काँग्रेसी मानसिकतेवर प्रहार

02 Jul 2024 21:42:10
editorial on congress lop parliament statement


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसदेत बोलताना, पहिल्यांदाच हिंदू बांधवांनी अंतर्मुख होण्याची गरज अधोरेखित केली. हिंदू हिंसक असल्याचे संसदेत जे खोटे सांगितले गेले, ते आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा भाग असू शकतो, ही शक्यता व्यक्त करतानाच, देशातील हिंदूंना विचार करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. यावरून या विषयाचे गांभीर्य लक्षात यावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसदेत बोलताना एका महत्त्वाच्या विषयाकडे हिंदूंचे लक्ष वेधले. सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने हिंदू धर्माचे चित्र मांडले, ते पाहता याचा हिंदू बांधवांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. हिंदू हे हिंसक असल्याचे धादांत खोटे सांगितले जात असेल, तर ही गंभीर बाब आहे. हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असल्याचे संकेत पंतप्रधानांनी दिले आहेत. हिंदू धर्माविरोधात सातत्याने केला जाणारा अपप्रचार हा एका रणनीतीचा भाग आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. त्याचवेळी हिंदू हे सहनशील आहेत. त्यांनी संपूर्ण जगाला सहिष्णुतेची शिकवण दिली असून, वैश्विक स्वीकृती स्वीकारली आहे, हे सांगण्यास पंतप्रधान मोदी विसरले नाहीत. काँग्रेसच्या ‘इंडी’ आघाडीतील घटक पक्षांनी सनातन धर्माविरोधात जे अवमानकारक वक्तव्य केले होते, ते नेमक्या कोणत्या विचारधारेतून आले, हे राहुल यांच्या भाषणातून उघड झाले. पंतप्रधान मोदी यांनी नेमकेपणाने त्यावरच ठेवलेले बोट अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडणारे असेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर कधीही हिंदू-मुस्लीम असा भेदाभेद केलेला नाही. तथापि, मंगळवारी संसदेत बोलताना, त्यांनी पहिल्यांदाच देशातील हिंदूंना विचार करायला आवाहन केले. यातूनच, काँग्रेसी षड्यंत्र किती गंभीर आहे, याची कल्पना यावी.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात जे वादग्रस्त वक्तव्य केले होते, ते संतापजनक असेच होते. त्यावेळी देशभरात त्याविरोधात भावना व्यक्त झाली होती. सनातन धर्माचे निर्मूलन करा, अशा आशयाचे विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केले होते. एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने स्टॅलिन यांनी सर्वधर्मियांचा आदर केला पाहिजे, तथापि, ते तसे करताना दिसले नाहीत. ‘सनातन धर्माचे निर्मूलन करा,’ असा शब्दाचा प्रयोग करून स्टॅलिन यांना नेमके काय साध्य करायचे आहे? हा प्रश्न आहे. सनातन धर्म हा समता आणि सामाजिक न्याय या दोन्हींचा विरोध करणारा आहे, असेही स्टॅलिन यांनी म्हटले होते. हिंसाचाराला भडकावणारी विधाने त्यांनी नेहमीच केली. स्टॅलिन यांच्यापाठोपाठ ‘इंडी’ आघाडीतील अन्य घटक पक्षांनीही सनातन धर्माविरोधात गरळ ओकली. राहुल यांनी त्यापुढे जात, हिंदू हिंसक आहेत, असे भगवान शंकर यांचे छायाचित्र दाखवत संसदेत सांगितले.

नरेंद्र मोदी सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यामुळे, तसेच ते बिगर काँग्रेसी असल्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. भारतात विरोधकांना बोलायचे स्वातंत्र्य नाही, संसदेत त्यांचा गळा घोटला जातो, त्यांना बोलू दिले जात नाही, असा कांगावा राहुल गांधी यांनी यापूर्वीच विदेशात जाऊन केला. भारतात सत्ताधारी भाजपने माध्यमांची गळचेपी केली, असेही त्यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर राहुल जेव्हा विरोधी पक्षनेते म्हणून संसदेत बोलायला उभे राहिले, तेव्हा ती आंतरराष्ट्रीय घटना होती. याचे भान बाळगत त्यांनी जबाबदारीने भाष्य करणे, अपेक्षित असताना, हिंदू धर्माविरोधात त्यांनी केलेली टीका, जगभरातील हिंदू बांधवाबद्दल चुकीचा समज पसरवणारी आहे. हिंदू हिंसक असतात, हे विधान हिंदूंच्या हेतूबद्दल शंका उत्पन्न करणारे ठरले. जगभरात कट्टर, उजव्या विचारसरणीचा उदय होत असताना, असा संदेश जाणे हे धोकादायक असे. फ्रान्स असो वा इंग्लंड - तेथे उजव्या विचारसरणीला प्राधान्य मिळत आहे. पुरोगामी अथवा सेक्युलर विचासरणीने काय होते, हे संपूर्ण युरोपने अनुभवले आहेच.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसी घातक मानसिकतेवर कठोर प्रहार केलाच. त्याशिवाय हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी आजवर त्यांनी कोणकोणती कारस्थाने रचली, तीही त्यांनी उघड केली. मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला, तो हिंदू दहशतवादाने केला असे भासवण्यासाठी काँग्रेसने पुरेपूर कुभांड रचले. त्यासाठीची पुरावेही तयार होते. तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, कसाबला जीवंत पकडले म्हणून हा पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ला होता, हे जगासमोर उघड झाले, अन्यथा हिंदू दहशतवादानेच मुंबईवर हल्ला केला, हे सांगणारे सगळे पुरावे तयार होते. सोनिया गांधी यांच्या कार्यकाळात हिंदू धर्मावर सातत्याने काँग्रेसने प्रहार केले. म्हणूनच, उदयनिधी स्टॅलिन सनातनचे निर्मूलन करा, असे आवाहन करता झाला, हे विसरता येणार नाही. काँग्रेसी मानसिकता इथेच थांबत नाही, तर हिंदू हे हिंसक आहेत, असे भगवान शंकर यांचा दाखला देत ती निलाजरेपणाने संसदेत व्यक्त होते.

पंतप्रधान मोदी यांनी याच काँग्रेसी मानसिकतेवर कठोर प्रहार केला. देश यांना कधीही माफ करणार नाही, हे मोदींचे विधान अतिशय गांभीर्याने घ्यावे असेच. हिंदू परंपरा, समाज यांची टिंगलटवाळी करण्याची यांच्या ‘इकोसिस्टम’ची फॅशन आहे, असे जेव्हा ते सांगतात, तेव्हा त्यावर चिंतन व्हायला हवे. मार्च-एप्रिलमध्ये जाहीर सभेत बोलताना, पंतप्रधान म्हणाले होते की, “मी देशासाठी कोणतीही गोष्ट करतो, तेव्हा हिंदू-मुस्लीम असा कोणताही भेदाभेद करत नाही. माझ्यासाठी सारे समान आहेत.” तेच पंतप्रधान आज हिंदू समाजाने आत्मचिंतन करावे, असे संसदेत जेव्हा म्हणतात, तेव्हा घडलेला प्रकार किती गंभीर आहे, हे लक्षात यावे.

राहुल गांधी यांनी केलेले अवमानजनक वक्तव्य हा योगायोग आहे की, कोणत्या प्रयोगाची तयारी, याचा हिंदू समाजाला आता विचार करावा लागेल, असे मोदींनी केलेले विधानही सावधानतेचा इशारा देणारे. धर्माच्या आधारावर काँग्रेसने देशाची यापूर्वीच फाळणी करून झाली आहे. आता जातींच्या आधारावर, प्रादेशिक आधारावर फूट पाडण्याचे मनसुबेही मोदींनी उघडे पाडे. संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असा अपप्रचार केला गेला. तथापि, त्याच संविधानाने पुन्हा एकदा भाजपला सत्ता दिली. विरोधकांच्या अपप्रचाराला देश बळी पडला नाही, हेही मोदी यांनी ठळकपणे सांगितले. येत्या पाच वर्षांत काँग्रेस किती खालच्या पातळीला जाईल, याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले असले, तरी पंतप्रधान मोदी यांनी त्याला सडेतोड उत्तर देताना, काँग्रेसी मानसिकतेचा उघडा पाडलेला चेहरा, सर्वसामान्य जनतेला विचार करायला भाग पाडणारा आहे, असे नक्कीच म्हणता येते.



Powered By Sangraha 9.0