सह्याद्रीच्या कुशीतल्या देवराया (sacred groves) म्हणजे जैवपरंपरेचा खजिना. या भूभागामधील उत्तरेकडील प्रदेशातील देवराया (sacred groves) तशा फारशा प्रकाशझोतात येत नाहीत. कळसुबाई ते भीमाशंकर डोंगररांगेतील देवरायांवर (sacred groves) प्रकाश टाकणारा हा लेख...
अश्माचमे मृत्तिकाचमे
गिरयश्यमे पर्वताश्यमे
वनस्पतयश्यमे हिरण्यचमे
अग्निश्यमे आपश्यमे
ग्राम्याश्यमे पशवआरण्याश्यमे
- रुद्राध्याय
अर्थात या शिळा, दगड, माती, हे डोंगर पर्वत,हे वनस्पतीधन, सोने, ही ऊर्जा, हे पाणी, हे गाव (संस्कृती), पशु-पक्ष्यांसह अरण्य, हे सर्व माझे आहे. याचे जतन करणे ही माझी जबाबदारी आहे.
या संस्कृत श्लोकाची अनुभूती घ्यायची असेल, तर सह्याद्रीत भटकून आदिवासींनी जपलेला जैवसांस्कृतिक वारसा आणि निसर्गपूजक जीवनशैली समजून घ्यायला हवी. सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगामध्ये उत्तरेला भीमाशंकर आणि कळसुबाई-हरिश्चंद्रगड हा टापू येतो. आदिवासी महादेव कोळी, ठाकर व इतर वन निवासी समुदाय या परिसरात पिढ्यान्पिढ्या वास्तव्ङ्मास आहेत. येथील निसर्गाशी, झाडाझुडुपांशी, गिरी-विहारांशी, मातीशी, वन्यजीवांशी व त्यांनी विकसित केलेल्या कुणबाऊ जीवनशैलीशी त्यांचे एक जैवसांस्कृतिक स्वरूपाचे घट्ट नाते जुळलेले आहे. सभोवतालच्या निसर्गाला आणि कर्तृत्ववान वंशजाला देव मानायचे, वाघ्या व वरसुबाईला पूजायचे, देवत्व बहाल करायचे आणि बालगोपाळांचे व गुराढोरांचे रक्षण करणारा क्षेत्रपाल म्हणून वनदेव व बहिरी यांच्या भरवशावर जगायचे. ‘पांढरी’ म्हणजे गावाचे देव म्हणून त्यांना मान्यता द्यायची. अशा देवदेवतांचे मंदिर म्हणजे घनदाट जंगल व त्यांच्या नावाने राखलेले जंगल म्हणजेच देवराई. भीमाशंकर ते कळसुबाई या परिसरातील ५० पेक्षा अधिक गावांत १०० हून अधिक देवराया आढळतात. महाराष्ट्रातील देवरायांची संख्या मोठी आहे, ३ हजार, ५०० हून अधिक. अभ्यासकांच्या मते, पश्चिम घाटातील सात टक्के जंगल केवळ देवराई परंपरेमुळेच टिकून राहिले आहे. भारतासह जगभरात देवरायांच्या रूपात ङ्कूळ जंगलाचा अधिवास टिकवून ठेवण्याची परंपरा आढळते. सर्व धर्ङ्कांतील विचार साहित्यात व संतसाहित्यात वनांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आजही अनेक देवरायांमध्ये शेंदूर भोगलेला तांदळा आढळतो. अशा देवराया अतिप्राचीन असल्याचे सांगितले जाते. कारण मूर्तीस्वरूपातील देवतांचा उगम कुशाण राजवटीत (इ. स. पूर्व १३० ते इ. स. १८५) झाला आहे.
‘राई’ आणि ‘बन’
उत्तर सह्याद्रीतील देवरायांची परंपरा खूप प्राचीन आहे. बाला घाटातून स्थलांतरित झालेल्या महादेव कोळी समाजाने ही परंपरा या परिसरात रूजवली. त्याला किमान 700 वर्षे झाली असावी. त्यापूर्वीची पवित्र वनाची संस्कृती या भागात असणार. वनदेव, वाघोबा, मारुती, काळोबा, बहिरी, सिदोबा, वरसुबाई, सतुबाई, दर्याबाई इ. ग्रामदेव व देवता यांच्या नावाने पवित्र जंगल राखण्याची रूढी पुढील पिढ्यांनी पाळलेली आहे. यातील गमतीचा भाग म्हणा की योगायोग, स्थानिक लोक देवीच्या नावाने राखलेल्या जंगलाला ‘राई’ असे स्त्रीवाचक संबोधतात, तर देवाच्या नावाने जपलेल्या जंगलास ‘बन’ असे पुरुषवाचक नाव दिले आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, ते काळोबाचे बन व ती वरसुबाईची राई...!
जलस्रोतांची जननी
दख्खनच्या पठारावरून पूर्वेला वाहणार्या बहुतांशी नद्या सह्याद्रीत उगम पावतात. या उगमाच्या ठिकाणी व सभोवताली अनेक देवराया आढळतात. भीमा नदीच्या उगमस्थानी भीमाशंकराच्या मंदिरामागे विस्तीर्ण राई आहे. आहुपे येथे घोड नदी उगम पावते, ती भैरवनाथाच्या देवराईमधूनच. प्रवरेची उपनदी मुळा ही कुमशेत या गावातून उगम पावते, धारेरावाच्या बनातून मुळेचा उगम होतो. फोफसंडी गावातून वाहणारी व कुकडी नदीला मिळणार्ङ्मा मांडवी नावाच्ङ्मा छोट्या नदीच्या उगमस्थानी दर्याबाईची राई आहे. रतनगड व कात्राबाईच्या परिसरात प्रवरा नदीच्या उगमापाशीसुद्धा देवराया आढळतात. कळसुबाईच्या दक्षिण पायथ्याला पांजरे गावाच्या हद्दीत गडदूबाईची राई आहे. तेथील गुहेतून पाण्याचा एक झरा वाहतो. उन्हाळ्यात कोरडा पडलेला हा झरा महिन्याच्या शेवटी पाझरू लागतो. त्यावेळी स्थानिक ठाकर शेतकरी पुढील १५ दिवसांत पाऊस पडणार, अशी खुणगाठ बांधून कोरड्यात भाताचे बियाणे पेरतात.
जैवविविधतेची खाण
उत्तर सह्याद्रीतील बहुतांशी देवराया या निमसदाहरित व आर्द्रपानझडी या जंगल प्रकारात मोडतात. देवरायांची एक परिसंस्था असते. नानविध वनस्पती, पशु, पक्षी, जीवजंतू आदींचे एक सहजीवन येथे आढळते. गारंबीच्या महावेली, लोध नावाचा भव्य वृक्ष, आंबे असे महाकाय वृक्ष फक्त देवरायांमध्येच आढळतात. अगदी सह्याद्रीतच आढळणारे सेरोपेजिया (कंदीलपुष्प), 20 प्रकारचे ऑर्किड्स (अमरी) या ठिकाणीच पाहावयास मिळतात. हिरडा, बेहडा, सातवीन, फणसाडा, वावळ, चारोळी, डोंगरी मोह, पायर, काटेसावर, भेरली माड, कुंभा, देवसावर, शिवन, वरस इ. वनस्पती. दुसर्या फळीतील वृक्षामध्ये पळस, पांगारा, बहावा, आपटा, बिब्बा, कोशिंब, गेळा, करमळ इ. लहान वृक्ष, तर महावेलांमध्ये पळसवेल, कांचनवेल, गारंबी, सोनजाई, पिळूक, महागुळवेल, मडवेल, शिकेकाई, करवंदवेल अशा अठराभार वनस्पतींनी देवराया नटलेल्या असतात. असंख्य झुडुपे त्यात माकडलिंबू, काळा व पांढरा कुडा, रामेठा, पांगळी, डिंगळी, करावी वायटी, तर औषधी वनस्पती वेखंड, बोक, दातरंग, कडूकवठ, अनंतमूळ, लोखंडी, टेटू, लोखंडी याही देवरायांमध्ये विपुल प्रमाणात असतात. वन्यजीवांचे अगणित प्रकार हे देवरायांचे आणखी एक वैशिष्ट्य. वाघ, बिबटे तर आहेतच, पण पूर्वी देवराईत वर्षातून एक-दोनदा रानगवे यायचे, त्यांच्या शेणाने राईतील तांदळ्या भोवतीची जमीन पुजारी सारवत असे. देवराया निसर्गातील वन्यजीवांचे भ्रमणमार्ग व जनुकपेढी (जीन बँक) आहेत.
नष्टचर्य
विविध विकास प्रकल्प, धरणे, शहरीकरण, बागायती शेती, स्थानिकांना विश्वासात न घेणारे वनधोरण यांमुळे वन परिसंस्था धोक्यात आली आहे. सह्याद्रीत उगम पावणार्या नद्या दख्खन पठारावरील शुष्क प्रदेशाची तहान भागवतात, बागायती शेती, साखर कारखानदारी व राजकारणदेखील फुलवतात. ङ्कूळ जंगल व राया-बने नष्ट झाली तर काय होईल, याची प्रचिती हवामान बदलामुळे आता येऊ लागली आहे.
उपाययोजना
लोकपंचायत संस्थेने कळसुबाई-भीमाशंकर परिसरात देवराई परंपरेचे अध्ययन केले आहे. सद्यस्थिती त्याआधारे स्थानिक वननिवासी व इतर घटकांच्या माध्यमातून ‘देवराईनिहाय संवर्धन व्यवस्थापन योजना’ विकसित होत आहे. त्यातील निवडक बिंदू खालीलप्रमाणे,
१) कळसुबाई व भीमाशंकर परिसरात २९ ग्रामदेवतांच्या नावाने १०० पेक्षा अधिक (खासगी व सरकारी मालकीच्या) देवराया आहेत. त्यांच्या माध्यमातून जवळपास १ हजार, ५५० एकर प्राथमिक जंगल स्थानिक लोकांनी राखले आहे.
२) छोट्या, वैयक्तिक मालकीच्या देवरायांमध्ये शेकरुंचे वास्तव्य अधिक आहे. त्यामुळे येथील दोन अभयारण्यांच्यादृष्टीने राई-बनाचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे.
३) तब्बल १३ देवरायांमधून मुख्य आठ नद्यांचे व इतर स्थानिक जलस्रोतांचे उगम आहेत.
४) ४० टक्क्यांपेक्षा अधिक देवराया वैयक्तिक मालकीच्या आहेत. त्यामुळे अशा कुटुंबांना संवर्धन व्यवस्थापनासाठी प्रोत्साहन द्यायला हवे.
५) भीमाशंकर-कळसुबाई पट्ट्यात अनियंत्रित पर्यटन सुरू आहे. त्याचा धोका राई व बनांना निश्चित आहे. त्यादृष्टीने उथळ पर्यटकांना देवरायांसारख्या ठिकाणी जाण्यास बंदी असावी.
६) वनाधिकार कायदा, आदिवासी स्वशासन (पेसा) कायदा, जैवविविधता अधिनियम, मनरेगा अशा लोककेंद्री कायद्यांच्या चौकटीतून स्थानिक ग्रामसभा, सामाजिक संस्था, वनविभाग व इतर शासकीय यंत्रणांना देवराई संवर्धनासाठी योजना आखून उत्तम काम करण्याची संधी आहे.
७) राई-बन या संवर्धनपद्धतीविषयी आदिवासींची नवीन पिढी, शासकीय यंत्रणा, अभ्यासक, हौशी पर्यावरणप्रेमी व पर्यटक-प्रवासी इत्यादींना संवेदनशील बनवणे अगत्याचे आहे. देवराई म्हणजे नक्की काय, निसर्गनिर्मित प्राथमिक जंगल कशाला म्हणायचे, हे पटवून द्यावे लागेल. मुख्य म्हणजे वृक्षारोपण म्हणजे जंगल वा देवरायांची निर्मिती, हा अंधविश्वास दूर करावा लागेल.
विजय सांबरे
(लेखक उत्तर सह्याद्रीतील आदिवासी व वन संबंध या विषयातील अभ्यासक आहेत.)