मुंबई : बजेट न वाचताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली असून काय प्रतिक्रिया द्यायची हेही त्यांचं आधीच ठरलेलं होतं, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी बजेट न वाचता घोषणा दिल्या. विरोधकांनी या अर्थसंकल्पावर काय प्रतिक्रिया द्यावी, हे त्यांना आधीच लिहून दिलेलं आहे. त्यांची प्रत्येकाची प्रतिक्रिया ठरलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला काही मिळालं नाही असा विनाकारण नरेटिव्ह तयार करण्यात येत आहे. पण केवळ नरेटिवकरिता राजकारण न करता आपल्या राज्याला काहीतरी मिळावं अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा," असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.
याशिवाय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी केलेल्या घोषणांची यादीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचून दाखवली. ती पुढीलप्रमाणे...
- विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प : ६०० कोटी
- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार : ४०० कोटी
- सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर : ४६६ कोटी
- पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प : ५९८ कोटी
- महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : १५० कोटी
- MUTP-3 : ९०८ कोटी
- मुंबई मेट्रो : १०८७ कोटी
- दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर : ४९९ कोटी
- MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी : १५० कोटी
- नागपूर मेट्रो : ६८३ कोटी
- नाग नदी पुनरुज्जीवन : ५०० कोटी
- पुणे मेट्रो : ८१४ कोटी
- मुळा मुठा नदी संवर्धन : ६९० कोटी
या केवळ २ ते ३ विभागांच्या तरतुदी असून अजून बरेच काही या अर्थसंकल्पात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.