शरद पवारांनी सत्तेसाठी स्वतःचाच पक्ष असलेला काँग्रेस पक्ष फोडल्यानंतर, चौकोनी झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही एका पक्षाला विधानसभा निवडणुकीत इतका मोठा आकडा मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. पवार-ठाकरे व अन्य हा महाराष्ट्राच्या राजकारणातला ‘पॉलिटिकल नॅरेटिव्ह’ इथे तुटला होता. भाजपच्या विजयाने आजची उबाठा-शिवसेना त्यावेळी इतकी अस्वस्थ झाली होती की, सरकारमध्ये राहायचे की नाही, या द्वंद्वातच नंतर कितीतरी दिवस उद्धव ठाकरे होते. अर्थातच, या राजकीय घडामोडींचे मध्यबिंदू होते देवेंद्र फडणवीस. त्या दिवसापासून आजतागायत हे अढळपद फडणवीसांकडेच कायम आहे.
२०१३ साली देवेंद्र फडणवीस भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झाले आणि प्रारंभ झाला तो महाराष्ट्राच्या राजकारणात एका नवा अध्यायाचा. २०१३ साली देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि लगोलग पार पडलेल्या २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक जागा जिंकल्या. ‘सर्वाधिक’ या विशेषणाला अनेक पैलू होते. एकतर शरद पवारांनी सत्तेसाठी स्वतःचाचपक्ष असलेला काँग्रेस पक्ष फोडल्यानंतर, चौकोनी झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही एका पक्षाला विधानसभा निवडणुकीत इतका मोठा आकडा मिळण्याची ही पहिलीच वेळ होती.
पवार-ठाकरे व अन्य हा महाराष्ट्राच्या राजकारणातला ‘पॉलिटिकल नॅरेटिव्ह’ इथे तुटला होता. भाजपच्या विजयाने आजची उबाठा-शिवसेना त्यावेळी इतकी अस्वस्थ झाली होती की, सरकारमध्ये राहायचे की नाही, या द्वंद्वातच नंतर कितीतरी दिवस उद्धव ठाकरे होते. अर्थातच, या राजकीय घडामोडींचे मध्यबिंदू होते देवेंद्र फडणवीस! त्या दिवसापासून आजतागायत हे अढळपद फडणवीसांकडेच कायम आहे.
मुख्यमंत्री कोणीही असो, महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडून यायचे असले की, फडणवीसांच्या मनात काय आहे, याचा संदर्भ घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाची माळ ओवताच येत नाही. महाराष्ट्राला राजकीय अस्थिरता नवी नाही किंवा ‘अस्थिरतेत सातत्य’ हीच महाराष्ट्राच्या राजकारणाची वस्तुस्थिती झाली आहे. फडणवीस या सगळ्यावर मात करून पाच वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले एकमेव मुख्यमंत्री ठरले. हा काळही सोपा नव्हताच. मुख्यमंत्री फडणवीस असले, तरी सतत विरोधी पक्षासारखा वागणारा ठाकरेंच्या रुपाने सहयोगी पक्ष हीदेखील एक सत्यस्थिती होती.
इंग्रजीत राजकारणातल्या पुरुषोत्तमाला एक शब्द आहे ‘स्टेट्समन.’ फडणवीसांमधला ‘स्टेट्समन’ महाराष्ट्राने याचवेळी पाहिला आणि अनुभवला. खरेतर केंद्रातल्या मोदीपर्वाने देशातील अनेक राज्यांत नवे मुख्यमंत्री दिले. त्यातल्या ज्यांनी मिळालेल्या संधीचे राज्याच्या हितासाठी सोने केले, त्यांपैकी एक म्हणजे देवेंद्र फडणवीस! अनेक निकषांवर महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य झाले, ते फडणवीसांच्या काळातच. देशाची आर्थिक राजधानी धारण करणारे महाराष्ट्र हे राज्य. पण, महाराष्ट्राचा राज्यशकट हाकणे हे तितकेच जिकिरीचे. राजकीय अस्थिरतेमुळे इथे स्थिरता रूजत नाही. कृषी, पायाभूत सुविधा, शहरीकरण व सामाजिक न्याय या महत्त्वाच्या घटकांवर कोणतेही राज्य चालते.
फडणवीसांच्या काळात ही क्षेत्रे राजकारणाच्या केंद्रस्थानी आली. पायाभूत सुविधांची वेगवान निर्मिती, हा फडणवीसांच्या ‘स्टेट्समनशिप’चा हुकुमी एक्का! समृद्धी महामार्ग असो, मेट्रोची गती असो, कोस्टल रोड असो किंवा अटल सेतू, या आणि अशा कितीतरी प्रकल्पांची यादी देता येईल, कदाचित ती संपणारही नाही. मात्र, या प्रकल्पांमुळे ग्रामीण, निमशहरी आणि शहरी महाराष्ट्रात होणारी रोजगारनिर्मिती, गुंफली जाणारी अर्थसाखळी आणि उंचावणारे जीवनमान मात्र आकड्यात नक्की मांडता येईल. जलयुक्त शिवार, सौर कृषी पंप या आणि अशा कितीतरी योजना आहेत, ज्या फडणवीसांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. या योजना सर्वसामान्यांच्या जीवनमानात बदल घडवून आणतात. या सगळ्या उपाययोजना आव्हानांचा सामना करताना आणलेल्या आहेत, ज्यांनी नंतर धोरणांचे स्वरूप प्राप्त केले.
महाराष्ट्राला बाराबलुतेदार, अठरापगड जातींपैकी कोणीही मुख्यमंत्री पदावर बसलेले चालते. मनोहर जोशींच्या रूपाने महाराष्ट्राने ब्राह्मण मुख्यमंत्रीही पाहिला. मात्र, फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर हा गडी हटणारा नाही, नुसता हटणार नाही, तर अनेकांची दुकाने बंद करणार, हे लक्षात आल्यानंतर सुरुवात झाली, ती जातीपातीच्या राजकारणाची. स्वतःला ‘सुसंस्कृत’ म्हणविण्यासाठी भाटांची फौज पाळणार्यांचे घाणेरडे चेहरे इथे फाटले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची जात काढली गेली. मराठा समाजाच्या समोरचे प्रश्न खरेपणाने समजून घेऊन फक्त आरक्षणच नव्हे, तर विविध महामंडळांच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले ते देवेंद्र फडणवीस यांनीच! आज त्यांच्या जातीवरून त्यांच्या विरोधात जी गरळ ओकली जात आहे, त्यालाही कधीतरी विराम लागेलच. पण, फडणवीस मात्र आपले काम करीत राहतील.
राजकारणात चढउतार सुरुच राहतात. मात्र, आपल्या ‘स्टेट्समनशिप’च्या आधारावर जो संदर्भहीन होत नाही, तोच खरा कसलेला राजकीय खेळाडू असतो. फडणवीसांना ते उत्तम जमले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महाभारताप्रमाणे आज निरनिराळी पात्रे परस्परांशी लढत आहेत. यात पिता-पुत्र आहेत, काका-पुतणे आहेत. सख्खे-चुलत भाऊ आहेत, दूरचे जवळचे नातेवाईक आहेत. मात्र, महाभारताची लढाई जशी धर्म आणि अधर्माची होती, तशी महाराष्ट्रातली राजकीय लढाई केवळ दोन मूल्यव्यवस्थांमधली आहे. एक आहे चढउतारातही स्वतःच्या पक्षावरची निष्ठा जपणारी विचारसरणी असणार्या, समाजाचा विचार करत सत्ताकारण करणार्यांची आणि दुसरी आहे, सत्तेसाठी स्वतःचाच पक्ष फोडून स्वतःच्या पोराटोरांसाठी महाराष्ट्राला अस्थिरतेच्या वावटळीत ढकलणार्यांची. देवेंद्र फडणवीस बेलाशकपणे पहिल्या मूल्यव्यवस्थेचा बावनकशी चेहरा आहेत. मूल्यांची पोपटपंची करणे सोपे असते, पण त्याच मार्गावर चालत राहणे तितकेच अवघड!
“माझ्याकडे १०० पेक्षा अधिक आमदार असते, तर मी कधीच मुख्यमंत्री झालो असतो,” असे शरद पवार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांना टोमणा मारताना म्हणाले होते. फडणवीसांचे यावर पत्रकारांना दिलेले उत्तर अत्यंत मार्मिक व फडणवीसांच्या स्वभावाला साजेसे होते. ते म्हणाले, “मी असे करणार नाही. माझ्यात आणि शरद पवारांमध्ये हाच फरक आहे.” महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षनिष्ठेचा आणि राजकीय विश्वासार्हतेचा दीप तेवत ठेवणार्या देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!