मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान कट्टरपंथीयांचा हिंसाचार; योगींच्या बुलडोझरने आरोपींची घर जमीनदोस्त

22 Jul 2024 18:18:56
 Bareilly
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील बरेली येथील गौसगंजमध्ये मोहरमच्या दिवशी उपद्रव निर्माण करणाऱ्या आरोपींवर योगी सरकारने बुलडोझरची कारवाई केली आहे. आरोपी इर्शादच्या दोन घरांचे बेकायदा बांधकाम प्रशासनाने बुलडोझरच्या सहाय्याने पाडल्याची बातमी समोर येत आहे. मोहरमच्या दिवशी उपद्रव निर्माण करणाऱ्यांविरोधात शासनाचा हा निर्णय महसूल विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीनंतर घेण्यात आला आहे.
 
अहवालानुसार, दि. २१ आणि २२ जुलै रोजी महसूल विभागाचे पथक तपासणीसाठी गौसगंज गावात पोहोचले होते, तेथे त्यांना एका धार्मिक स्थळासह १६ वास्तू अतिक्रमण करून बांधल्याचे आढळले. ही बांधकामे गावातील सामुदायिक जमिनीवर आहेत. पथकाने या इमारतींना चिन्हांकित केले, त्यावर लाल चिन्हे लावली आणि अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासणी अहवालाच्या आधारे अतिक्रमणावर बुलडोझरचा वापर केला जाईल. आता इर्शादच्या घरावर बुलडोझरचा वापर केल्याचे समोर आले आहे.
 
दि. १७ जुलै रोजी बरेलीच्या शाही पोलीस ठाण्याच्या गौसगंजमध्ये मोहरमच्या दरम्यान गोंधळ झाला होता. मिरवणुकीत सहभागी झालेल्या काही लोकांनी मंदिरासमोर गोंधळ घातला, त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वादावादी झाली आणि काही वेळातच वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून परिसरातील वातावरणही बिघडले आहे. या काळात कट्टरपंथीयांनी हिंदू समाजाच्या घरांनाही लक्ष्य केले आणि महिलांचा विनयभंग केला. याशिवाय हिंदूंना भयंकर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही देण्यात आली होती.
 
घटनेच्या दिवशी पोलिसांना पाचारण करून प्रकरण कसेतरी शांत झाले, मात्र त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली. या प्रकरणात ६५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर आठवडाभरात ३५ जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी आलमगीर आणि दंगलीचा आरोपी निझाकत अली यांना चकमकीनंतर अटक करण्यात आली.
 
 
Powered By Sangraha 9.0