‘दलित-मुस्लीम भाई भाई’ आणि भाई’चारा’

20 Jul 2024 22:05:24
dalit muslim organised attacks


मागासवर्गीय समाजाच्या वस्तीवर काही मुस्लिमांनी संघटितरीत्या हल्ले करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. ‘दलित-मुस्लीम भाई भाई, हिंदू कौम कहासे आयी?’ म्हणणारे तसेच मागासवर्गीय समाज आणि मुस्लिमांचा भाईचारा या देशाची राजनीती बदलू शकेल, असे म्हणणारे आता कुठे आहेत? त्याअनुषंगाने या तद्दन बेगडी ऐक्याचा घेतलेला मागोवा...

"आम्हाला भीती नाही. कारण, त्यांना माहिती आहे आम्ही हिंदू नाही, बौद्ध आहोत,” असे म्हणून तो युवक 1992च्या दंगलीत निर्धास्त फिरायचा, स्टेशनला जायचा. तो रस्ता मुस्लीम वस्तीतूनच जायचा. त्याचा तिथे सगळ्यांशी याराना होता. त्याला सगळ्यांनी समजावले, “दंगल सुरू आहे. तू त्या वस्तीत जाऊ नकोस.” मात्र, तो अतिशय आत्मविश्वासाने भाईचारा सांगे आणि सगळ्यांना सांगे, ”दंगल हिंदू-मुस्लिमांची सुरू आहे. सांगितले ना की, मी हिंदू नाही, बौद्ध आहे.” त्या दंगलीच्या काळात तो असाच यारीदोस्ती निभावण्यासाठी त्या वस्तीमध्ये जात होता. मात्र, त्याच्यावर चाकूने हल्ला झाला. हल्लेखोर म्हणत होते, ”बौद्ध है तो क्या हुआ, काफीर तो हैं... मारो साले को!” कसाबसा तो जीव वाचवत पळून आला. त्यानंतर, त्याने कधीही ‘गंगा-जमुना तेहजीब’ची दुहाई दिली नाही. नव्हे, त्यानंतर समाजाला सत्य कळून चुकले होते की, आपण बौद्ध धर्म स्वीकारला तरी ते जे कोणी हल्लेखोर होते, त्यांच्या नजरेत आपण मरायलाच हवे असेच आहे. ही मुंबई उपनगरातली सत्यघटना आहे. अर्थात, सध्या 1992 सालानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

पण, ही घटना आठवण्याचे कारण की, नुकतेच धुळ्यातील साक्री येथे मागासवर्गीय समाजाच्या वस्तीवर मुस्लीम समाजाच्या काही लोकांनी सामुदायिकरीत्या हल्ला केला. वस्तीतील महिला, बालकं कुणावरही दयामाया दाखवली नाही. कारण, काय तर मुस्लीम मुलीने इथल्या मागासवर्गीय मुलाशी विवाह केला. दोघेही सज्ञान आहेत. या सगळ्या घटनाक्रमामध्ये पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले. त्यात वस्तीतील मागासवर्गीय समाजातील युवकांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. वस्तीचे म्हणणे आहे की, या हल्ल्यामागे असदुद्दीन ओवेसीच्या पक्षाचा आमदार फारूख अन्वर याचे हस्तक असलेले आरिफ शेख आणि जाकीर शेख यांचा हात आहे. काहीही असू दे, पण दोन प्रेमी जीवांनी विवाह केला म्हणून पूर्ण वस्तीमध्ये हिंसेचा क्रूर नंगानाच करणे, हे सर्वस्वी निंदनीय आणि यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.

‘दलित-मुस्लीम भाई-भाई’ म्हणणारे आणि भाईचार्‍याची ग्वाही देणारे लोक आता कुठे लपून बसले आहेत? तसेच हिंदूंना धडा शिकवायचा तर मुस्लिमांबरोबर एकी करायची, असले विचार असणारे ते काही लोक यावर काही बोलणार आहेत की नाही? या आधीही अहमदनगर आणि धुळ्यामध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर काही मुस्लिमांनी दगडफेक करणे, मिरवणुकीमध्ये घुसून जबरदस्तीने हिरवे झेंडे नाचवणे, मिरवणुकीतील आयाबायांना त्रास देणे, या घटना घडल्याच आहेत. इथे शोषित मागासवर्गीय समाज होता, मात्र शोषण करणारे सवर्ण हिंदू नव्हते म्हणून या घटनांना दाबण्याचा प्रयत्न झाला का? हासुद्धा एक प्रश्न आहे. (मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे. कारण, तथाकथित पुरोगामी बहुजन समाज, बहुजन समाज म्हणून ज्या समाजाचे दाखले देतात, त्या समाजाचीच मी आहे. अर्थात, हे सांगावे लागते, हेसुद्धा दुर्दैवच आहे म्हणा)
असो. समाजासमोर आज अनेक समस्या आहेत.

पण, जर उघड्या मनाने आणि डोळ्यांनी त्या पाहिल्या तर जाणवते की, गेल्या काही वर्षांपासून मागासवर्गीय समाजाच्या तरुणांवर ‘लव्ह जिहाद’मार्फत अत्याचार करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. उदाहरण द्यायचे तर लातूरच्या खंडू कांबळेचे देता येईल. तो रिक्षा चालवायचा. खाऊन-पिऊन सुखी मुलगा. 2019 साली इस्पितळात उपचार घेत असताना त्याची ओळख जुलेखाशी झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झाले. जुलेखाने खंडूला सांगितले की, ती अतिशय गरीब आहे. घरी अम्मा, अब्बा आणि भैय्या आहे तसेच ती घटस्फोटित आहे. खंडूने गरीब आणि आपल्यावर जीव लावते म्हणून जुलेखाशी लग्न केले. जुलेखाच्या कुटुंबाला लग्नाबाबत काही आपत्ती नव्हती. उलट ते सर्व खंडूच्या घरीच राहायला आले. खंडू त्या कुटुंबकबिल्याला पोसू लागला. खंडू आणि जुलेखाला मुलगी झाली. पुढे उदरनिर्वाहासाठी खंडू या सगळ्या परिवाराला घेऊन लातूरला आला. तिथे नेमके जुलेखा आणि परिवाराने त्याला मुस्लीम वस्तीमध्ये भाड्याने घर घ्यायला लावले. इथे खंडूची युनूससोबत मैत्री झाली. पुढे त्याच्या माध्यमातून मौलाना फैज आणि सय्यद वकील या मौलानांशी खंडूची मैत्री झाली. त्यांचे घरी येणे-जाणे सुरू झाले.

त्यांनी जुलेखाला भडकवायला सुरुवात केली की, ”तू मागासवर्गीय जातीच्या माणसाशी लग्न केलेस तर विवाह टिकवायचा असेल आणि मुली, बायकोची सुरक्षितता पाहिजे असेल, तर मुस्लीम हो,” असा आदेशच मौलाना फैज आणि सय्यद वकील यांनी खंडूला दिला. घरापासून, नातेवाईकांंपासून दूर जुलेखा आणि तिच्यासोबत लातूर शहरात आलेल्या खंडूसाठी त्याच्या घरचे दरवाजे बंदच झाले होते. त्यामुळे तो घाबरला. मुलीसाठी त्याचा जीव तुटत होता. याचा फायदा घेऊन या मौलवींनी खंडूला धमकावण्यास सुरुवात केली आणि दि. 3 मार्च 2023 रोजी त्यांनी खंडूला लातूर पोेलीस अधीक्षक कार्यालयासमोरील मशिदीसमोर नेले. तिथे त्याला इस्लाम कबूल करण्यास मजबूर केले. त्यानंतर लातूरच्याच एका इस्पितळात नेऊन त्याचा खतना केला. ”आता तू सच्चा मुसलमान झालास. जमातच्या कार्यक्रमामध्ये तू जा. तुझ्या बायको, मुलीला आम्ही सांभाळू,” असे ते मौलवी आणि युनूस खंडूला सांगू लागले. मात्र, खंडूने जाण्यास नकार दिला. तेव्हा त्याला भरपूर मारहाण करण्यात आली आणि वर त्याच्याकडून पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. दुसरीकडे त्याच्याकडे आश्रयासाठी आलेली जुलेखा आणि तिचे कुटुंब पूर्णतः कट्टरतावादी वर्तन करू लागले. त्रास असह्य होऊन शेवटी खंडू कांबळेने दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी पोलीस स्थानकात तक्रार केली. या घटनेत खंडू कांबळेला मदत करायला ‘गंगा-जमुनी तेहजीब’वाले कुणीही गेले नाही.

अशीच घटना 2022 साली दौंडमध्ये घडली. एक मुस्लीम घटस्फोटित स्त्रीला आधीच दोन मुले होती. तिचे आणि एका मागासवर्गीय तरुणाचे प्रेम झाले. त्याने तिच्याशी विवाह केला. नवीन ठिकाणी जाऊन नवे आयुष्य सुरू करू म्हणून हा युवक दौंड परिसरात राहू लागला. एक-दोन वर्षे ठीक होते. मात्र, त्या घरात राहणारा दुसरा भाडेकरू असिफ याने या तरूणाची ओळख एका हाजी साहेबाशी करून दिली. हाजी आणि असिफ यांनी या युवकाच्या त्या मुस्लीम पत्नीला भडकावायला सुरुवात केली की ”तू याला सोड, तुझा कौममध्ये निकाह करून देतो. हा आपल्या बरोबरीचा नाही. (म्हणजे मागासवर्गीय आहे).” त्यानंतर दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी कुमेश कुरेशी, आसिफ आणि हाजी हे तिघे जण युवकाच्या घरी गेले. त्याच्या पत्नीला आणि मुलांना मारहाण केली. त्या महिलेने युवकाशी विवाह तोडावा, अशी धमकी दिली. यामुळे तरूण घाबरला. स्वत:च्या आणि कुटुंबाच्या जीवाची भीती त्याला सतावू लागली. तेव्हा त्याच पत्नीने त्याला सांगितले, ‘’इस्लाम कबूल कर. सगळा त्रास संपेल. उद्या वेळ आली तर मीसुद्धा हिंदू धर्म स्वीकारेन.” युवकाची द्विधा मनःस्थिती झाली. कारण, या महिलेसाठी त्याने घरदार सोडलेच होते. याचा गैरफायदा घेत दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी आसिफ आणि कुमेल एका मुस्लीम डॉक्टरासमवेत त्या तरूणाच्या घरी गेले. त्याच्या पत्नीला आणि तीच्या मुलांना बाहेर काढले आणि त्यांनी या तरूणाचा खतना केला. ’तू आता मुसलमान आहेस’ असे म्हणून त्याला सोडून दिले. दुसरीकडे पत्नी ही धर्मांधच होती, हे त्या युवकाला इतके सगळे घडल्यावर कळून आले. आपल्यासोबत संघटितरीत्या धोका झाला, हे उमगल्यावर त्याने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.

छत्रपती संभाजीनगरच्या दिपक सोनवणे याच्यासोबत तरी काय वेगळे झाले. अभियांत्रिकी शिक्षण घेणार्‍या दिपकचे आणि सना फरहीन शाहमिरचे 2017 साली प्रेम झाले. काही वर्षे ठीकच होते. पण, याच काळात सनाच्या वडिलांनी दुसरा निकाह केला तोही एका हिंदू महिलेशी. तसेच त्या महिलेचे धर्मांतरणही केले. यानंतर सना दिपकला म्हणू लागली की, ”वडिलांशी निकाह करण्यासाठी ती हिंदू बाई जर मुस्लीम होत असेल, तर तुलाही माझ्याशी निकाह करण्यासाठी मुस्लीम व्हावे लागेल.” दिपकने इस्लाम स्वीकारायला नकार दिला. त्यानंतर सनाचे आईवडील, बहीण आणि काका यांनी दिपकला जबदरदस्तीने एका घरात नेते. त्याचे हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबला. प्रचंड मारहाण केली. दुसर्‍या दिवशी त्याचा जबरदस्तीने खतना केला. या सगळ्याचा व्हिडिओही काढला. त्याला सांगितले गेले की, ”आता तू सनाशी निकाह करू शकतोस.” असे म्हणून त्यांनी दिपकला अत्यंत अश्लाघ्य आणि आक्षेपार्ह शब्दांत जातीवाचक शिवीगाळ केली. दिपक या सगळ्या प्रकाराने सुन्न झाला. सनाला भेटण्याचे तो टाळू लागला. मात्र, सनाने ऐनकेन प्रकारे त्याच्याशी संपर्क केला. तिने त्याला सांगितले की, तिच्या आईबाबांनी तिचा एका मुस्लीम माणसाशी जबरदस्तीने निकाह लावला आहे. “तू मला यातून बाहेर काढ. मला तुझ्यासोबतच राहायचे आहे. निकाह तोडायचा तर मला पैसे हवेत.” दुसरीकडे सनाचे घरचे बोलू लागले की ”तुझे खतना करतानाचे व्हिडिओ आहेत.

आम्ही ते व्हायरल करू. हे टाळायचे असेल तर पैसे दे.” या सगळ्याने त्रस्त होत दिपकने समाजात इज्जत जाईल, या भीतीने या लोकांना जवळ जवळ 11 लाख रूपये दिले. पण, त्यांच्या मागण्या वाढू लागल्या. शेवटी त्रस्त होत दिपकने याबद्दल पोलिसांत तक्रार केली. त्याच्याकडे सबळ पुरावेही होते. मग सनानेही दिपक छेडछाड करतो, अशी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर सनाच्या घरच्यांनी दिपकला सांगितले की, ”तुझी तक्रार मागे घे, तुझे पैसे परत देतो.” तक्रार मागे घेतो, या बॉण्डवर दिपकला जबरदस्ती सही करायला लावली. तसेच पैसे घ्यायला ये, असे सांगत त्यांनी दिपकला एका ठिकाणी बोलावले. तिथे दिपकला मारहाण केली. दिपकच्या म्हणण्यानुसार, तिथे ओवेसीच्या पक्षाचा तत्कालीन खासदारसुद्धा उपस्थित होता. दीपकचा जीव जायचाच बाकी होता. मात्र, एका पोलीस अधिकार्‍याने त्याला वाचवले. दिपकने याबाबतची तक्रार पोलिसात केली. पण, विशेष गंभीरतेची बाब अशी की, सनाने त्याचवेळी दिपकवर आणि त्याच्या वडिलांवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. उच्च सुशिक्षित दिपकसोबत इज्जतदार वडिलांनाही तुरूंगवास झाला. सगळ्या समाजाला माहिती होते की, दिपकच्या वडिलांना याबाबत काही देणेघेणे नव्हते. पण, इस्लाम न कबूल करणार्‍या दिपकवरचा राग त्याच्या कुटुंबावरही काढण्यात आला.

या सगळ्या घटना सुन्न करणार्‍या आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या आहेत बरं का? महाराष्ट्राच्या गावाखेड्यात आणि शहरातल्या वस्त्या-वस्त्यांमध्ये ही असेच खुप काही घडत आहे. पण, वाच्यता केली की लगेच म्हंटले जाते की, हे लोक धर्माधर्मात भांडणं लावतात. मुंबईचे घाटकोपरचे रमाबाईनगर असू दे की मालाडचे मालवणी, मागासवर्गीय समाजाचे वास्तव काय आहे, हा एक वेगळाच संशोधनाचा विषय होईल. समाजातील कुटुंब अस्वस्थ अस्थिर व्हावीत, आंबेडकरी विचारांपासून दूर व्हावीत म्हणून समाजाच्या तरुण होतकरू मुलांना ड्रग्जच्या जाळ्यात कोण आणि कसे अडकवते, याचा मागोवा घेतला तर वाटते की, ‘दलित-मुस्लीम भाई भाई, हिंदू कौम कहासे आयी’ म्हणणारे आहेत की खपलेत? छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अगदी लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंनी स्वाभिमानी स्वधर्माचा मंत्रजागर केला. त्याच प्रबुद्ध समाजाने मूळ स्वधर्म सोडावा म्हणून ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’चे भयंकर षड्यंत्र रचले जाते. त्यामुळेच ‘दलित-मुस्लीम भाई भाई’चा विचार करताना भाईचारा ठीक, पण धम्म आणि संविधानाविरोधात जाऊन भाई’चारा’ व्हायचे का? हे सुद्धा समाजाने ठरवणे गरजेचे आहे.

9594969638
Powered By Sangraha 9.0