कर वाढीच्या धक्क्यातून शेअर बाजार सावरला; सेन्सेक्स आणि निफ्टी पूर्वपदावर

    23-Jul-2024
Total Views |
 nirmala
 
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार, दि. २३ जुलै सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणाला सुरूवात करताच भारतीय शेअर बाजार कोसळण्यास सुरूवात झाली होती. विशेष म्हणजे दिवसाच्या सुरूवातीला भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली होती. पण, सरकारने भांडवली नफा कर वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेअर बाजारात जोरदार विक्री झाली.
 
भांडवली लाभ कराच्या घोषणेनंतर सेन्सेक्स १२०० अंकांनी घसरला होता. मात्र, दुपारपर्यंत बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली. तर निफ्टीसुद्धा २४,४०० अंकांच्या खाली गेली होती. त्यानंतर भारतीय शेअर बाजार अर्थसंकल्पातून सरकारने दिलेल्या धक्क्यातून सावरला आणि पुन्हा एकदा पूर्वपदावर आला. ३ वाजून १८ मिनिटाला बीएसई सेन्सेक्स ९४(१२) अंकानी घसरला होता. तर एनएसईमध्ये सुद्धा ४४ अंकांची किरकोळ घसरण झाली होती. बाजारात झालेल्या या सुधारणेमुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.