अज्ञात लोकमान्य

    22-Jul-2024
Total Views |
lokmanya tilak life


लोकमान्य टिळक माहित नाहीत असा माणूस य देशी तरी सापडायचा नाही. शक्ती आनि चातुर्याचा अनोखा संगम लोकमान्यांच्यापाशी होता, मात्र या पुरुषाने या शक्तींचा वापर समाजाच्या कल्याणासाठी केला, आपल्यातील सामर्थ्याने गरिबांचे अश्रु पुसले, अशाच लोकमान्य टिळकांविषयी काही अज्ञात गोष्टींवर टाकलेला हा प्रकाशझोत...

टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली, ह्याबद्दल जनमानसात अनेक भेद आहेत. काहींच्या मते तो मान महादेवशास्त्री ओक यांच्या प्रथम संस्कृत शिक्षकांचा आहे. काहींच्या मते, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन ह्यांनी टिळकांबद्दल गौरवोद्गार काढताना स्वयंस्फूर्तीने त्यांना, ’लोकमान्य’ म्हणून संबोधले. ‘भालाकार’ भोपटकर तर स्वतःच्याच लेखणीतून हे उपपद प्रथम आले, अशी उद्घोेषणा करतात; तर बळवंत दाभोळकर हे ‘अर्पणपत्रिके’तून ‘आपणच प्रथम लोकमान्य’ अशी टिळकांची ख्याती वर्णिल्याचं सांगतात! खरोखर लोकमान्य बिरूद कुणी लावलं, ह्यावर अतिरेकी दावे होण्याची ही प्रथमच वेळ! याबद्दल ज.स. करंदीकर ह्यांनी स्वतःच टिळकांना प्रश्न केला, तेव्हा टिळकांनी तो मान मात्र काळकर्ते शिवरामपंत परांजपे यांना दिला आहे. पंतांनी काळ ह्या पत्रात ‘लोकमान्य आणि राजमान्य’ असा एक लेख लिहिला होता. त्यानंतर टिळकांना जी पत्रे येत, त्यामध्ये ‘राजमान्य राजश्री’ हे नेहमीचं उपपद न वापरता, लोकांनीच आपलेपणाने त्यांना लोकमान्य ही पदवी देऊन संबोधायला सुरुवात केली. खरोखर उपनिषदात प्रजेला जे महत्व दिलेलं आहे, ते याच कारणामुळे! स्वातंत्र्यपूर्व काळात, राजमान्य असणं म्हणजे इंग्रजांचे अंकीत असणं! पण लोकमान्य शब्दात जो प्रजेने केलेला सत्कार आहे. हा सत्कार लोकमान्य टिळकांच्या मनाच्या साधेपणाचा, बुद्धिनिष्ठतेच्या सततच्या लोकोद्धारी व्रताचा आणि चारित्र्यशुद्धतेचा परिचय आहे.

बाळ गंगाधर टिळक म्हटलं म्हणजे उग्रनिश्चयी, कर्तव्यकठोर आणि भीतीशून्यतेतून आलेला मूर्तिमंत निर्धार आपल्या डोळ्यांसमोर येतो. पण सहस्रशीर्ष पुरुष जो वर्णिलेला आहे, त्याचे अनंत गुण जसे लपून असतात, तद्वत काळाने ह्या पराक्रमी पुरुषाचे अनेक पैलू अज्ञात राखले. मुत्सद्दी राजकारणी, सशस्त्र क्रांतीचे प्रणेते, शिक्षणाग्रही, प्रबोधक, गणितज्ञ, मीमांसक, संशोधक असे विधिज्ञ असलेले लोकमान्य, वैयक्तिक जीवनात तितकेच साधे आणि प्रसिद्धिपराङ्मुखही होते. आज काही अशाच कथा जाणण्याचा आणि टिळकांच्या अंतर्मनात डोकावण्याचा आपण प्रयत्न करूया.

पुण्यात प्लेग गुदरला त्यावेळी टिळकांनी हिंदू इस्पितळ स्थापन केले. एके दिवशी एक विधवा बाई प्लेगपासून बरी होऊन तिच्या गावी परत जायची होती. पण परिस्थितीवश तिजजवळ उपचारांचे 30 रुपये नव्हते. अशा वेळी नेमके टिळक सायंकाळी तेथील व्यवस्था पहाण्यास श्री. नातू यांसोबत आले. लागलीच परिस्थिती लक्षात येऊन त्या स्त्रीचे देय आपल्या नावे घेऊन, तिला घरी सुखरुप पोहचविण्याची आज्ञा तेथील ते अधिकार्‍यास करते झाले. महापुरुषांचं आचरण हे सगळीकडे दिव्यच असतं. काही गोष्टी ह्या शिकवता येणं कठीण! त्यासाठी आतूनच तशा वागण्याची ओढ असावी लागते. असे लोकांसाठी मनात कणव असणारे गंगाधरसुत, स्वतःच्या बाबतीत मात्र कठोरच असत. त्याबद्दल गोष्ट अशी, की लोकमान्य समर्थ विद्यालय पाहण्याकरिता तळेगावला गेलेले असता, परत जाण्याच्या गाडीची वेळ जवळ आली म्हणून टिळक तयारी करू लागले. त्यावेळी नेमके राष्ट्रीय शिक्षणाबद्दलच वाद रंगात आला होता. प्रोफ. विजापूरकर त्यांना म्हणाले, “आज तुम्ही जायचे असल्याकारणाने गाडी नक्कीच उशिराने येणार.” ह्यावर टिळक उत्तरले, ”ऋषींचे आन्हिक चुकू नये म्हणून चंद्र-सूर्यही थांबतात, असे ऐकले आहे, पण माझ्यासाठी गाडीला उशिरा होऊन दैवाने माझ्यावर उपकार करावेत, ही गोष्टच मज मान्य नाही. मी प्रयत्नवादी आहे, दैवाचा उपकार मला नको आहे.

1895 साली टिळकांची सांपत्तिक स्थिती खालावली होती. त्यावेळी सयाजीराव गायकवाड यांनी टिळकांना, एका इंग्रजी ग्रंथाचे भाषांतर करण्यास सुचवले. त्या निमित्ताने काही सहस्त्र रुपये दक्षिणा देण्याची इच्छाही, सयाजीराव गायकवाड बोलून दाखवली. पण आदरपूर्वक टिळकांनी ती नाकारली. अस्तेय ज्यामध्ये प्रतिष्ठित झालं, तो मनुष्य सार्‍या रत्नांचे उपस्थान बनतो, असे योगशास्त्र सांगते. पण योगी निःस्पृह राहतो. पोटापुरते असले म्हणजे पुरे, ही त्याची धारणा असते. आपला जन्म हा दुसर्‍याने दिलेल्या तुकड्यावर राहून भाषांतराची कामे करण्यासाठी नाही, तर ज्या शतकात आपण जन्म घेतला त्या शतकाचे नाव कायम राहील, असे काम करुन दाखवण्यासाठी आहे असं ते म्हणत. संत तुकारामांनाही अशीच रत्ने श्री शिवाजी महाराजांनी देऊ केली होती, पण तुकारामांनी ती अशीच नाकारली होती.

एकदा एक कादंबरीकार ‘केसरी’ कार्यालयात, आपली स्वलिखित कादंबरी देऊन गेले. त्यावेळी टिळकांनी उद्गार काढले होते, असल्या ताईमाईच्या गोष्टी लिहिण्यात काय पौरुष आहे कोण जाणे? असल्या विद्वानांची बौद्धिक क्षुधा इतकी मंद व्हावी, याचे आश्चर्य वाटते. लहानपणापासून निदान मला तरी असे वाटते की आपण असे लिहावे, ज्याचा ह्या परमगूढ विश्वाच्या अतर्क्य आणि अपूर्व बांधणीचा बोध होण्यास उपयोग होऊन, त्याचा जीव कोटीच्या उन्नतीस अधिक उपयोग होईल! असे ते ज्ञानदृष्टीने प्रत्येक प्रसंगाची चिकित्सा करीत असत.

अशा धीरगंभीर वृत्तीच्या मनुष्याला साधारणतः विनोदचे वावडे. पण लोकमान्य खरोखरीच भीतीशून्य झालेले असल्याने, गंभीर अशा परिस्थितीमध्येही त्यांची विनोदबुद्धी शाबूत असे. एकदा असेच एका प्रसंगी हायकोर्टात त्यांची केस चालू असताना त्यांच्या बॅरिस्टर यांस येण्यास उशीर झाला, ते पाहून एक बॅरिस्टर मित्र आपल्या तरुण बॅरिस्टर मित्रास सोबत घेऊन तेथे आला आणि टिळकांना म्हणाला की, आपल्या बॅरिस्टर मित्रांस उशीर झाला तर, आम्ही तुम्हास ह्या केसमध्ये मदत करू. ह्यावर टिळक त्यांना म्हणाले की, 17 वर्षांच्या तरुणीस 22 वर्षांच्या पतीस सोडून 11 वर्षांचे दोन वर चालतील का? त्यावर एकच हशा पिकला.

एकदा एका वतनदार गृहस्थाचे उत्पन्न सरकारने आकसाने जप्त केले. त्याने त्या विरोधात वकिलाकडे जाऊन कलेक्टर, कमिशनर अगदी गव्हर्नरपर्यंत अर्ज केले. पण काही उपाय होईना. शेवटी लोकमान्यांकडे तो आला. आपल्या हयातीपर्यंतचेच उत्पन्न सरकारने जप्त केले असल्याकारणाने आता आत्महत्येशिवाय घरच्यांना सुखात ठेवता येईल, असा उपाय दिसत नाही, असे त्याने सांगितले. एकदा का त्याचा मृत्यू झाला म्हणजे, घरच्यांना दरमहा रक्कम मिळणे सुरू होईल असा निर्धार त्याने टिळकांना बोलून दाखवला. त्याचे बोलणे शांतपणे ऐकून टिळक उत्तरले, हिंदू धर्मशास्त्र आणि हिंदू लॉ असे प्रतिपादित करतात की, संन्यास घेतल्यावर त्या संन्यस्ताचे पूर्वाश्रमातील स्थावर जंगम आदींवरील स्वामित्व नष्ट होते. तेव्हा आता तुम्ही संन्यास घ्या. म्हणजे कायदेशीर रीतीने तुम्ही आपल्या इस्टेटीस मृतवतच ठराल. तुम्ही जिवंत असूनही, सरकारी कायदा तुम्हास मृत मानून तुमच्या वारसास उत्पन्न देण्यास तयार होईल. इतक्या गंभीर प्रसंगी असा मिश्कील उपाय सुचावयास मनाची किती मोठी उत्क्रांत अवस्था हवी? त्या वतनदाराने खरोखरच संन्यास घेतला, आणि अन्यायाने दडपलेली संपत्ती त्याच्या परिवारास परत मिळाली. ते खरोखरीच लोकमान्य होते. सर्वमान्य होते.!

विदेशी कपड्यांची होळी 1905 ला स्वा. सावरकरांनी केली. त्यावेळेच्या सभेचे न.चि.केळकर अध्यक्ष होते. कपड्यांची होळी झाल्यावर, सभा संपुष्टात आल्यावर टिळकांनी भावनावश तरुणांना सांगितले की, येथेच रात्रभर जागून पहारा करा. जवळच गवताच्या गंजी आहेत. कोणीतरी गुप्त पोलीस त्या पेटवतील, तुमच्यावर खटला करतील आणि कार्यहानी होईल. टिळक मुत्सद्दी होते. भावनाविवशतेला आटोक्यात ठेवणारा बुद्धिनिष्ठ विवेक त्यांच्यात सतत जागृत असे. 1908 ला सरकारची वक्रदृष्टी टिळकांवर पडली, त्यावेळी एक सीआयडी ऑफिसर जे टिळकांचे स्नेही होते, त्यांच्यातर्फे याची आगाऊ सूचना टिळकांना बापूसाहेब गांधी यांच्याकडून मिळाली. म्हणून अशा वेळी मुंबईत आज न जाता, उद्या जा असा सल्ला बापूसाहेबांनी टिळकांना दिला, म्हणजे घरची व्यवस्था लावणे सोपे होईल. तर टिळक उद्गरले, घरी जाऊन काय फौजफाटा तयार करायचा आहे, सैन्य जमवायचे आहे, का हत्तीघोडे शृंगारायचे आहेत? येथे सरकारने सबंध देशच मोठा तुरुंग करुन ठेवला आहे, तिथे मोठ्या दालनातून लहान दालनात कोंबणार एवढेच की नाही! ह्यात तयारी करण्यासारखे काय आहे! असा मनाचा संन्यास, अशी वितराग स्थिती!

लोकमान्य टिळकांचे आयुष्य हे कायमच धकाधकीचे गेले. आयुष्यभर नियतीचे जड काम सर्वसामान्यांना जे कठीण ते त्यांनी केले. त्यांची राष्ट्रनिष्ठा, त्यांचं निर्ममत्व, अलोलुप वृत्ती ह्याची साक्ष मंडालेमध्ये कारागृहात त्यांच्या आश्रयाला आलेले पक्षी, त्यांच्या मांडीवर आनंदाने खेळणार्‍या चिमण्या देतात. मंडालेमध्ये ते दीड दीड तास ध्यानमग्न असत. अहिंसा, सत्य, अपरिग्रह, अस्तेय हे यम त्यांच्यात मुरले होते. मंडालेत कारागृहात त्यांचे कपडे धुणार्‍या ब्राम्ही मनुष्याने असे प्रतिपादले होते की, ह्या अवलियाचे कपडे धुवायला लागल्यापासून माझे जुन्या पायाच्या दुखण्यास आराम पडू लागला आहे. खर्‍या संतांच्या सेवेचे पुण्य त्यास लाभले असावे. आज अशा देवमान्यांची जयंती. त्याबद्दल ह्या काही कथा ज्या अपरिचितशा वाटल्या त्या येथे सांगितल्या. विस्तारभयास्तव थांबतो. आता अनुमती द्यावी. सार्‍या वाचकांना टिळक जयंतीच्या शुभेच्छा. इत्यलम् ।

आदित्य शेंडे