राजभवन येथील साकलाईदेवीच्या यात्रेसाठी जमले राज्यभरातील कोळीबांधव

    23-Jul-2024
Total Views |
koli
 राजभवन येथील साकलाईदेवी मंदिरात दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दुसर्‍या मंगळवारी साजरी होणारी कोळी बांधवांची यात्रा मंगळवारी (२३ जुलै) रोजी मोठ्या उत्साहात साजरी झाली. राज्यभरातील कोळी बांधव मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक कोळी पेहरावात या यात्रेसाठी उपस्थित होते. सकाळी दहा वाजता कोळी बांधव राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकत्र जमले आणि त्यांच्या पारंपारिक वाद्यांच्या तालावर वाजत गाजत ते राजभवनातील साकलाईदेवीच्या मंदिरात पोहोचले. मंदिरात देवीचा आशिर्वाद घेऊन सर्व कोळी बांधवांनी हा उत्सव साजरा केला. मरोळ बाजार विक्रेता महिला संघ यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या संघाच्या अध्यक्षा राजश्री भांजी या यात्रेला उपस्थित होत्या.
 
 या मंदिराच्या ठिकाणी फार वर्षांपूर्वी साकलाई देवीचे वाळूचे मंदिर होते त्यामुळे या जागेला वाळूकेश्वर (वाळकेश्वर) म्हटले जाते. कोळी बांधव मासेमारीला जाण्यापूर्वी या मंदिरात नारळ वाहत आणि मगच नाव समुद्रात घेऊन जात. त्यांची या या देवीवर खूप श्रद्धा आहे. राजभवनाची निर्मिती झाली त्यावेळी या मंदिराचेही बांधकाम झाले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वर्षभर या मंदिरात कोळी बांधवांना जात येत नाही, या मंदिरातील पूजारीच रोज या मंदिरात पूजा करतात. पण कोळी बांधवांना त्यांच्या देवीचे दर्शन घेता यावे म्हणून दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी त्यांना या मंदिरात येण्याची परवानगी असते आणि त्यादिवशी ही यात्रा होते. स्वत: राज्यपाल या दिवशी कोळीबांधवांना या यात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण देतात. कोळीबांधवांसोबतच इतरही भाविक या मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतात. दरवर्षी मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पडते.