची नामुष्की आली होती. या पार्श्वभूमीवर पार पडणार्‍या अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुका आणखीनच उत्कंठावर्धक झाल्या आहेत.



अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.