शरणार्थींना दिली ओसरी...

21 Jul 2024 19:20:02
 Britain refugees problems
 
‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती वापरत जगभरातील अनेक देशांवर ब्रिटनने राज्य केले. धर्मनिरपेक्षतेसारख्या गोंडस विचारांना जन्म देणारा ब्रिटनच. मात्र, या शब्दाची किंमत ब्रिटनला आता हिंसाचाराच्या घटनांच्या स्वरूपात मोजावी लागत आहे. ब्रिटन मागील काही वर्षांपासून धार्मिक हिंसाचाराच्या गर्तेत आहे. ब्रिटनमधील शरणार्थी मुस्लिमांमुळे नव्या वादाला तोंड फुटले असून, वारंवार उफाळून येणार्या दंगलींमुळे ब्रिटनमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळते. ब्रिटनच्या लीड्स शहरात दि. १८ जुलै रोजी दोन हजारांहून अधिक दंगेखोरांनी सरकारी बसेसची आणि दुकानांची तोडफोड करून जाळपोळ केली, ज्यामुळे ११ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
 
सरकारी बसेसना आग लावताना अनेक लोक चक्क व्हिडिओ काढत होते. काही सेल्फी काढत होते. हे सर्व करताना ‘अल्ला हो अकबर’ अशी घोषणाबाजीदेखील सुरू होती. यांना ना प्रशासनाचे भय होते, ना पोलिसांचे. चार मुलांना पालकांकडून सरकारने ताबा घेतल्याच्या मुद्द्यावरुन हा हिंसाचार उफाळून आला. यांतील एका मुलामुळे त्याच्या चुलत भावाला दुखापत झाली. मात्र, जेव्हा या मुलाला रुग्णालयात नेले, तेव्हा रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती ब्रिटनच्या ‘चाईल्ड केअर’ एजन्सीला दिली.
 
यानंतर या चारही मुलांना ‘चाईल्ड केअर सेंटर’मध्ये ठेवण्याचा निर्णय झाला. यानंतर निर्णयाला विरोध करत दंगल भडकली. मुस्लीम बहुसंख्य भागातच ही दंगल भडकली. यात सर्वाधिक तोडफोड आणि जाळपोळ हेयर हिल्स भागात झाली, जिथे मुस्लिमांची लोकसंख्या तब्बल ३९.४ टक्के असून ख्रिश्चन लोकसंख्या फक्त ३४.८४ टक्के आहे. म्हणजेच या परिसरात ख्रिश्चनांपेक्षा मुस्लिमांची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश शरणार्थी. म्हणूनच या दंगलीमागे ब्रिटनमधील शरणार्थी मुस्लिमांचाच हात असल्याचे बोलले जात आहे.
 
ब्रिटनने धर्मनिरपेक्षता आणि माणुसकीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर शरणार्थींना आसरा दिला. मात्र, हेच शरणार्थी आता ब्रिटनची डोकेदुखी ठरू लागले आहेत. ब्रिटनच्या या मुस्लीमबहुल भागातच सर्वाधिक गुन्हेदेखील घडतात. हेयर हिल्स भागात एक हजार लोकांमागे २०९ गुन्हे घडतात. याठिकाणी दंगलीसुद्धा वारंवार भडकतात. त्यामुळे ब्रिटनमधील सर्वाधिक गुन्हेगारी दर हा हेयर हिल्स भागातच. ब्रिटनचे प्रशासन आणि पोलीस हतबल ठरले असून, या दंगली रोखण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत. ब्रिटनने भारतात अल्पसंख्य मुस्लिमांना ‘पीडित’ म्हणत समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आता तोच ब्रिटन मुस्लिमांच्या दंगलींमुळे पीडित झाला आहे.
 
ब्रिटनमध्ये ख्रिश्चन समुदायदेखील दहशतीच्या सावटाखाली आहे. धर्मनिरपेक्षच्या मोठमोठ्या गप्पा पश्चिमी देश नेहमीच मारत असतात. भारतातील मुस्लिमांसोबत भेदभाव होत असल्याचे ब्रिटन-अमेरिकेसारख्या देशांचे आरोपही नित्याचेच. भारतात अशा काही घटना घडल्या, तर हेच तोंड वर करून समित्या गठीत करतात, निषेध नोंदवतात. मात्र, वेळ बदलायला वेळ लागत नाही. कारण, आज हेच देश दंगलीच्या आगीत धुमसत आहेत.
  
दरम्यान, नुकत्याच झालेल्या ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत लीड्समधून गाझा समर्थक मोतीन अली निवडून आले. दंगखोरांमध्ये मोठ्या प्रमाणावर हेच मोतीन समर्थक दिसून आले. यावेळी पोलिसांवरदेखील दगडफेक करण्यात आली, ज्यामुळे पोलिसांना जीव वाचविण्यासाठी मागे हटावे लागले. हुजुरांना पराभूत करुन मोठ्या बहुमतासह मजूर पक्ष नुकताच सत्तेवर आल्यानंतर दंगेखोरांना मोकळे रान मिळाल्याचे चित्र आहे. ज्यांना ब्रिटनने आधार आणि निवारा दिला, त्यांनीच ब्रिटनला दिवसाढवळ्या चंद्र-तारे दाखवले.
 
ब्रिटनमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या जवळपास दोन टक्के. त्यातच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाकिस्तानी वंशाचे चार खासदारही निवडून आले. त्याचबरोबर मुस्लीमबहुल भागात दिवसेंदिवस मुस्लिमांची लोकसंख्या वाढतच आहे. लंडनचे महापौर सादिक खान पाकिस्तानी वंशाचे असून तिथूून फक्त तीन किमी अंतरावर ही दंगल घडली. त्यामुळे या दंगलीमागे पाकिस्तानचा हात तर नाही ना, असा प्रश्नही उपस्थित होतोच. त्यामुळे ‘शरणार्थींना दिली ओसरी, शरणार्थी हातपाय पसरी’ अशीच सध्या ब्रिटनची गत. त्यामुळे आगामी काळात शरणार्थींना पायबंद घालण्याचे धोरण मजूर पक्ष राबवितो की मतपेढीसाठी बोटचेपी भूमिका घेतो, ते पाहणे महत्त्वाचे!
 
७०५८५८९७६७
Powered By Sangraha 9.0