'वन्समोअर' म्हणणाऱ्या कवितेवरून बालभारती होतंय ट्रोल

    23-Jul-2024
Total Views |

balbharti
इयत्ता पहिलीच्या ‘बालभारती मराठी’ पुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ ही कविता वादात सापडली आहे. अनेक साहित्यिक, वाचक आणि पालकांकडून बालभारतीला या कवितेवरून बोल लावले जात आहेत. समाजमाध्यमांवरही या कवितेवरून बालभारतीला खूप ट्रोल केले जात आहे.
 
इयत्ता पहिलीच्या ‘बालभारती मराठी’ पुस्तकात ‘जंगलात ठरली मैफल’ ही कविता आहे. कवयित्री पूर्वी भावे यांची ही कविता आहे. पूर्वी भावेंनी ही कविता इयत्ता तिसरीमध्ये असताना लिहिली होती. २०१७ मध्ये ही कविता आली होती. अवघ्या १२ ओळींच्या असणाऱ्या या कवितेमध्ये अनेक अमराठी शब्दांचा वापर केला गेला आहे. “जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल” अशा या कवितेच्या पहिल्या दोन ओळी आहेत. मैफल आणि अक्कल असा ओढूनताणून यमकाचा वापर या ओळींमध्ये केला गेलेला आहे. त्यानंतरच्या ‘तबल्यावर होती कोल्होबाची साथ वाघोबा म्हणाले, नाही ना बात’ या चौथ्या ओळीतच ‘बात’ हा अमराठी शब्द आला आहे. ‘गुंडू-पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस’ या ओळींमध्ये हौस या शब्दासोबत यमक जुळवण्यासाठी माऊस या इंग्रजी शब्दाचा वापर केला गेला आहे. ‘मुंगीने लावला वरचा सां आवाज आवाज ओरडला ससा’ या ओळीत सां वर विनाकारण अनुस्वार दिला गेला आहे आणि कहर म्हणजे कवितेचा शेवट वन्समोअर, वन्समोअर झाला शोर’ यांसारख्या अमराठी शब्दांनी केला गेला आहे. कवितेत वापरलेले हिन्दी, इंग्रजी, फारसी शब्द, यमकाचा चुकीचा वापर आणि एकंदरीत अभिप्रेत न होणारा अर्थ यामुळे ही कविता खूप ट्रोल होत आहे. मराठी भाषेच्या प्रचारासाठी एका फेसबूक पेजवर सर्वप्रथम या कवितेवर प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर ही कविता प्रचंड व्हायरल झाली. ‘अशी दर्जाहीन कविता शालेय पुस्तकात समाविष्टच कशी केली जाऊ शकते” असा प्रश्न सर्व माध्यमांवरुन बालभारतीला विचारला जात आहे.